HomeरायगडRaigad Tourist : श्रीवर्धनमध्ये पर्यटकांचा सागर, रेकॉर्ड ब्रेक गर्दीमुळे वाहतूक नियंत्रणासाठी पोलीस...

Raigad Tourist : श्रीवर्धनमध्ये पर्यटकांचा सागर, रेकॉर्ड ब्रेक गर्दीमुळे वाहतूक नियंत्रणासाठी पोलीस लागले कामाला

Subscribe

श्रीवर्धन : निसर्गरम्य श्रीवर्धनमध्ये नवीन वर्षाच्या स्वागतासाठी आणि वर्ष 2024 ला निरोप देण्यासाठी पर्यटकांची अलोट गर्दी उसळली आहे. त्याचवेळी पर्यटकांसोबतच शालेय तसेच महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक सहली मोठ्या प्रमाणावर येत आहेत. श्रीवर्धनमध्ये मोठ्या प्रमाणात वाहने येऊ लागल्याने शहरात सर्वत्र वाहतूक कोंडी होत असल्याचे दिसत आहे. नगरपरिषद ब्रिटिशकालीन असल्यामुळे रस्तेदेखील जेमतेम 12 ते 14 फूट रुंदीचेच आहेत. त्यामुळे समोरा-समोरुन वाहने आल्यास वाहतुकीचा खोळंबा होत आहे. ही बाब लक्षात घेऊन वाहतुकीचे नियोजन करण्यासाठी श्रीवर्धन पोलिसांनी विविध पावले उचलली आहेत.

हेही वाचा…  Crime News : चिमुरडीवर अत्याचार करणाऱ्या नराधमाच्या मुसक्या आवळल्या; बदलापूर, कल्याणनंतर मुरुड

मोठ्या खासगी बस तसेच एसटी बस आणि टेम्पो ट्रॅव्हलर्स यांना श्रीवर्धनमध्ये प्रवेश करण्याआधीच कमानीच्या पार्किंगसाठी पोलिसांनी सुविधा उपलब्ध करून दिली आहे. तसेच श्रीवर्धन समुद्रकिनाऱ्यावर मोठ्या प्रमाणात येणाऱ्या पर्यटकांच्या चार चाकी गाड्या उभ्या करण्यासाठी र. ना. राऊत विद्यालयाच्या पटांगणाचा वापर पोलिसांनी केला आहे. पोलिसांकडून पार्किंगसाठी विविध प्रकारच्या सुविधा उपलब्ध करून देण्यात असल्या तरी, शहरातील मठाचा गवंड, अवधूत मंदिर परिसरातदेखील मोठ्या प्रमाणात वाहने उभी करण्यात आली आहेत.

हेही वाचा…  Raigad News : वाहतूक कमी कोंडीच जास्त, अलिबाग रेवदंडा रस्त्यावर पर्यटक बेहाल

नाताळच्या सुट्ट्यांचा हंगाम असल्यामुळे पर्यटकांची श्रीवर्धन तालुक्यातील सर्वच समुद्रकिनाऱ्यांवर रिघ लागली आहे. श्रीवर्धन, हरिहरेश्वर, दिवेआगर आणि आरावी येथील समुद्रकिनाऱ्यावर प्रचंड गर्दी पाहायला मिळते. पर्यटकांच्या प्रचंड गर्दीमुळे येथील हॉटेल व्यावसायिक, लॉजिंग बोर्डिंगचे मालक, रिसॉर्टमालक खुशीत आहेत. श्रीवर्धन समुद्रकिनाऱ्यावर प्रत्येक शनिवारी आणि रविवारी सायंकाळी ऑर्केस्ट्राचे आयोजन केले जाते. यात स्थानिक तसेच पर्यटकांना गाण्याची संधी दिली जाते. श्रीवर्धनचा स्वच्छ, सुंदर आणि निसर्गरम्य असा समुद्रकिनारा पर्यटकांवर भुरळ घालत आहे. सध्याचे वातावरण आल्हाददायक आहे. समुद्रकिनाऱ्यावर चांगल्या प्रकारे सुशोभीकरण करण्यात आलेले आहे. या अशा अनेक कारणामुळे पर्यटक श्रीवर्धनकडे आकर्षित होत आहेत.

(Edited by Avinash Chandane)