घररायगडनागोठणे ते पेणच्या प्रवासात होडीचा ‘आनंद’

नागोठणे ते पेणच्या प्रवासात होडीचा ‘आनंद’

Subscribe

गेल्या १० वर्षांपासून चौपदरीकरणाचे काम सुरू असून, ठेकेदार बदलूनही कामात कोणतीच प्रगती नाही. विशेष म्हणजे लोकप्रतिनिधीही या रेंगाळलेल्या चौपदरीकरणाच्या कामाला चालना देण्यासाठी विशेष प्रयत्नशील दिसत नाहीत.

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम कूर्मगतीने सुरू असतानाच काही ठिकाणी रस्त्यावर खड्ड्यांचे जाळे पसरल्याने नागोठणे ते पेणपर्यंतचा प्रवास हा चक्क होडीतून होत असल्याचा ‘आनंद’ यावर्षीही प्रवाशांच्या नशिबी आला असून, होडी झालेल्या वाहनाचे सारथ्य करताना नावाडी अर्थात चालकाची दमछाक होत आहे. गेल्या १० वर्षांपासून चौपदरीकरणाचे काम सुरू असून, ठेकेदार बदलूनही कामात कोणतीच प्रगती नाही. विशेष म्हणजे लोकप्रतिनिधीही या रेंगाळलेल्या चौपदरीकरणाच्या कामाला चालना देण्यासाठी विशेष प्रयत्नशील दिसत नाहीत. आता नेहमीप्रमाणे काही राजकीय पक्ष, संघटना खड्ड्यांतून झाडे लावण्याची हौस भागवून घेतील आणि मग महामार्ग विभागाचे अधिकारी आंदोलन स्थळी येऊन लेखी आश्वासनाने त्यांचे समाधान करतील किंबहुना हा फार्स दरवर्षी ठरून गेलेला आहे. चौपदरीकरणाच्या कामाबाबत एरव्ही कुणीही प्रश्न उपस्थित करीत नसून, केवळ प्रसारमाध्यमेच या चौपदरीकरणाच्या कामाला वेग देण्यासाठी टाहो फोडत असल्याचे चित्र आहे.

नागोठणे ते पेण मार्गावर मुरावाडी, आमटेम, वडखळ यासह अन्य काही ठिकाणी रस्त्याची पूर्णपणे वाताहत झाली आहे. पेण ते नागोठणे हा एसटी प्रवास अवघ्या पाऊण तासांचा असताना त्याला सव्वा ते दीड तास लागत आहे. एसटी बसमधून हेलकावे घेत प्रवास करावा लागतो. त्यातच एखादी बस खिळखिळी झालेली असेल तर एकाचवेळी 10- 12 भांडी पडून आवाज यावा तसा आवाज वारंवार येत असल्याने प्रवाशांना हा प्रवास नकोसा वाटतो. लहान वाहनांना खड्डे चुकविताना त्रास तर होतोच, शिवय चेेम्बरला फटका बसणे, टायर फाटणे किंवा पंक्चर होणे, इतर स्पेअर पार्टची नासधूस होण्याचे प्रकार घडत आहेत. मोठे ट्रक किंवा ट्रेलर खड्ड्यांमुळे नादुरुस्त होऊन मध्येच अडकून पडत असल्याने वाहतुकीला अडथळा येण्याचे प्रकारही घडत आहेत.

- Advertisement -

वडखळ ते पेण सर्व्हिस रस्त्यावर वडखळ ते उचेडे, तसेच डोलवी ते वडखळ दरम्यानच्या सर्व्हिस रस्त्यावर खड्डे पडल्याने प्रवास जिकरीचा ठरत आहे. पावसाळ्यापूर्वी अनेक ठिकाणी डांबरीकरण करण्यात आले होते. मात्र खड्ड्यांचे नष्टचर्य संपण्याचे नाव घेत नसून, पावसाचे अजून दोन महिने बाकी असल्याने या मार्गाची येत्या काही दिवसात अतिशय भयावह अवस्था होण्याची चिन्हे आहेत. स्पेअर पार्टस्ची मोडतोड होण्याबरोबर इंधनाचीही नासाडी होत असून, कित्येक मनुष्य तास वाया जात आहेत. महामार्गाच्या दुरवस्थेबाबत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकार्‍यांकडे प्रतिक्रियेसाठी संपर्क साधण्याचा वारंवार प्रयत्न करूनही तो होऊ शकला नाही.

प्रदीप मोकल – वार्ताहर, पेण

- Advertisement -

हेही वाचा –

शासकीय अधिकाऱ्यांच्या २५ टक्के बदल्यांना मान्यता, काँग्रेस, राष्ट्रवादीच्या मंत्र्यांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -