घररायगडआदिवासींचा उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयावर निषेध मोर्चा, महिलांवरील हल्ल्यातील आरोपी मोकाट

आदिवासींचा उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयावर निषेध मोर्चा, महिलांवरील हल्ल्यातील आरोपी मोकाट

Subscribe

कर्जत उपविभागीय पोलिस अधिकारी यांची भेट घेण्यासाठी आदिवासी संघटनेचे शिष्टमंडळ गेले होते. यामध्ये फिर्यादी महिलेचे वकील अ‍ॅड. सुमित साबळे हे देखील होते. यावेळी मारहाणीचा व्हिडिओ पाहताना या महिला रानटीच दिसतात असे आक्षेपार्ह शब्द उपविभागीय पोलिस अधिकारी व तपासी अधिकारी यांनी वापरल्याचे सुमित साबळे यांनी सांगितले.

तालुक्यातील मौजे ताडवाडी येथे ४ फेब्रुवारी रोजी आदिवासी महिलांवर प्राणघातक हल्ला करण्यात आला होता. जागेचा वाद असताना तिथे काम करणार्‍यांना अडवायला गेलेल्या महिलांवर झालेल्या हल्ल्यात त्या रक्तबंबाळ झाल्या होत्या. या प्रकरणातील मुख्य सूत्रधार मोकाट असल्याने आदिवासी संघटना आक्रमक झाली आहे. महिलांना न्याय मिळवून देण्यासाठी कर्जत तालुक्यात आदिवासी संघटनेकडून निषेध मोर्चा काढण्यात आला होता. आदिवासी ढोर नाही माणूस हाय, आम्हाला न्याय मिळालाच पाहिजे, गुंडांना पाठीशी घालणार्‍या पोलिसांचा धिक्कार असो अशा घोषणांनी कर्जत दुमदुमले होते. उपविभागीय पोलिस अधिकारी यांच्याकडून पीडित महिलेला रानटी असे संबोधले गेल्याचा आरोप करण्यात आल्याने त्यांचा देखील धिक्कार करण्यात आला.

कर्जत तालुक्यातील ताडवाडी येथील स.नं. ३३ हिस्सा नं. २ क्षेत्र सन २०१५ पर्यंत ७/१२ उतार्‍यावर रामू कमळु खंडवी यांचे नावे कुळ म्हणुन होते. परंतु कोणतीही पूर्वसूचना कार्यवाही न होता या मिळकतीच्या ७/१२ सदरी असलेले रामू कमळु खंडवी यांचे नाव कमी झाले. कृष्णकुमार ठाकुर व आदिवासी कुळ रामू कामळु खंडवी यांच्यातील हे प्रकरण तालुकास्तरावर तहसीलदार यांच्या न्यायालयात लोकशाही दिनांमध्ये न्यायप्रविष्ट होते. मात्र,कृष्णकुमार ठाकुर यांनी सर्व नियम व कायदा धाब्यावर बसवून आदिवासी शेतकरी असल्याचा गैरफायदा घेत विवादित जागेवर काम सुरू केले. आपल्या जागेवर काम सुरू असल्याचे समजताच तुळसीबाई अनंता खंडवी व इतर आदिवासी महिला या काम थांबवायला गेल्या होत्या. मात्र, तेथील मिळकतीचे मुख्य भोगवटादार कृष्णकुमार ठाकुर त्यांचे कामगार अमोल पाटील, गणेश गोविंद घोडविंदे व त्यांचे पाच सहकारी यांनी आदिवासी महिलांवर जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यात महिला रक्तबंबाळ झाल्या होत्या. पोलिस ठाण्यात याबाबत तक्रार दाखल होऊन अमोल पाटील व इतरांवर गुन्हे दाखल झाले मात्र, या घटनेचा मुख्य सुत्रधार कृष्ण कुमार ठाकूर यांच्यावर गुन्हा दाखल झालेला नाही. गुन्हेगार अद्याप मोकाट असल्याने पोलिस खात्याकडून त्यांना पाठीशी घातले जात असल्याचा आरोप आदिवासी संघटनेने केला आहे.

- Advertisement -

याचा निषेध करण्यासाठी सोमवारी आदिवासी ठाकूर उन्नती सामाजिक संस्थेकडून मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी १२ वाजता हा मोर्चा कर्जत रॉयल गार्डन येथून निघाला पुढे मुद्रे, कचेरी रोड मार्गे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाला अभिवादन करून पुढे बाजारपेठ, लोकमान्य टिळक चौक येथून महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाला अभिवादन करून हा मोर्चा उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालयात दाखल झाला. यामध्ये आजाद समाज पार्टी, भीम आर्मी, आरपीआय आठवले गट, कोंढाणा फाऊंडेशन यांनी सक्रिय सहभाग घेतला. तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पाठिंब्याचे पत्र दिले.

मुख्य सुत्रधार कृष्णकुमार ठाकुर याच्यावरवर अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा १९८९ नुसार गुन्हा दाखल करून त्वरीत अटक करा, एकसर्बिया कंपनीचे अमोल पाटीलसह आरोपींना तात्काळ अटक करा, पीडित आदिवासी महिलांना संरक्षण मिळावे, पोलिस ठाण्यात आदिवासींना योग्य वागणूक मिळावी, आदिवासींना वनवासी बोलणार्‍यावर अ‍ॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हे दाखल करा, आदिवासी कुळांचे ७/१२ एडिट करून नावे कमी केलेल्या संबंधीत अधिकारी व कर्मचारी यांच्यावर गुन्हे दाखल करून कडक कारवाई करा, आदिवासी महिलांवर दाखल केलेले खोटे गुन्हे त्वरित गुन्हे मागे घ्या, ग्रामीण व उपजिल्हा रुग्णालयात जखमी आदिवासी महिलांना योग्य उपचार दिले नसल्याने संबंधित डॉक्टरांवर कारवाई करा, अशा मागण्या आदिवासी संघटनेने केल्या आहेत.

- Advertisement -

यावेळी कर्जत पंचायत समितीच्या उपसभापती जयवंती हिंदोळा, आजाद समाज पार्टीचे महाराष्ट्र उपाध्यक्ष सुमित साबळे, रायगड प्रभारी सिद्धार्थ सदावर्ते, कोंढाणा फाऊंडेशनचे अध्यक्ष सुनील गायकवाड, आदिवासी ठाकूर उन्नती सामाजिक संस्थेचे अध्यक्ष भरत शीद, उपाध्यक्ष परशुराम दरवडा, दत्तात्रेय निरगुडे, मंगल केवारी, अर्जुन केवारी, मोतीराम पादिर, रेवता ढोले, नीलम ढोले, आदीसह मोठ्या प्रमाणात आदिवासी कार्यकर्ते उपस्थित होते.

कर्जत उपविभागीय पोलिस अधिकारी यांची भेट घेण्यासाठी आदिवासी संघटनेचे शिष्टमंडळ गेले होते. यामध्ये फिर्यादी महिलेचे वकील अ‍ॅड. सुमित साबळे हे देखील होते. यावेळी मारहाणीचा व्हिडिओ पाहताना या महिला रानटीच दिसतात असे आक्षेपार्ह शब्द उपविभागीय पोलिस अधिकारी व तपासी अधिकारी यांनी वापरल्याचे सुमित साबळे यांनी सांगितले. त्यामुळे या अधिकार्‍यांचा आम्ही धिक्कार करतो. तसेच याबाबत न्यायालयात दाद मागणार असल्याची माहिती साबळे यांनी दिली. मोर्चाच्या इशार्‍यानंतर आरोपी अटक करण्यात आली. त्यामुळे पोलिसांच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत. त्यामुळे वाडी प्रकरणात केलेल्या वक्तव्यावर फिर्यादी न्यायलायात दाद मागणार असल्याने नुकतेच कर्जत तालुक्यात रुजू झालेले उपविभागीय पोलिस अधिकारी यांच्या अडचणीत वाढ होण्याची चिन्हे आहेत.

कर्जत उपविभागीय पोलीस अधिकारी विजय लगारे हे नसल्याने खालापुरचे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ संजय शुक्ला हे उपस्थित होते. आदिवासी संघटना व शिष्टमंडळाने यावेळी डॉ.शुक्ला यांच्याशी चर्चा केली. यामध्ये आजाद समाज पार्टीचे महाराष्ट्र उपाध्यक्ष सुमित साबळे यांनी आदिवासी समाजाचे प्रश्न त्यांच्यासमोर मांडले. आरोपी अमोल पाटील याला अटक करण्यात आली आहे. तर कायद्याच्या बाजू पडताळून आपल्या मागण्यांबाबत लवकर कार्यवाही केली जाईल असे ग्वाही त्यांनी दिल्याने हा मोर्चा स्थगित करण्यात आला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -