Thursday, June 1, 2023
27 C
Mumbai
घर रायगड कर्जतमधील समस्या सोडविण्यासाठी नारीशक्ती एकवटली

कर्जतमधील समस्या सोडविण्यासाठी नारीशक्ती एकवटली

Subscribe

कर्जत: शहरात अनेक समस्या असून त्यापैकी कोणतीच समस्या कायम स्वरुपी सोडविली जात नाही. त्यामुळे नागरिकांना स्वतःच्या हक्कासाठी झटावे लागत आहे.सध्या नगरपरिषदेचे नगरसेवक आणि लोकप्रतिनिधी हे स्वतःच्या आर्थिक व्यवहारात अडकले आहेत तर काही बिल्डरलाईनमध्ये व्यस्त आहेत. मुख्य लोकप्रतिनिधी राजकारणात व्यस्त असल्याने नागरिकांचे समस्या सोडविण्यासाठी वेळ मिळत नाही, असे आक्षेप घेत शहरातील समस्या सोडवण्याच्या दृष्टीने येथील नारीशक्ती संघटनेने पुढाकार घेत नगरपरिषदेचे मुख्याधिकारी वैभव गारवे यांना निवेदन दिले आहे. शहरातील त्वरित समस्या सोडविण्यात याव्यात, अन्यथा उपोषण छेडण्यात येईल असा इशाराही या नारीशक्तीने निवेदनाद्वारे दिला आहे.
शहरातील समस्यांसंदर्भात संघटनेच्या अध्यक्षा ज्योती जाधव, सचिव रेश्मा जाधव, मनसे शहर अध्यक्ष भारती कांबळे यांनी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी गारवे यांची भेट घेऊन त्यांना समस्यांची माहिती देत आपण अधिकारी म्हणून पुढाकार घ्यावा आणि त्या सोडविण्यात याव्यात, असे निवेदनाद्वारे मागणी केली आहे.
रस्त्याच्या मधोमध येणारे वीजेचे पोल आपल्या प्रशासनाकडून हटविले जात नाही. जरी वीज महावितरणाचे काम असेल तरी महावितरणच्या म्हणण्याप्रमाणे नगरपरिषदमधून टेंडर घेत असल्याने विजेचे खांब हटविण्यास विलंब होत आहे. शहरात प्रशस्त भव्यदिव्य उद्यान नाही, वाढत्या हातगाड्या, वाहन पार्किंगची समस्या,वाहतूक कोंडी, अतिक्रमण आणि अनधिकृत बांधकामे, जागोजागी लागलेल्या बॅनर्समुळे शहराला आलेलेे विद्रुपीकरण आदी बाबींकडेही संघटनेने लक्ष देत अशा बाबींवर कारवाईची गरज आहे. तसेच भिसेगाव भुयारी मार्ग लवकर सुरू करण्यात यावे, भिसेगाव प्रभागात श्री गजानन महाराज मंदिर पासून ते अमोघ कुळकर्णी यांच्या घरा पर्यंत बंदिस्त गटाराचे काम केले नाही,आदी समस्या सोडविण्यात यावे अशी मागणी नारीशक्ती संघटनेच्यावतीने नगरपरिषद प्रशासनास दिलेल्या निवेदनाद्वारे केल्या आहेत. दरम्यान, नगरसेवक उमेश गायकवाड यांनी नारीशक्ती संघटनेच्या मागणीला सहमती दर्शवली आहे.

शहरात डासांचा प्रादुर्भाव
स्वच्छ, सुंदर शहरात अजूनही काही ठिकाणी कचरा व्यवस्थित उचलला जात नाही, असेही या संघटनेेचे म्हणणे आहे. गेले अनेक वर्षांपासून काही प्रभागात निर्जंतुकीकरण तथा कीटनाशक फवारणी केली जात नाही त्यामुळे डासांचा प्रादुर्भाव वाढला असून रोगराई आणि आजाराला आमंत्रण मिळत आहे. त्या नावाने खोटी बिले काढण्याचं काम होत आहे. शहराची लोकसंख्या व्याप्ती वाढत असल्याने पाण्याची टंचाई तीव्र जाणवत आहे तर यावर पर्याय प्रशस्त पाण्याची टाकी उभारणे गरजेचे असताना त्यावर खर्च केला जात नाही, याकडेही नारीशक्ती संघटनेने निवेदनाद्वारे लक्ष वेधले आहे.

- Advertisement -

टँकरने पाणी पुरवठा
पाणी पुरवठा करण्यासाठी फक्त एकच मोटारावर काम सुरू असल्याने ती जर बंद पडली तर नाहक नागरिकांना पाण्यावाचून रहावे लागत आहे. अनेक प्रभागात कालबाह्य झालेल्या पाण्याच्या टाक्या आहेत आणि त्या कधीही पडू शकतात त्याकडे विशेष लक्ष देणे गरजेचे आहे. जर पाण्याची टाकी कोसळली ते हजारो लिटर पाणी वाया जाऊ शकतो आणि नागरिकांना काही दिवस पाण्यावाचून दिवस काढावे लागेल आणि आपण टँकरने पाणी पुरवठा करून लाखो रुपयांची बिल काढण्याचे प्रकार घडू शकतात आदी बाबींकडे नारीशक्ती संघटनेने प्रशासनाचे निवेदनाद्वारे लक्ष वेधले आहे.

जन हिताच्या दृष्टीकोनातून ज्या समस्या आहेत, त्या सोडविण्यासाठी स्वतः पुढाकार घेऊन त्यातून त्वरीत मार्ग काढण्यात येईल, असे आश्वासन देत आहोत.
– वैभव गारवे ,
मुख्याधिकारी, नगरपालिका

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -