घरराजकारणराज ठाकरेंचा रत्नागिरीमधून सत्ताधारी विरोधकांवर निशाणा; म्हणाले...

राज ठाकरेंचा रत्नागिरीमधून सत्ताधारी विरोधकांवर निशाणा; म्हणाले…

Subscribe

रत्नागिरी : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची रत्नागिरीमधील स्व. प्रमोद महाजन क्रीडा संकुल येथे जाहीर सभा पार पडली. यावेळी त्यांनी अनेक प्रश्न उपस्थित करत सत्ताधारी आणि विरोधकांवर निशाणा साधत बारसू रिफायनरी प्रकल्पाला विरोध करणारी भूमिका अप्रत्यक्षपणे मांडली.

कंत्राटदार पळून गेले
मुंबई-गोवा महामार्ग अनेक वर्ष रखडला आहे, यावर भाष्य करताना राज ठाकरे म्हणाले की, “मी जेव्हा मुंबई-गोवा महामार्गावरुन प्रवास करत होतो तेव्हा रस्त्याची अवस्था बघून मी देवेंद्र फडणवीस यांना फोन केला. अहो त्या रस्त्याकडे एकदा बघा. त्यांनी मला नितीन गडकरी बोलण्यास सांगितले. मी नितीन गडकरी यांना फोन केला. इतकी वर्ष झाली रस्ता पूर्ण का होत नाही. यावर त्यांनी कंत्राटदार पळून गेले, असे उत्तर दिले. पळून गेले?”, असा प्रश्न उपस्थित करत त्यांनी बारसू प्रकरणी बोलायला सुरूवात केली.

- Advertisement -

शिवसेनेची पक्ष म्हणून काय भूमिका?
 राज ठाकरे म्हणाले की, स्थानिकांनी व्यापारी लोकप्रतिनिधींना एकदा घरी बसवायला पाहिजे. तुमचा राग एकदा व्यक्त करा. आम्हाला आजपर्यंत विकत आलात ना तुम्ही. आम्ही तुम्हाला यापुढे किंमत देणार नाही, या भूमिकेवर ठाम राहा.  सगळा खेळ चालू आहे, शिवसेनेचे काही खासदार, आमदार म्हणतात पाठिंबा देणार, पक्ष म्हणतो पाठिंबा देणार, पण काही खासदार म्हणतात पाठिंबा देणार नाही. त्यामुळे पक्ष म्हणून शिवसेनेची काय भूमिका?”, असा प्रश्न उपस्थित करत राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला.

मुंबईच्या महापौरांचा बंगला ढापला
उद्धव ठाकरेंवर निशाणा साधताना राज ठाकरे म्हणाले की, पक्ष नसलेल्या पक्षाचे अध्यक्ष आज रत्नागिरीमध्ये येऊन गेले. आता सांगत आहेत? जी लोकांची भावना असेल ती आमची भावना. अरे व्वा. मग तुम्हाला हवा असलेला बाळासाहेब ठाकरे यांच्या नावावर मुंबईच्या महापौरांचा बंगला हा लोकांना विचारुन ढापला का?”, असा टोला लगावत राज ठाकरे यांनी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला.

- Advertisement -

जनतेचं हित बघितलंच पाहिजे
शिंदे-फडणवीस सरकारवर निशाणा साधताना राज ठाकरे म्हणाले की, लोकं ज्यावेळेला तुम्हाला निवडून देतात त्यावेळेला तुम्ही जनतेचं हित बघितलंच पाहिजे. जनतेचं हित कशामध्ये आहे, त्यांना चार पैसे जास्त कसे मिळतील, त्यांना घरदार सोडायला लागणार नाही ना, त्यांच्या पुढच्या ज्या पिढ्या आहेत त्यांना त्रास होणार नाही, याची काळजी सरकारने घ्यायची असते. पण सरकार काय सांगतंय, त्यांची जी भावना ती आमची भावना.”

माझ्या कोकणाला वाचवा
राज ठाकरे शेवटी म्हणाले की, हे सगळेजण तुम्हाला मुर्ख बनवत आहेत, फसवत आहेत. हे कधी या प्रदेशाची धुळधान करतील समजणार देखील नाही. या रिफायनरीत सगळ्यांचे व्यापाऱ्याचे हेतू आहेत. या सगळ्या गोष्टींमधून फक्त माझ्या कोकणाला वाचवा ही विनंती करण्यासाठी आज मी इथे तुमच्यासमोर आलो आहे. मी सांगितलेल्या गोष्टींचा आपण गांभीर्याने विचार कराल, एवढंच मी अपेक्षा बाळगतो”, असं आवाहन राज ठाकरे यांनी स्थानिक ग्रामस्थांना केले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -