महाडमध्ये सापडल्या ५०० रुपयाच्या एकच नंबरच्या दोन नोटा, छबिना उत्सवात बनावट नोटा वितरण झाल्याचा संशय

महाडचे ग्रामदैवत श्री विरेश्वर महाराज यांचा छबिना उत्सव नुकताच साजरा झाला. यामध्ये लाखो भाविक महाडमध्ये आले होेते. शिवाय परभणी जिल्ह्यातून परराज्यातून विविध खेळण्यांची दुकाने देखील आली होती.

महाड शहरामध्ये दोन दुकानांमधून एकाच नंबरच्या पाचशे रुपयांच्या दोन नोटा सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. नुकत्याच झालेल्या छबिना उत्सवात बनावट नोटांचा वापर झाला असावा असा संशय व्यक्त होत आहे.

महाडचे ग्रामदैवत श्री विरेश्वर महाराज यांचा छबिना उत्सव नुकताच साजरा झाला. यामध्ये लाखो भाविक महाडमध्ये आले होेते. शिवाय परभणी जिल्ह्यातून परराज्यातून विविध खेळण्यांची दुकाने देखील आली होती. याच दरम्यान गर्दीचा फायदा उठवत कोणीतरी बनावट नोटा वितरीत केल्या असाव्यात असा संशय व्यक्त होत आहे. येथील एका हॉटेल व्यावसायिकाला त्याच्याकडे असलेली पाचशे रुपयाची नोट बनावट असल्याचा संशय आला. ती नोट तो समोरच असलेल्या एका पान टपरीवर दाखवण्यास गेला असता पान टपरीवाल्याकडे देखील अशाच प्रकारची नोट असल्याचे त्याने सांगितले. या दोघांनी नोटेवरील नंबर तपासला असता नंबर एकच असल्याचे दिसून आले.

नोटेवरील क्रमांक ४ डीआर ०८०७०९ असा आहे. या नोटा मोजणी यंत्रामध्ये टाकल्या असता यंत्राने देखील त्या बनावट असल्याचा मेसेज दिला. छबिना उत्सवातील गर्दीचा फायदा दोन्ही दुकानदारांना बनावट नोटा दिल्याचा संशय व्यक्त होत आहे. यामुळे महाड बाजार पेठेत आणखी नोटा वितरित झाल्या असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. वरील नंबरची नोट आढळून आल्यास तिची खात्री करावी असे आवाहन बँकांकडून करण्यात आले आहे.

नागरिकांनी आपल्याकडील नोटा तपासून घ्याव्यात. अधिकाधिक डिजिटल देवाण-घेवाणीचा उपयोग करून अशा प्रकारच्या नकली नोटापासून मुक्ती मिळवता येईल.
– किसलय कुमार, शाखा अधिकारी, स्टेट बँक ऑफ इंडिया, महाड