Friday, February 26, 2021
27 C
Mumbai
घर रायगड कोरोनाचे भूत पुन्हा मानगुटीवर

कोरोनाचे भूत पुन्हा मानगुटीवर

वेध परिसराचा / रायगड

Related Story

- Advertisement -

गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचे रुग्ण आढळण्याचे प्रमाण हळूहळू वाढत असल्याचे निदर्शनास आले आहे. मुंबईत रेल्वे सुरू झाली आणि कोरोनाचे प्रमाण वाढले असे सांगितले जात असले तरी ते पूर्ण सत्य मानणे योग्य वाटत नाही. इतर प्रवासी वाहतुकीच्या गर्दीचे काय, हाही सवाल मग समोर येतो. खर तर लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर कोरोनाबाबत जी काही बेफिकीरी दाखविण्याची अघोषित स्पर्धा चालू झाली तेव्हाच अनेकांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली होती. आता ही शंका खरी ठरू लागली आहे.

गेल्या मार्चपासून सर्वत्र कोरोनाने हाहाकार माजविण्यास सुरुवात केली. लॉकडाऊनचे अस्त्र वापराण्यात आले. अनेकांना पोलिसांकडून दंडुक्याचा ‘प्रसाद’ही मिळाला. अनेक दिवस कोरोनाने दहशत माजवली. त्यातून आता कुठे स्थिरस्थावर होईल असे वाटत असताना कोरोनाचे रुग्ण वाढू लागले आहेत. मुंबईत कोरोनाचे संकट घोंगावू लागल्याने शेजारच्या रायगडमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होणे स्वाभाविक आहे. कोरोनाच्या काळात थंडावलेले उद्योग पुन्हा उभारी घेण्याच्या तयारी असताना कोरोनाचे भूत मानगुटीवर बसणे परवडणारे नाही. पर्यटन व्यवसायावर याचा मोठा विपरित परिणाम अनुभवायला मिळाला. त्यामुळे यदाकदाचित् कोरोनाचा जोर वाढला तर& या शंकेने सर्वच व्यावसायिक धास्तावले असतील यात शंका नाही.

- Advertisement -

कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे मुख्यमंत्र्यांनी पुन्हा एकदा लॉकडाऊनचा इशारा दिला आहे. राज्याचे प्रमुख म्हणून त्यांनी हा इशारा देणे ठीक आहे. पण कोरोनाबाबत निष्काळजीपणा दाखविणार्‍यांना कठोरपणे आवरण्यात शासन यंत्रणाही कुठेतरी कमी पडतेय हे नाकारून चालणार नाही. साधा मास्क न वापरणार्‍यांनाही अलिकडे कुणी विचारेनासे झाले. त्यामुळे एक प्रकारचा निर्धास्तपणा आला होता. इशारे देऊन आर्थिक चक्रव्युहात पिचलेली जनता आता काही ऐकेल असे समजणे भाबडेपणाचे ठरेल. अनेकांच्या नोकर्‍या गेल्या आहेत, व्यवसाय बुडाले आहेत. त्यांना पुन्हा लॉकडाऊन परवडणारा नाही. मात्र साधी काळजी घेण्याचे सौजन्यही दाखविले जात नाही, असा विचित्र विरोधाभास आहे.

नियम पाळा, शिस्त पाळा असे आता शासनकर्ते ओरडून सांगत असले तरी त्यांनीही त्यांच्या दौर्‍यांतून कार्यकर्त्यांची जी जत्रा भरते त्याला आवर घातला पाहिजे. कोरोना काळात चक्रीवादळानंतर मुख्यमंत्र्यांपासून मंत्री, ज्येष्ठ सनदी अधिकार्‍यांनी रायगडला भेट दिली तेव्हा सोशल डिस्टन्सिंगचा कसा फज्जा उडवला जातोय याचा सचित्र वृत्तांत प्रसार माध्यमांनी वेळोवेळी दिला. त्याचा काही उपयोग झाला नाही. नेता आला की भक्तांची गर्दी आली हे खरे असले तरी कोरोना काळात अशी गर्दी परवडण्यासारखी आहे का, याचे तारतम्य नेत्यांनीही ठेवायला पाहिजे. कायद्याचा बडगा एकतर्फी उगारला जाता कामा नये.
जिल्ह्यात पनवेल तालुक्यात नव्याने रुग्ण आढळून आले आहेत. त्यावेळीही पनवेलमध्येच रुग्ण संख्या मोठी होती. अर्थात पनवेल हा जुळ्या मुंबईचाच एक भाग झाल्याने कोरोनाची आदान-प्रदान होण्याचा पुन्हा धोका आहे. आता कुणाला घरात गप्प बस असे सांगितले तर ऐकणार नाही. मात्र न ऐकणार्‍यांनी स्वतःसह कुटुंबाची काळजी घेणेही तितकेच महत्त्वाचे आहे. मास्क न वापरणे, सॅनिटायझरचा वापर न करणे, सोशल डिस्टन्सिंग न पाळणे हे कोरोना वाढण्याचे मूळ कारण आहे. आज अनेकजण हनुवटीवर मास्क ठेवण्यात धन्यता मानतात. अलिकडे सॅनिटायझरचा खप लक्षणीयरित्या कमी झालेला आहे. बाहेरून आल्यानंतर हात-पाय स्वच्छ धुण्याचीही तसदी घेतली जात नाही.

- Advertisement -

कोरोना काळात बंद झालेल्या शाळा टप्प्याटप्प्याने सुरू होत आहेत. आता नव्याने येऊ घातलेले संकट शिक्षण क्षेत्रासाठी हानीकारक ठरण्याची शक्यता आहे. अनेक शिक्षकांनी कोरोनाची चाचणी करून घेतलेली नाही. दुसरीकडे मुले घरी असल्याने त्यांचा भटकंतीच वेळ जात असल्याच्या तक्रारी दस्तुरखुद्द पालकच करीत आहेत. मुलांना शाळेत पाठविण्यास राजी नसलेले पालक याच मुलांना गर्दीच्या ठिकाणी, बाहेरगावी फिरायला नेतात हाही एक मोठा विरोधाभास आहे.
खर तर कोविड-१९ ने खूप मोठा धडा शिकविलेला आहे. पण त्याला गंभीरतेने घेण्याची मानसिकता नाही. प्रत्येकजण कोरोनाचा अर्थ आपापल्या पद्धतीने लावत आहे. प्रशासनाची ढिलाई आणि जनतेची बेपर्वाई परवडणारी नाही. फुकाचे इशारे देण्याऐवजी काही ठोस कार्यवाही करून कोरोनाला रोखण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत. (कुचेष्टेचा विषय ठरलेला) लॉकडाऊन पुन्हा लागला तर मग मात्र काही खरे नाही, याची प्रत्येकाने जाणीव ठेवून स्वयंशिस्त पाळणे हाच कोरोनाला बर्‍यापैकी आवरण्याचा रामबाण उपाय आहे.

- Advertisement -