घररायगडआधुनिक युगातही पाथरवटांची कला जिवंत

आधुनिक युगातही पाथरवटांची कला जिवंत

Subscribe

बदलत्या आणि आधुनिक युगात घरगुती वापराची अनेक यांत्रिक उपकरणे उपलब्ध होत असली तरी गाव खेड्यांतूनच नव्हे तर शहरातही काही प्रमाणात पाटा-वरवंटा, खलबत्ता यासारख्या दगडी वस्तू वापरात असल्याने या अशा वस्तू लीलया घडविणार्‍या पाथरवटांची कला अद्यापही जिवंत आहे.

बदलत्या आणि आधुनिक युगात घरगुती वापराची अनेक यांत्रिक उपकरणे उपलब्ध होत असली तरी गाव खेड्यांतूनच नव्हे तर शहरातही काही प्रमाणात पाटा-वरवंटा, खलबत्ता यासारख्या दगडी वस्तू वापरात असल्याने या अशा वस्तू लीलया घडविणार्‍या पाथरवटांची कला अद्यापही जिवंत आहे. पूर्वांपार चालत आलेली बलुतेदार पद्धती कालौघात मोडीत निघाली तरी त्यात पाथवटांची अशा वस्तूंसाठीची गरज मोडीत निघालेली नाही. त्यामुळे अनेकांची मुले शिक्षणामुळे या व्यवसायाकडे येण्यास तयार नसली तरी काही कुटुंबांनी आपला पिढ्यान् पिढ्या चालत आलेला व्यवसाय मोठ्या जिद्दीने पुढे चालू ठेवला आहे. अनेक ठिकाणी ठराविक दिवसांत हे पाथरवट जाऊन आपला व्यवसाय करतात. चार दिवसांपासून मुंबई-गोवा महामार्गावर येथे जुन्या पोलीस ठाण्यासमोर एक पाथरवट जाते, खलबत्ते, दिवा (चाड), पाटा-वरवंटा आदी दगडी स्वतः घडवून विक्रीस मांडत असल्याचे दिसत आहे.

अधिक चौकशी केली असता हा पाथरवट पिशोरगाव (ता. कन्नड, जि. औरंगाबाद) येथील मूळचा रहिवासी असल्याचे समजले. शेषराव सुरे हे वडिलोपार्जित चालत आलेले पाथरवटाचे काम करीत असून, दरवर्षी उन्हाळ्यात वेगवेगळ्या गावी, तालुक्याच्या ठिकाणी बाजारपेठ किंवा मोक्याच्या जागी व्यवसाय करीत असताात. यावर्षी त्यांचा मुक्काम पोलादपुरात आहे.
कुतुहलापोटी त्यांना बोलते केले तेव्हा त्यांच्या मेहनतीला आणि जिद्दीला खरोखर सलाम करावासा वाटतो. सुरे म्हणतात, आपले फारसे शिक्षण झालेले नाही. घराण्यात ही कला आणि व्यवसाय वंशपरंपरेने चालत आलेला आहे. आजच्या यांत्रिकीकरणाच्या युगात घरगुती जाते, पाटा, उखळ, दिवा, गोलवाला खलबत्ता, टोपीवाला खलबत्ता या नित्य वापराच्या वस्तूंऐवजी त्यांची जागा मिक्सर, ग्राईंडरने घेतल्याने त्याचा परिणाम आमच्या पारंपारिक व्यवसायावर झाला, त्यामुळे पूर्वीप्रमाणे हुकमी बाजारपेठ मिळविताना त्रास होत असल्याचे सांगितले.

- Advertisement -

यामुळे अनेक पाथरवटांनी आपले व्यवसाय बदलले. मात्र तरीही गाव, खेड्यांतून, इतकेच नव्हे तर गावाकडून शहराकडे गेलेल्या अनेकांच्या घरी पाटा-वरवंटे, जाती, उखळ याचा वापर केला जाते आहे आणि म्हणून आमची कला जिवंत असल्याचे सुरे मोठ्या उत्साहाने सांगतात. अशा वापरामागचे कारणही त्यांनी स्पष्ट केले. जात्यावर दळलेल्या पिठाची भाकरी, खलबत्यामध्ये कुटलेला मसाला किंवा पाटा-वरवंट्यावर स्वयंपाकासाठी हाताने तयार केलले मसाल्याचे वाटण यामुळे जेवणाची लज्जत वाढते. त्यामुळे दर्दी ग्राहक दगडी वस्तुंनाच प्राधान्य देत असतात.

या वस्तू तयार करण्यासाठी लागणारा नरम दगड वीस हजार रुपये भाडे मोजून औरंगाबादहून आणल्याचे सुरे यांनी सांगितले. आपल्याकडे तीन गाढवे असून, आपले महुणे त्यांच्यावर विविध वस्तू लादून गावोगावी विक्रीसाठी नेत असल्याचे ते म्हणाले. कुणाची चाकरी करण्यापेक्षा कष्टाची भाकरी बरी, असे ते अभिमानाने सांगतात. गावी शेत आणि शेळ्या असून, त्याकडे कुटुंबातील इतर व्यक्ती लक्ष देत असल्याचे सुरे यांनी शेवटी सांगितले.

- Advertisement -

असे आहेत दर…

  • पाटा-वरवंटा १५०० रुपये
  • खलबत्ता ३०० रुपये
  • दिवा १५० रुपये

(बबन शेलार – लेखक पोलादपूरचे वार्ताहर आहेत.)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -