पनवेल : बुधवारपासून सुरू झालेली नाताळच्या सुट्टीमुळे मुंबईकर, नवी मुंबईकर, ठाणेकर सुट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात लोणावळा तसेच पुणे जिल्ह्यातील पर्यटनस्थळी निघाले आहेत. त्यामुळे बोरघाट म्हणजेच खंडाळा घाटात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीचे चित्र मंगळवार रात्रीपासून दिसू लागले आहे. याचा पोलिसांवर मोठ्या प्रमाणात ताण पडत आहे. वाहतूक नियंत्रण करण्यासाठी पोलिसांना कसरत करावी लागत आहे.
नाताळच्या सुट्ट्या, शिवाय चौथा शनिवार-रविवार आणि वर्ष संपत असल्याने सुट्ट्या संपवण्याकडे असलेला नोकरदारांचा कल तसेच इयरएण्डची दणक्यात पार्टी करण्याच्या हेतूने लोणावळा परिसरात केलेल्या बुकिंगमुळे पर्यटकांचा ओघ वाढला आहे. त्यामुळे मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर खोपोली तसेच खंडाळा टोलनाका प्रवेशासाठी भल्या मोठ्या रांगा लागू लागल्या आहेत. त्याचवेळी मुंबई-पुणे महामार्गावरील खोपोली, शिळफाटा, खोपोली भाजी मार्केट ते वरची खोपोली कॉर्नर तसेच खोपोली पेण मार्गावर शिळफाटा ते देवन्हावे फाटा, पाली फाटा या सर्व ठिकाणी प्रचंड वर्दळ वाढल्याने स्थानिकांना वाहतूक कोंडीला तोंड द्यावे लागत आहे.
हेही वाचा… Air travel rules : नवीन वर्षात विमानप्रवास करत असाल तर, हा नवीन नियम जाणून घ्या!
दरवर्षी 23 किंवा 24 डिसेंबरपासून मुंबई, नवी मुंबई, ठाण्यातील हजारो पर्यटक नवीन वर्षाच्या स्वागतासाठी बाहेर पडत असल्याने खंडाळा घाटात हमखास वाहतूक कोंडी होते. हे चित्र यंदाही कायम आहे. मात्र, वाहतूक कोंडीमुळे घाटात गाड्या बंद पडणे, वाहन नादुरुस्त होण्याच्या तक्रारी वाढल्यामुळे वाहतूक कोंडीत आणखी भर पडत आहे. परिणामी पोलिसांवरील ताण आणखी वाढला आहे. त्याचवेळी टोलनाक्यावरील कर्मचाऱ्यांचेही काम वाढले आहे. त्यांना उसंत घ्यायला वेळ मिळत नाही. पर्यटकांमुळे हॉटेल, खाद्य पदार्थांचे स्टॉलवर प्रचंड गर्दी होत आहे.
हेही वाचा… Ulhasanagar : मद्यधुंद कारचालकाची पाच जणांना धडक
दरम्यान एक जानेवारीपर्यंत पर्यटकांचा ओघ असाच सुरू राहणार असल्याने वाहतूक कोंडी, वाहने नादुरूस्त होणे सुरूच राहणार आहे. यावर मात करण्यासाठी वाहतूक पोलीस, आयरआरबीची यंत्रणा तसेच अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सक्रिया ग्रुपचे सदस्य तत्पर आहेत.
(Edited by Avinash Chandane)