Maharashtra Assembly Election 2024
घररायगडRaigad Politics : रायगडमध्ये पुन्हा रंगले कुरघोडीचे राजकारण, काठावर वाचलेल्यांना असं महेंद्र...

Raigad Politics : रायगडमध्ये पुन्हा रंगले कुरघोडीचे राजकारण, काठावर वाचलेल्यांना असं महेंद्र थोरवेंना का म्हणाल्या अदिती तटकरे

Subscribe

कर्जत : विधानसभा निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर पुन्हा शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये वादाची ठिणगी पडली आहे. महायुतीची सत्तास्थापनेची तयारी सुरू असतानाच कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे यांनी पुन्हा सुनील तटकरेंवर आरोपाचा बॉम्ब टाकला आहे. त्यामुळे थोरवे विरुद्ध तटकरे वादाला नव्याने तोंड फुटले आहे. अदिती तटकरे याना पालकमंत्रिपद देऊ नका, अशी मागणी करत आमदार महेंद्र थोरवे यांनी वादाची वात पेटवली आहे. त्यावरून काठावर वाचलेल्याना महत्त्व देत नाही, असा टोला लागवत अदिती तटकरे यांनी पलटवार केला आहे.

कर्जत मतदारसंघातून विजय मिळवल्यानंतर थोरवे यांनी मुंबईत माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी, सुनील तटकरे यांनी महायुतीशी गद्दारी केल्याने त्यांच्या मुलीला पालकमंत्रिपद मिळू नये, अशी प्रतिक्रिया दिली होती. त्यावर आमदार अदिती तटकरे यांनीही तिखट प्रतिक्रिया देत थोरवे यांना सुनावले आहे. मी महेंद्र थोरवे यांना फारसे महत्त्व देत नाही. त्यांनी त्यांचा त्यांचा मतदारसंघ सांभाळावा. ते काठावर वाचलेले आहेत. आपल्याला मिळालेल्या यशाची हवा डोक्यात जाऊन द्यायची नसते. उलट नम्रतेने त्याचा स्वीकार करायचा असतो. आणि कोण कुठला मंत्री होणार ते वरिष्ठ ठरवतात ते काही कुठला स्थानिक आमदार ठरवत नसतो, या शब्दांत अदिती तटकरे यांनी थोरवेंचा समाचार घेतला आहे.

- Advertisement -

हेही वाचा…  Manoj Jarange : कोणीही मुख्यमंत्री झाले तरी आरक्षण घेणार, सुट्टी नाही; एकनाथ शिंदेंच्या पत्रकार परिषदेनंतर जरांगेंचा इशारा

या विधानसभा निवडणुकीत कर्जत मतदारसंघ लक्षवेधी ठरला. महायुतीतील रस्सीखेच शिवसेनेचे उमेदवार महेंद्र थोरवे यांना डोईजड झाली होती. राष्ट्रवादी काँग्रेसमधून उमेदवारी न मिळाल्याने सुधाकर घारे यांनी पक्षाचा राजीनामा देत अपक्ष निवडणूक लढवली होती. थोरवे आणि घारे यांच्यात अटीतटीची लढत झाली होती. यावेळी प्रचारादरम्यान महेंद्र थोरवे यांनी पत्रकार परिषद घेत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि खासदार सुनील तटकरे यांना लक्ष्य केले होते. सुधाकर घारे हे सुनील तटकरे यांचेच पाप असल्याचे म्हणत थोरवे यांनी तटकरे यांच्यावर हल्लाबोल केला होता. अगदी तटकरे यांचा उल्लेख सडका कांदा असाही केला होता.

- Advertisement -

2019 मध्ये महेंद्र थोरवे यांनी शिवसेना-भाजप युतीचे उमेदवार होते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सुरेश लाड यांचा मोठ्या मताधिक्याने पराभव करून ते विजयी झाले होते. त्यावेळी अदिती तटकरे या जिल्ह्याच्या पालकमंत्री होत्या. तेव्हा या पालकमंत्रिपदावरून महाभारत घडले होते. पुढे महाविकास आघाडीचे सरकार कोसळले होते. अजून शपथविधीही झालेला नसताना तसेच चित्र आता पुन्हा दिसू लागले आहे. त्यामुळे पुढे काय होणार, या चर्चांना आता उधाण आले आहे.

वादाचे मूळ 2021 मध्ये

कर्जतमधील प्रशासकीय भवनाच्या इमारतीचे भूमिपूजन 27 मे 2021 रोजी आमदार महेंद्र थोरवे यांच्या हस्ते होणार होते. मात्र त्यापूर्वीच माजी आमदार व तत्कालीन राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुरेश लाड यांनी प्रशासकीय भवनाचे प्रतिकात्मक भूमिपूजन केले. यावेळी प्रशासकीय भवनासाठी आम्ही सरकारकडे प्रयत्न करून अर्थसंकल्पात मंजुरी मिळवली होती आणि त्या कामाच्या भूमिपूजन सोहळ्याला पालकमंत्री, महसूलमंत्री यांना डावलून जर भूमिपूजन केले जाणार असेल असेल तर अशी हुकूमशाही खपवून घेतली जाणार नाही. यापुढे त्या हुकूमशाहीला जशास तसे उत्तर दिले जाईल, असा इशारा सुरेश लाड यांनी शिवसेनेला दिला होता. तसेच अर्थसंकल्पात मंजूर झालेला निधी हा स्वतःची मालमत्ता आहे काय? असा सवाल करत सरकारच्या निधीमधून होणारी विकासकामे स्वतःच्या नावावर आणि पक्षाचे लेबल लावून खपवून घेण्याचे प्रकार यापुढे राष्ट्रवादी काँग्रेस सहन करणार नाही, असा इशारा लाड यांनी दिला होता.

यावर आमदार महेंद्र थोरवे यांनीदेखील लाड यांना सूचक इशारा देत थेट आघाडीत बिघाडी झाल्याशिवाय राहणार नाही म्हणत तत्कालीन पालकमंत्री अदिती तटकरे यांच्यावरदेखील टीका केली होती. त्यानंतर शिवसेनेच्या तिन्ही आमदारांनी उठाव करून पालकमंत्री हटवला नारा दिला होता. अखेर अडीच वर्षांपूर्वी महाविकास आघाडीचे सरकार कोसळले. मात्र ते सरकार कोसळताना केंद्रबिंदू स्थानी रायगडमधील शिवसेनेचे तिन्ही आमदार होते ही, त्यातील विशेष बाब आहे.

(Edited by Avinash Chandane)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -