Tuesday, June 22, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर रायगड खड्डे, खोदकामामुळे महामार्गावर जागोजागी धोका

खड्डे, खोदकामामुळे महामार्गावर जागोजागी धोका

Related Story

- Advertisement -

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर पाण्याचा निचरा होत नसल्याने आणि पर्यायी मार्गावर पडलेले खड्डे यामुळे जागोजागी धोका निर्माण झाला आहे. त्यातच महामार्गाच्या चौपदरीकरणासाठी शेजारी झालेले खोदकाम यामुळे महामार्गावर दरडी कोसळण्याचा धोका कायम असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

महामार्गाचे काम गेल्या 8 वर्षांपासून सुरू आहे. कामाचा पहिला टप्पा पनवेल ते इंदापूर, तर इंदापूर ते कशेडी असा दुसरा टप्पा रायगड जिल्ह्यातून सुरू आहे. पहिल्या टप्प्याचे काम अनेक वर्षे रखडल्याने रस्त्याची दुरवस्था होत गेली. दुसर्‍या टप्प्याचे कामदेखील दिलेल्या कालावधीपेक्षा अधिक काळ सुरूच राहिले आहे. इंदापूर ते कशेडी दरम्यान अनेक ठिकाणी डोंगर फोडून रस्ता तयार करण्यात आला आहे. या कामाकरिता अधिक वेळ वाया गेला आहे. त्यातच महामार्गातील मोठ्या वळणांचा मार्ग कायम ठेवल्याने अंतर देखील कमी झाले नाही. दोन वर्षे कोविड महामारीमध्ये काम संथगतीने सुरू राहिले. गत पावसाळ्याप्रमाणे यावेळी देखील दुसर्‍या टप्प्यातील ठेकेदार कंपन्यांनी नियोजन न केल्याने दोन दिवस पडणार्‍या पावसात महामार्गावर जागोजागी धोका निर्माण झाला आहे.

- Advertisement -

लोणेरेपासून महाडपर्यंत मोठा माती भराव टाकण्यात आला आहे. त्या शेजारील माती रस्त्यावर येऊ लागली आहे. यामुळे पाणी साचून रस्त्यावर चिखल झाला आहे. पावसाचे पाणी निचरा होण्याकरिता कोणतीही पूर्वतयारी केली नसल्याने पाणी रस्त्याकडेला साचले जात आहे. येथून कशेडीपर्यंत कांही भागात सिमेंट काँक्रीट रस्ता तयार करण्यात आला आहे. तर काही जागी पर्यायी आणि सर्विस रस्ता तयार करण्यात आला आहे. या दोन रस्त्यांवर ये-जा करण्यासाठी बाह्यवळण करण्यात आले आहेत. मात्र हे मार्ग डांबरी आणि तात्पुरते असल्याने पहिल्याच पावसात ते खड्डेमय बनले आहेत. शिवाय या ठिकाणी दिशादर्शक फलक नसल्याने वाहनचालकांची अडचण होत आहे.

हॉटेल विसावा ते नडगावपर्यंत असलेल्या डोंगरात खोदकाम केल्याने पाया कमकुवत होऊन माती आणि त्यावरील झाडे झुडपे रस्त्यावर येऊ लागली आहेत. बुधवारी सकाळी अशाच प्रकारे माती आणि काही झाडे रस्त्यावर आली. संबंधित ठेकेदार कंपनीने तत्काळ खाली आलेली माती आणि झाडे हटविली. शिवाय पर्यायी मार्गावर पडलेले खड्डे भरण्यास ऐन पावसात सुरुवात केली. सर्विस मार्गदेखील अल्पावधीतच उखडू लागला. इंदापूर ते कशेडी दरम्यान असलेल्या ठेकेदार कंपन्यांच्या कामाच्या गुणवत्तेबाबत देखरेख ठेवण्यासाठी एक खासगी कंपनी नेमण्यात आली आहे. मात्र या कंपनीकडूनही दुर्लक्ष केले जात असल्याचे दिसून येत आहे. महामार्ग विभागाकडून केवळ सूचना देण्याचे काम नियमितपणे सुरू आहे.

- Advertisement -

महाडपासून पोलादपूर-कशेडीपर्यंत महामार्ग चौपदरीकरणाचे काम सुरू आहे. मात्र पावसाळ्यापूर्वी जी तयारी करणे अपेक्षित होती, ती केली गेलेली नाही. यामुळे जागोजागी खड्डे पडले असून, चिखल साचत आहे.
– करीम करबेलकर, वाहनचालक

- Advertisement -