साडेतीन वर्षांच्या शर्विकाची कळसुबाईवर चढाई!

जागतिक विक्रमवीर बाल गिर्यारोहक शर्विका जितेन म्हात्रे हिने पुन्हा एक विश्वविक्रम नोंदवून महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे.

जागतिक विक्रमवीर बाल गिर्यारोहक शर्विका जितेन म्हात्रे हिने पुन्हा एक विश्वविक्रम नोंदवून महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे. तिने महाराष्ट्रातील सर्वोच्च कळसुबाई शिखर वयाच्या अवघ्या साडेतीनव्या वर्षी सव्वातीन तासात सर करून सलग दहावा विक्रम आपल्या नावे नोंदविला आहे. शर्विका ही तालुक्यातील लोणारे गावची कन्या असून तिने यापूर्वी २३ किल्ले सर केले आहेत. नुकतीच तिची महाराष्ट्रातील सर्वात उंच किल्ला सर केल्यामुळे पाच रेकॉर्डमध्ये नोंद झाली होती आणि पुन्हा एकदा ७२ व्या प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर सर करून स्वतःसह महाराष्ट्राचे नाव इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड, आशिया बुक ऑफ रेकॉर्ड, वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड, डायमंड बुक ऑफ रेकॉर्ड आणि ओएमजी बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंदविले आहे. महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर सर करणारी शर्विका जगातील सर्वात लहान गिर्यारोहक ठरली आहे.

मराठी भाषा संवर्धन पंधरवड्याच्या निमित्ताने तिने शिखरावर पोहचून मराठी भाषा संवर्धन आणि विकास यावर आधारित संदेश दिले आहेत. त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील गड-किल्ले संवर्धन करणार्‍या समस्त दुर्गसेवकांना मानवंदना दिली आणि सीमेवर लढणार्‍या जवानांना आणि मराठी साहित्य विश्वाला ही मोहीम समर्पित केली आहे. तिच्या या मोहिमेत ३५ गिर्यारोहकांनी तिला साथ दिली. यात यामध्ये डॉक्टर्स, पोलीस, वकील, शिक्षक, त्याचप्रमाणे साहित्य संपदा संस्थेचे विविध साहित्यिक सहभागी झाले होते. मोहिमेच्या समारोपानंतर साहित्य संपदा संस्थेतर्फे शिखराच्या पायथ्याशी शर्विकाची ग्रंथतुला करण्यात आली. तिच्या वजनाची सर्व पुस्तके गरजू शाळांना देण्यात येणार आहेत.

हेही वाचा –

लहान मुलीचा हात पकडणे, पॅण्टची चैन उघडणे हे लैंगिक शोषण नाही – हायकोर्ट