घररायगडप्रदूषणाचा ‘किल्ला’ लढविणार्‍या किल्लेदारांची दमछाक?

प्रदूषणाचा ‘किल्ला’ लढविणार्‍या किल्लेदारांची दमछाक?

Subscribe

जल आणि वायू प्रदूषणामुळे तालुक्यातील धाटावचा परिसर हैराण झालेला असल्याने यावर मात करण्यासाठी राज्याच्या पर्यावरणमंत्र्यांनी व्ही. व्ही. किल्लेदार यांची उप प्रादेशिक अधिकारी म्हणून नियुक्ती केली.

जल आणि वायू प्रदूषणामुळे तालुक्यातील धाटावचा परिसर हैराण झालेला असल्याने यावर मात करण्यासाठी राज्याच्या पर्यावरणमंत्र्यांनी व्ही. व्ही. किल्लेदार यांची उप प्रादेशिक अधिकारी म्हणून नियुक्ती केली खरी, पण त्यांच्या दमबाजीनंतरही कारखान्यांतून पावसाची संधी साधत पुन्हा एकदा जल आणि वायू प्रदूषणाला सुरुवात झाल्याने प्रदूषणाचा हा किल्ला लढविताना किल्लेदार यांची दमछाक झाली की काय, असा उपहासात्मक सवाल जनता विचारू लागली आहे. दरम्यान, होणारे प्रदूषण आमच्या कारखान्यांचे नव्हेच, अशी भूमिका कारखानदार घेत असल्याने प्रदूषणाचा नेमका उगम समजणे काहीसे अवघड होत आहे.

गेल्या काही दिवसांपासून धाटाव आणि परिसरामध्ये पावसाचे दमदार पुनरागमन झाले असून, एका बाजूला शेतकरी सुखावला असतानाच कारखानदारही सुखावले आहेत. कारण पावसाची संधी साधत तुडुंब भरलेल्या नाल्यात रसायनमिश्रित सांडपाणी सोडले जात असून, साचलेला विषारी किंवा हानीकारक वायू बिनदिक्कतपणे हवेत सोडला जात आहे. यापूर्वी नाले आणि गटारांतून रसायन सोडले जात असल्याने स्थानिकांनी आवाज उठवताच महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे उप प्रादेशिक अधिकारी किल्लेदार यांनी कारखाना असोसिएशनचे पदाधिकारी, कारखानदार आणि कंपन्यांचे प्रतिनिधी यांची संयुक्त बैठक घेत प्रदूषण थांबवा अथवा कारवाईला सामोरे जा, असा सज्जड दम भरला होता.

- Advertisement -

मात्र पाऊस सुरू होताच पुन्हा ‘येरे माझ्या मागल्या’ असा प्रकार सुरू झाला असून, जनता वैतागली आहे. विषारी वायूचे ढग तयार होत असून, कधी नव्हे ते दिवसाही धुक्याचा अनुभव घ्यावा लागत आहे. पावसाचे पाणी वाहून नेणारे नैसर्गिक नाले आणि गटारे तुडुंब भरून वाहू लागल्याची संधी साधत काही कारखान्यांनी रसायनमिश्रित पाणी कोणत्याही प्रक्रियेविना त्यात सोडण्याची संधी साधून घेण्याचा सपाटा लावला आहे. हे होत असलेले जल प्रदूषण पाहून किल्लेदार यांच्या सज्जड इशारेबाजीला कारखानदारांनी नेहमीप्रमाणे वाटाण्याच्या अक्षता लावल्या आहेत. राज्याचे पर्यावरमंत्री आदित्य तटकरे यांनी रायगडातील प्रदूषण कमी करण्याची जबाबदारी किल्लेदार यांच्यावर सोपविलेली असताना त्यांनाच कारखानदार जुमानत नसल्याने आश्चर्यही व्यक्त होत आहे.

धाटाव थांब्याचा परिसर विषमिश्रित वायू प्रदूषणाच्या ‘दुलईत’ गुरफटलेला असताना बाजूच्या विष्णूनगर, मळखंडवाडी यांसह तळाघर, बोरघर पंचक्रोशीतील डोंगर माथ्यावरून येऊन कुंडलिका नदीला मिळणारे नैसर्गिक नाले रंगीत होत असून, हे पाणी आजूबाजूला शेतातही घुसत असल्याने शेतकर्‍यांना चिखलाच्या पाण्याऐवजी रंगीत पाण्यात शेतीची कामे उरकावी लागत आहेत. त्यामुळे धाटाव परिसरातील प्रदूषणाचा किल्ला लढविणे किल्लेदार यांनाही शक्य होत नसल्याचे दिसत आहे. याबाबत दरेकर यांची प्रतिक्रिया विचारली असता लवकरच पाहणी करून कारवाईचा निर्णय घेऊ, असे त्यांनी सांगितले.

- Advertisement -

अमोल पेणकर – वार्ताहर, रोहे

हेही वाचा – 

अबब! दीड वर्षात तब्बल २१ लाख कोरोना टेस्ट

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -