घररायगडमिक्सर, ग्राईंंडरच्या काळातही पाटा वरवंट्याचा वापर; महामार्गावर पारंपरिक साधनांची विक्री

मिक्सर, ग्राईंंडरच्या काळातही पाटा वरवंट्याचा वापर; महामार्गावर पारंपरिक साधनांची विक्री

Subscribe

सध्याच्या इलेक्ट्रॉनिक युगात मिक्सर आणि ग्राईंडरचा वापर सर्वत्र केला जात असताना पारपंरिक पाटे - वरवंटे जवळपास हद्दपार झाल्याचे चित्र होते. मात्र ग्रामीण भागातही मसाले, आले, लसूण वाटण्यासाठी पाटे - वरवंटे यांना मागणी कायम असल्याचे दिसून येत आहे. मुंबई -गोवा महामार्गावर पेण परिसरात दगड फोडणार्‍या कारागिरांनी मोठ्या प्रमाणात पाटे - वरवंटे सारखी पारपंरिक साधने विक्रीसाठी आणली आहेत.

मितेश जाधव: पेण
सध्याच्या इलेक्ट्रॉनिक युगात मिक्सर आणि ग्राईंडरचा वापर सर्वत्र केला जात असताना पारपंरिक पाटे – वरवंटे जवळपास हद्दपार झाल्याचे चित्र होते. मात्र ग्रामीण भागातही मसाले, आले, लसूण वाटण्यासाठी पाटे – वरवंटे यांना मागणी कायम असल्याचे दिसून येत आहे. मुंबई -गोवा महामार्गावर पेण परिसरात दगड फोडणार्‍या कारागिरांनी मोठ्या प्रमाणात पाटे – वरवंटे सारखी पारपंरिक साधने विक्रीसाठी आणली आहेत. ‘जुन ते सोनं’ या उक्तिचा प्रत्यय करुन देणार्‍या या साधनांमध्ये कांडण – कुटण, दळण आणि वाटण करण्यासाठी पाटा – वरवंटा, जाते, उखळ – मुसळ आदी गृहपयोगी वस्तू असल्याचे दिसून येते. काळाच्या ओघात या वस्तू अथवा ही साधने लुप्त होत चालली असून अलिकडे त्याची जागा वीजेवर चालणार्‍या मिक्सर, ग्राईंडर यासारख्या विविध उपकरणांनी घेतली आहे.
ग्रामीण भागांमध्ये पूर्वी दळण दळण्यासाठी जाते असायचे. घरातील महिला भल्या पहाटे उठून जात्यावर ओवी गात दळण दळायच्या. रोज सकाळी दळण दळून झाल्यानंतरच घरामध्ये भाकरीसाठी पीठ उपलब्ध होत असे. याशिवाय भाजीसाठी लागणारे तिखट मसाला हे कांडण केल्यानंतरच उपलब्ध होत असे . यासाठी प्रत्येक घरांमध्ये दगडी पाटा वरवंटा उखळ असायचे. लाकडी वस्तूमध्ये कांडण करण्यासाठी मुसळ असायचे. त्याचबरोबर घरांमध्ये दूध, दही मुबलक रहायचे. दहीचे घुसळून करून ताक, लोणी काढण्यासाठी रवी असायची. अलिकडच्या काळात या वस्तू दुर्मिळ होत चालल्या आहेत. दगडी पाटा, वरवंटाची जागा आता मिक्सरने घेतली आहे. गावागावात आता मोजक्याच घरी हे साधन दिसून येत आहे . कधी काळी पाटा टाचवणारे पाथरवट गावागावात फिरून ‘आहे का पाटा टाचवायचा…’ अशी हाक देत असायचे, ती हाक आता कालबाह्य होत आहे .

भाजीची चवही झाली हद्दपार
काळाबरोबर घरातील वस्तू बदलल्या. या ओघात जगण्यासाठी वापरण्यात येणारी साधनेही बदलली आहेत. जुनी साधने जाऊन नवीन साधने आली. मात्र काही जुन्या साधनांनी आपली जागा आजही कायम ठेवली आहे. पाटा हे त्यापैकीच एक साधन आहे. या पाट्या वरील जेवणाची चव काही औरच. स्वयंपाक करताना पाटा – वरवंटा उखळाच्या माध्यमातून तिखट मसाल्याचे कांडन कुटन करून भाजी केली जायची. त्या भाजीची चव काही औरच असायची पण आता बदलत्या काळानुसार यंत्रसामुग्रीच्या माध्यमातून कांडणा कुटन केले जात असून भाजीची चवही हद्दपार झाली आहे.

- Advertisement -

संसार वैभवाच्या वस्तू होताहेत इतिहासजमा
पूर्वी घराचे वैभव म्हणून सांभाळल्या जाणार्‍या या वस्तू आता आधुनिक यंत्रयुगात घरांमध्ये अडचणीचे ठरत आहेत आणि त्यांची जागा वीजेवर चालणार्‍या आधुनिक उपकरणांनी घेतली आहे. विशेष म्हणजे ग्रामीण भागातही शहरी भागाचे अनुकरण होत असल्यामुळे अशा वस्तू ग्रामीण भागातील घरातूनही हद्दपार होत असल्याचे दिसून येते. त्यामुळे कधीकाळी संसाराचे वैभव मानल्या जाणार्‍या या वस्तू आता इतिहासजमा होत असल्याची खंत आता वयाची साठी ओलांडलेल्या वयस्क व्यक्त करीत आहेत.

पाटा निर्मितीचे काम कष्टाचे
पाटा हा सपाट दगडापासून बनविला जातो. त्यासाठी पाथरवटांना तशा आकाराच्या दगडांचा शोध घ्यावा लागतो. सध्या तालुक्यातील मुंबई -गोवा महामार्गावर वाशी, रामवाडी, वडखळ, तरणझोप येथे काही पाथरवट या पाट्यांची निर्मिती करुन ते विक्रीसाठी आणले आहेत. पाटे तयार करताना दगडावर घाव घालत हातावर घाव सोसावे लागतात. हे काम खूप मेहनतीचे आणि कष्टाचे असून मागणी कमी झाल्याने पाहिजे तसे मोलही मिळत नसल्याची खंत असे पाटा असे पाटा विक्रेत्याने व्यक्त केली.

- Advertisement -

 

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -