घररायगडमहाड दासगावमध्ये रंगली होड्यांची शर्यत; ग्रामस्थांनी अनुभवला रोमांचक थरार

महाड दासगावमध्ये रंगली होड्यांची शर्यत; ग्रामस्थांनी अनुभवला रोमांचक थरार

Subscribe

वल्हव रे नाखवा वल्हव...वल्हव म्हणत होडीतील नाखव्याने भरतीचे पाणी आणि सुसाट्याचा वारा सहन करत स्पर्धेतील आपले लक्ष गाठण्याचा प्रयत्न केला. गेली अनेक वर्ष होडीवर उदरनिर्वाह करणार्‍या दासगावकर भोई समाजातील तरुणांनी आयोजित केलेल्या होडी स्पर्धेत परिसरातील ग्रामस्थांनी हा रोमांचक थरार अनुभवला. स्पर्धेचे हे तिसरे वर्ष असून यावर्षी होडी चालवण्यात या होडीने पहिला क्रमांक पटकावला.

महाड: वल्हव रे नाखवा वल्हव…वल्हव म्हणत होडीतील नाखव्याने भरतीचे पाणी आणि सुसाट्याचा वारा सहन करत स्पर्धेतील आपले लक्ष गाठण्याचा प्रयत्न केला. गेली अनेक वर्ष होडीवर उदरनिर्वाह करणार्‍या दासगावकर भोई समाजातील तरुणांनी आयोजित केलेल्या होडी स्पर्धेत परिसरातील ग्रामस्थांनी हा रोमांचक थरार अनुभवला. स्पर्धेचे हे तिसरे वर्ष असून यावर्षी होडी चालवण्यात या होडीने पहिला क्रमांक पटकावला.

दासगावमधील श्री रंगावली संस्थेने आपली परंपरा जपण्याच्या हेतूने या स्पर्धेचे आयोजन केले होते. गेली अनेक वर्ष या परिसरातील भोई समाज आपला उदरनिर्वाह होडीतून मासेमारी आणि वाळू काढून करत आहेत. दासगाव हा खाडी परिसर असल्याने भरती ओहोटीचे ज्ञान आणि होडी चालवण्याचे कसब या परिसरातील भोई समाजातील ग्रामस्थांना चांगले आहे. यामुळे आपली परंपरा जपली जावी या हेतूने ही स्पर्धा आयोजित केली जाते. मुंबई आणि अन्य शहरात असलेल्या भोई समाजाच्या लोकांनी देखील स्पर्धा पाहण्यासाठी हजेरी लावली होती. या स्पर्धा पाहण्याकरता किनार्‍यावर महाड, दासगावकरांनी गर्दी केली होती.
आठ होड्यांचा एक गट याप्रमाणे रेल्वे पुलाजवळून होड्याना सूचना देताच स्पर्धेला सुरवात होत होती. समोरून सुसाट्याचा वारा असताना देखील हाताने होडी वल्हवत नेमून दिलेल्या लक्षापर्यंत नेली जात होती. होड्या वल्हवत नेणे हा उपस्थित प्रेक्षकांसाठी एक रोमांचक क्षण अनुभवता आला. आठ होड्यांचे दोन राउंड असे गट करण्यात आले होते. प्रत्येक होडीत तीन स्पर्धक बसवण्यात आले होते. संस्थेच्या सर्व सदस्यांनी यावेळी अथक मेहनत घेतली. सरपंच तपस्या जंगम यांनी देखील उपस्थित सर्व स्पर्धकांना आणि विजेत्यांना शुभेच्छा दिल्या.

- Advertisement -

उत्साहाचे आणि आनंदाचे वातावरण
स्पर्धेचे हे तिसरे वर्ष असून या स्पर्धेत दासगाव, महाड, दाभोळ, पेवे, पंदेरी या गावातील ग्रामस्थ सहभागी होवू लागले आहेत. रविवारी सकाळी होडी चालवण्याच्या या स्पर्धेला प्रारंभ झाला. गावातील तरुण आणि महिला वर्गाने वैविध्यपूर्ण वेशभूषा करत या स्पर्धेतील स्पर्धकांना प्रोत्साहित केले. यामुळे दासगाव बंदर परिसरात एकच उत्साहाचे आणि आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते.

स्पर्धेतील विजेते
प्रथम: जयेश मिंडे, परेश निवाते, आदिनाथ मिंडे; द्वितीय: दिपेश निवाते, रुपेश पड्याळ, निखिल निवाते; तृतीय: सुमेश जाधव, प्रणेश निवाते, स्वप्नील जाधव; चतुर्थ – प्रियेश निवाते, सतिश निवाते, धर्मेंद्र पड्याळ.
आकर्षक होडी सजावट: प्रथम-संतोष पड्याळ यांची ‘गुरुकृपा’ होडी; द्वितीय: बाळकृष्ण मिंडे (दर्यादौलत होडी); तृतीय: गणेश मिंडे (लक्ष्मी होडी).
आकर्षक पेहराव: प्रथम – रोहित मिंडे (वासुदेव); द्वितीय :कौस्तुभ मिंडे (छत्रपती शिवाजी महाराज); तृतीय -सानवी मिंडे (मच्छीवाली) उत्कृष्ट नाखवा: प्रथम- जयेश मिंडे; द्वितीय-रुपेश पड्याळ ; तृतीय-सुमेश जाधव.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -