अलिबाग : रस्ते अपघातात रायगड जिल्हा सर्वात वर आहे. गेल्यावर्षी म्हणजे 2024 मध्ये रायगडमध्ये तब्बल 732 रस्ते अपघात झाले. यात 266 जणांचे बळी गेले तर 624 जण जबर जखमी झाले. या आकडेवारीमुळे रायगड पोलिसांची चिंता वाढली आहे तर चालकांची बेपर्वाईदेखील पुढे येत आहे. त्याचवेळी मुंबई-गोवा महामार्गावरील त्रुटींमुळेही अपघातांना आमंत्रण मिळत आहे.
रायगडमधील मुख्य रस्ते
रायगड जिल्ह्यात अनेक रस्ते असले तरी जिल्ह्यातून महत्त्वाचे मार्ग जात आहेत.
- मुंबई-गोवा महामार्ग (क्रमांक 66)
- मुंबई पुणे एक्स्प्रेस-वे
- मुंबई-पुणे महामार्ग (क्रमांक 4)
- वडखळ-अलिबाग महामार्ग
- दिघी-माणगाव-ताम्हाणी घाट महामार्ग
- खोपोली-वाकण-आगरदांडा राज्यमार्ग
- पेण-खोपोली राज्यमार्ग
सर्वाधिक अपघात कुठे?
एकूण अपघातात सर्वाधिक अपघात मुंबई-गोवा महामार्गावर झाले आहेत. या मार्गावरील 154 अपघातात 61 जणांनी जीव गमावला आहे. या खालोखाल मुंबई-पुणे एक्स्प्रेस-वेवरील 118 अपघातात 41 जणांचा मृत्यू झाला आहे. मुंबई-पुणे महामार्गावर 76 अपघातांत 26 जणांचा बळी गेला आहे. म्हणजेच रायगडमधील एकूण अपघातातील 70 टक्के अपघात वरील तीन महामार्गावर होत आहेत.
म्हणून अपघात होतात
चालकांची बेपर्वाही हे अपघातांचे मुख्य कारण आहे. शिवाय मुंबई-गोवा मार्गावरील संथगतीने सुरू असलेले काम, खड्डे, रस्त्यावरून उडणारी धुळ ही अपघाताची कारणे आहेत. त्याशिवाय चालकाकडून वाहतुकीच्या नियमांची पायमल्ली होत असल्याने अनेक अपघात होऊन लोकांचा नाहक जीव जात आहे.
रायगडमधील रस्ते दुर्घटना
वर्ष 2022
- अपघात – 724
- बळी – 276
- जखमी – 689
वर्ष 2023
- अपघात – 700
- बळी – 281
- जखमी – 593
वर्ष 2024
- अपघात – 732
- बळी – 266
- जखमी – 624
बेपर्वाईचे बळी
वाहनचालकांच्या बेपर्वाईमुळे अपघात होत आहेत. नैसर्गिक मृत्यूनंतर देशात सर्वाधिक मृत्यू रस्ते अपघातात होतात. चालकांनी नियमांचे पालन करायला हवे. त्यासाठी त्यांचे प्रबोधनदेखील करत आहोत.
– सोमनाथ लाडे, वाहतूक पोलीस निरीक्षक, रायगड
(Edited by Avinash Chandane)