HomeरायगडRaigad Politics : होय मी इच्छुक, गोगावलेंची प्रतिक्रिया, रायगडच्या पालकमंत्रिपदासाठी कुणाचे पारडे...

Raigad Politics : होय मी इच्छुक, गोगावलेंची प्रतिक्रिया, रायगडच्या पालकमंत्रिपदासाठी कुणाचे पारडे जड

Subscribe

पनवेल : राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार 15 डिसेंबर रोजी (रविवारी) विधिमंडळाच्या पहिल्या अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला झाला. त्यात रायगडमधून राष्ट्रवादी काँग्रेसच्या अदिती तटकरे आणि शिवसेनेचे भरत गोगावले यांना मंत्रिपद मिळाले. त्यानंतर अधिवेशन संपल्यानंतर शनिवारी (21 डिसेंबर) खातेवाटप झाले. यात अदिती तटकरे यांना महिला व बालविकास हे आधीचे खाते मिळाले तर भरत गोगावले यांना रोजगार हमी व फलोत्पादन खात्याची जबाबदारी मिळाली. त्यामुळे आता रायगड जिल्ह्याचे पालकमंत्रिपद कुणाला मिळणार, याची चर्चा आता सुरू झाली आहे. दोन दिवसांत पालकमंत्रिपदाचा निर्णय होईल, असे शिवसेनेचे नेते शंभूराज देसाई यांनी म्हटले आहे. मात्र, रायगडचा तिढा कसा सुटेल, याची उत्सुकता अवघ्या रायगड जिल्ह्याला आहे.

मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर मी पालकमंत्रिपदासाठी इच्छुक आहे, अशी प्रतिक्रिया भरत गोगावले यांनी दिली होती. तसेच आपल्याला पद मिळेल, असा दावाही त्यांनी केला होता. भरत गोगावले यांची पालकमंत्री होण्याची इच्छा नवी नाही. पाच वर्षांपासून त्यांना पालकमंत्री होण्याचे स्वप्न पडत आहेत. त्यामुळे आता मंत्रिपदासोबत पालकमंत्रिपदाची लॉटरी लागणार का, त्याची सर्वांना उत्कंठा आहे. कारण पालकमंत्रिपदासाठी दुसऱ्या दावेदार अदिती तटकरे आहेत. त्यामुळे दोन दावेदार आणि एक पद असल्यामुळे दोन्ही बाजूंनी जोरदार मोर्चेबांधणी सुरू आहे.

हेही वाचा…  Accident : रायगडमध्ये 36 तासांत दुसरी दुर्घटना, खासगी बस पेटली

कुणाचे पारडे जड?

अदिती तटकरे दुसऱ्यांचा आमदार झाल्या आहेत. तर त्यांना तिसऱ्यांना मंत्रिपद मिळाले आहे. महाविकास आघाडी सरकारमध्ये असताना 2019 मध्ये त्यांना राज्यमंत्रिपद मिळाले होते. तर महायुती सरकारमध्ये 2022 मध्ये त्यांना कॅबिनेटपदी बढती मिळाली आणि महिला व बालविकास खात्याची जबाबदारी त्यांच्याकडे आली. विशेष म्हणजे लाडकी बहीण योजना ही राज्याची गेम चेंजर योजना याच खात्याकडून राबवण्यात आली आणि सरकारला याचा प्रचंड फायदा झाल्याचे दिसले. कदाचित त्यामुळेच हेच खाते अदिती तटकरे यांना देण्यात आले. त्या कामावर फोकस करत असल्याने वादात दिसत नाहीत. वयाने कमी असल्या तरी मंत्री म्हणून काम करण्याचा त्यांच्याकडे अनुभव आहे. शिवाय खासदार सुनील तटकरे त्यांच्यासाठी नक्कीच जोरदार फिल्डिंग लावत आहेत.

भरत गोगावले चौथ्यांदा आमदार झाले आहे आणि त्यांना पहिल्यांदाच मंत्रिपद मिळाले आहे. मंत्री व्हायचंय मला, असे गोगावले यापूर्वी अनेकदा म्हणाले आहेत. तसेच पालकमंत्री होणे हे गोगावले यांची स्वप्न होते. याबाबत त्यांनी अनेकदा जाहीर वक्तव्ये केली आहेत. 2019 पासून त्यांची पालकमंत्रिपदाची इच्छा प्रबळ झाली होती. त्यांनी अदिती तटकरे यांना पालकमंत्रिपद देऊ नये, अशी जाहीर भूमिका घेतली होती. त्यासाठी त्यांना सुनील तटकरे यांच्याशीही पंगा घेतला होता. विधानसभा निवडणुकीच्या काही दिवस आधी त्यांनी नाराजीनेच एसटी महामंडळाचे अध्यक्षपद स्वीकारले होते. मात्र, मंत्रिपद पाहिजेच, हा त्यांचा कायम हट्ट राहिला होता. रायगडमध्ये शिवसेनेचे तीन आमदार आहेत तर राष्ट्रवादीचा एक आमदार ही बाब गोगावले यांच्यासाठी जमेची आहे.

शिवसेना + भाजप VS राष्ट्रवादी काँग्रेस

रायगडमध्ये शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस असा संघर्ष आहे. कर्जतमधील शिवसेनेचे आमदार महेंद्र थोरवे यांनी विधानसभा निवडणुकीपूर्वी आणि निकालानंतरही सुनील तटकरे यांच्यावर अनेक आरोप केले होते. थोरवे आणि तटकरे यांच्यातील संघर्षाची रायगडमध्ये कायम चर्चा असते. अशातच आताच्या नागपूर अधिवेशनाच्या काळात रायगडमधील शिवसेनेचे तीन आणि भाजपचे तीन असे सहा आमदार आमदार एकत्र असून सर्वांची पालकमंत्रिपदासाठी आपल्याला पाठिंबा दिल्याचा दावा भरत गोगावले यांनी माध्यमांशी बोलताना केला होता. शिवाय शिवसेनेचे महेंद्र थोरवे आणि महेंद्र दळवी या दोन्ही आमदारांनी गोगावले यांना साथ दिल्यामुळे पालकमंत्रिपदासाठी रायगडमध्ये जोरदार चुरस असल्याचे स्पष्ट झाले आहे.

(Edited by Avinash Chandane)