अलिबाग/उरण : नाताळ आणि त्यानंतर येणारे नवीन वर्ष याचा आनंद साजरा करण्यासाठी पर्यटकांनी रायगडच्या समुद्रकिनार्यांना प्राधान्य दिले आहे. दोन दिवसांपासून हजारोंच्या संख्येने पर्यटक रायगडमधील अलिबाग, दिवेआगार, मुरूड-जंजिरा, श्रीवर्धन किनारपट्टीवर दाखल झाल्याने समुद्रकिनारे पर्यटकांनी फुलून गेले आहेत. परिणामी हॉटेल, लॉज,
खाद्यपदार्थांच्या दुकानांची चंगळ सुरू झाली आहे.
डिसेंबरचा दुसरा आठवडा संपला की कोकणच्या किनारपट्टीवर पर्यटकांची वर्दळ सुरू होते. दिवाळीच्या सुट्ट्या, त्यानंतर डिसेंबरमधील विद्यार्थ्यांच्या युनिट टेस्ट संपल्यामुळे टेन्शन फ्री झालेले विद्यार्थी आणि वर्ष संपायला आल्याने सुट्टी संपवण्यासाठी तयार झालेले नोकरदार यामुळे पर्यटकांची पावले रायगड जिल्ह्यातील समुद्रकिनार्यांवर वळायला लागतात. दोन दिवसांपासून रायगडमधील किनारपट्टीवर पाहावे तिकटे पर्यटक दिसत आहेत. कुणी समुद्रात मनसोक्त डुंबत आहेत, कुणी एटीव्ही राईडबरोबरच वेगवेगळ्या वॉटर स्पोर्ट्सचा मनमुराद आनंद घेत आहेत. बच्चेकंपनी ऊंट सवारीची मजा घेत आहे, तर लहानमोठे सर्व वाळूत प्रतिकृती बनवण्यात रमलेले पाहायला मिळत आहेत.
अलिबाग तालुक्यातील आवास, सासवणे, किहीम, वरसोली, अलिबाग, आक्षी, नागाव, चौल आणि रेवदंडा येथे अंदाजे 20 हजार पर्यटक दाखल झाले आहेत, तर मुरूड तालुक्यातील काशिद, नांदगाव, मुरूड आणि फणसाड येथे 12 हजारांहून अधिक पर्यटक दाखल झाले आहेत. पर्यटकांमुळे स्थानिकांना चांगला रोजगार मिळत आहे. बोट व्यावसायिक, स्टॉलधारक, नारळपाणी विक्रेते यांचे व्यवसाय तेजीत आहेत.
इकडे मुरूडमध्येही राजापुरी येथील जंजिरा किल्ला पाहायला पर्यटकांची रीघ लागली आहे. त्यामुळे वाहनांची वर्दळ प्रचंड वाढली असून स्थानिकांचे व्यवसाय तेजीत आहेत. राज्यभरातून पर्यटक किल्ला पाहण्यासाठी आले आहेत, मात्र बोटीत लहान मुलांना प्रवेश नसल्याने मुलाबाळांसह आलेल्या पर्यटकांनी नाराजी व्यक्त केली आहे. शालेय विद्यार्थ्यांना जेट्टीवर येऊन किल्ल्याचे फोटो काढून उदास चेहर्याने परतावे लागत आहे.
गेटवे ते एलिफंटा प्रवासात नौदलाच्या स्पीड बोटीने धडक दिल्याने नीलकमल बोट बुडून 15 पर्यटकांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे सावधगिरीचे पाऊल म्हणून सेफ्टी जॅकेटशिवाय बोटीतून प्रवास करण्यास सरकारने मनाई केली आहे. राजपुरीचे बंदर निरीक्षक सतीश देशमुख यांनी प्रत्येक बोटीत संख्यानुसार आणि प्रत्येक पर्यटकांना सेफ्टी जॅकेट घालूनच प्रवेश दिला. ज्या बोटीत लहान मुलांना सेफ्टी जॅकेट नसतील त्या बोटींना परवानगी नाकारल्याने तिकीट कार्यालयाजवळ गोंधळ उडाला आणि पर्यटकांनी नाराजी दर्शवली. काही पर्यटकांनी बंदर निरीक्षकांना घेराव घालून लहान मुलांना आमच्या जबाबदारी घेऊन जातो, अशी विनंती केली. मात्र, बंदर निरीक्षकांनी पर्यटकांची मागणी मान्य केली नाही. त्यामुळे त्यांना पर्यटकांच्या रागाला सामोरे जावे लागले. म्हणून मुरुड पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला.
दरम्यान, बहुतांश पर्यटकांनी मुरुडमध्ये समुद्राच्या पाण्यात पोहण्याचा आनंद घेतला. काहींनी उंटावरून फेरफटका मारल्याची मौज घेतली तर काहींनी घोडा गाडीतून सैर केली. अनेक पर्यटकांनी बाईक फिरवण्याचाही आनंद घेतला.
लाईफ जॅकेटशिवाय बोटप्रवास नाही
गेट वेजवळील दुर्घटनेनंतर बोटीतील सर्वांना लाईफ जॅकेट सक्तीचे आहे, मात्र लहान मुलांचे लाईफ जॅकेट आणण्यास बोटमालक विसरल्याने बंदर निरीक्षकांनी जंजिरा किल्ला पाहण्यासाठी बोटीतून लहान मुलांना परवानगी दिली नाही.
– बोटमालक, जंजिरा, राजापुरी
नियमांचे पालन करा
बोट प्रवासासाठी सेफ्टी जॅकेट सक्तीचा असल्याचा आदेश आहे. त्यामुळे दुर्घटना टाळण्यासाठी नियमांचे पालन करा. सेफ्टी जॅकेटशिवाय बोटीने प्रवास करण्याची परवानगी देऊ शकत नाही.
– सतीश देशमुख, बंदर निरीक्षक, राजपुरी
निसर्गसौंदर्याच्या प्रेमात
आम्ही दोन दिवसांसाठी आलो होतो, परंतु येथील निसर्गसौंदर्य पाहून पाय निघत नाही. येथील कोकणी जेवणही अप्रतिम आहे. आमची मुलेदेखील खूश आहेत. त्यामुळे आम्ही आमचा मुक्काम वाढवला आहे.
– रंजना पवार, पर्यटक
(Edited by Avinash Chandane)