आदिवासींना लॉकडाऊनचा फटका उदरनिर्वाह करणे बनले कठीण

कोरोनाच्या थैमानानंतर लावण्यात आलेल्या लॉकडाऊनचा आदिवासींना फटका बसला असून, त्यांच्यासमोर रोजीरोटीचा अर्थात उदरनिर्वाहाचा प्रश्न उभा ठाकला आहे.

जंगल, डोंगर-दर्‍या पालथ्या घालत येथे रानमेवा विकण्यासाठी येणार्‍या आदिवासी महिला सकाळी मुळातच उशिरा येत असताना त्यांना ११ वाजल्यानंतर रानमेवा विक्रीसाठी रस्त्याकडेला बसण्यास मज्जाव करण्यात येतो. कंदमुळे, पालेभाजी याचीही या महिला विक्री करतात. बाजारपेठेतील महाराष्ट्र स्वीटजवळ, गांधी चौक, राजपाल नाका, आनंद नगर आदी ठिकाणी बसून या महिला भाजीपाला, रानमेवा विक्रीचा व्यवसाय करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. सध्या शेवळी, कंदमुळे, आळू, जांभुळ, शेतात पिकविलेल्या गावठी भाज्या, करवंद आदी विक्रीसाठी आणले जाते. लॉकडाऊनमुळे घरातील पुरुषांच्या मजुरीचा मार्गही बंद झाल्याने कुटुंबाचा चरितार्थ केवळ भाजीपाला आदी विक्रीवरच अवलंबून आहे.

आम्ही गावठी भाजी आणतो. पण येईपर्यंत उशीर झाला की भाजी विकली जात नाही. एकतर लांबून यावे लागते. त्यात भाजी पण शिल्लक राहते. मेहनत करून पिकवलेली भाजी सुकून जात असल्याने डोळ्यात पाणी येते.
-सगुणाबाई कातकरी, चिरनेर

कोरोना महामारीमुळे लोकांना रोजगार नाहीत. त्यामुळे सर्वसामान्य संपूर्ण होरपळून निघाले आहेत. परंतु त्याबरोबर आदिवासी बांधव जे मोसमी फळे किंवा रानमेवा, भाजी विकून उदरनिर्वाह करतात त्यांना लॉकडाऊनमुळे व्यवसाय करता येत नसल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. राज्य शासनाकडून आदिवासींना अनुदान द्यावे.
– नरेंद्र भगत, सामाजिक कार्यकर्ते, भेंडखळ, ता. उरण