म्हसळा : ज्यांना आम्ही पद दिले, मोठे केले त्यांनी नंतर स्वार्थासाठी आणि घरातील कुटुंबाला मोठे करण्यासाठी भाजप युतीच्या मांडीला मांडी लावून सत्तेत जात आमची फसवणूक केली, या शब्दांत शरद पवार यांनी सुनील तटकरे यांचे नाव न घेता टीका केली. श्रीवर्धन मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे पवार गटाचे उमेदवार अनिल नवगणे यांच्यासाठी म्हसळा दिघी रोड येथे घेतलेल्या प्रचार सभेत शरद पवार यांनी भाजपवर टीकास्त्र सोडताना सुनील तटकरे यांनाही लक्ष्य केले. या मतदारसंघात अनिल नवगणे आणि राष्ट्रवादीच्या आदिती तटकरे यांच्यात थेट लढत आहे.
भाजपचा लोकसभा निवडणुकीत ४०० चे पारचा नारा होता कारण त्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी तयार केलेली घटना बदलायची होती. मात्र, आम्ही त्यांचे ते स्वप्न मोडले, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हसळ्यामध्ये केला. या देशात, सर्व समाजाला एकत्र घेऊन चालण्यासाठी डॉ. आंबेडकर यांनी राज्यघटना लिहिली. संविधानात मत देण्याचा जो अधिकार पंतप्रधान नरेंद्र मोदींना, उद्योगपतींना आहे तोच अधिकार सर्वसामान्य जनतेला, गरीब घटकातील नागरिकांना आहे. मात्र, आताच्या सरकारला घटना बदलायची होती, अशी टीका पवार यांनी केली.
हेही वाचा… Sharad Pawar : जाहीर सभेत शरद पवारांनी महिला मुख्यमंत्रीपदाबाबत केले मोठे वक्तव्य
महायुतीला लोकसभेत फटका बसला म्हणून लाडकी बहीण योजना आणली. निवडणुका डोळ्यासमोर ठेवून दोन-तीन महिन्यांचे पैसे आगावू दिले. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर यांना बहिणीची आठवण झाली, असा टोला शरद पवार यांनी लगावला. त्याचवेळी राज्यात वर्षभरात ६७ हजार ३८१ महिलांवर अत्याचाराच्या घटना घडल्या तर ६३ हजार महिला बेपत्ता झाल्याची नोंद आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधून महिलांची सुरक्षा सर्वाधिक महत्त्वाची असल्याचे सांगितले. राज्यात आजच्या बहिणींची अवस्था पाहून यांना राज्य चालवण्याचा आधिकार नाही असे सांगतानाच यांच्या हातात पुन्हा सत्ता येता कामा नये, असे आवाहन त्यांनी केले.
राज्यात सुशिक्षित तरुणांना काम मिळत नसल्याने त्यांच्यात नैराश्य आले आहे. दर्जेदार शिक्षण नाही, महागाईचा भडका उडाला आहे, शेतकऱ्यांचे पिकाला योग्य भाव मिळत नाही. शेतकरी करत असलेल्या आत्महत्या आदी बाबींवर शरद पवारांनी सत्ताधाऱ्यांवर टीका केली. प्रलंबित प्रश्न सोडवण्याकडे सत्ताधारी लक्ष देत नाहीत. या ठिकाणी दिघी पोर्ट विकसित होत असताना शेतकऱ्यांच्या, ग्रामस्थांच्या जमिनी हस्तांतरित करण्यात येत आहेत. त्यांना न्याय देण्यासाठी आणि स्थानिकांना रोजगार मिळण्यासाठी मी संबंधितांकडे चर्चेला बसेन, अशी ग्वाही शरद पवार यांनी जाहीर सभेत दिली. त्याचवेळी महाविकास आघाडीच्या उमेदवाराला निवडून देण्याचे आवाहन त्यांनी केले.
काँग्रेसचे पदाधिकारी गैरहजर
श्रीवर्धन मतदारसंघात काँग्रेसचे राजेंद्र ऊर्फ राजाभाऊ ठाकूर यांनी बंड करून अपक्ष अर्ज दाखल केला आहे. त्यानंतर काँग्रेसच्या पाच तालुकाध्यक्षांनी आणि पदाधिकाऱ्यांनी राजेंद्र ठाकूर यांना साथ देण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे शरद पवार यांच्या सभेसाठी काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित नव्हते.
(Edited by Avinash Chandane)