Wednesday, April 14, 2021
27 C
Mumbai
घर क्रीडा IPL 2021 : मुंबईतील सामन्यांवर कोरोनाचे सावट! वानखेडेच्या ग्राऊंड स्टाफपैकी १० जण...

IPL 2021 : मुंबईतील सामन्यांवर कोरोनाचे सावट! वानखेडेच्या ग्राऊंड स्टाफपैकी १० जण पॉझिटिव्ह

इव्हेंट मॅनेजमेंट टीमच्याही सहा सदस्यांना कोरोनाची लागण झाली आहे.

Related Story

- Advertisement -

मुंबईसह महाराष्ट्रात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढताना दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रात लॉकडाऊन करण्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे इंडियन प्रीमियर लीगच्या (IPL) मुंबईतील सामन्यांचे काय होणार? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. आयपीएलच्या यंदाच्या मोसमाला ९ एप्रिलपासून सुरुवात होणार असून दहा साखळी सामने मुंबईच्या वानखेडे स्टेडियममध्ये होणार आहेत. मात्र, आता या सामन्यांवरही कोरोनाचे सावट आहे. याचे कारण म्हणजे वानखेडे स्टेडियमवरील ग्राऊंड स्टाफपैकी १० जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यामुळे आता मुंबईतील सामने हे इतरत्र घेण्याबाबत भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला (BCCI) विचार करावा लागू शकेल. सध्या बीसीसीआयने इंदोर आणि हैदराबाद ही पर्यायी ठिकाणे ठेवली आहे.

बीसीसीआयची चिंता वाढली  

महाराष्ट्रात शुक्रवारी ४७ हजारांहून अधिक कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली होती. त्यामुळे महाराष्ट्रात मिनी-लॉकडाऊन होण्याची दाट शक्यता आहे. त्यातच शुक्रवारी रात्री वानखेडेवरील ग्राऊंड स्टाफपैकी ८ जणांना कोरोनाची बाधा झाल्याचे म्हटले जात होते. शनिवारी सकाळी आणखी दोन जणांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली. तसेच इव्हेंट मॅनेजमेंट टीमच्याही सहा सदस्यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळे आता बीसीसीआयची चिंता अधिकच वाढली आहे.

इंदोर आणि हैदराबादचा पर्याय 

- Advertisement -

महाराष्ट्रात लॉकडाऊन करण्यात आले तरी संघ बायो-बबलमध्ये राहणार आहेत. त्यांचा बाहेरील व्यक्तींशी संपर्क येणार नाही. त्यामुळे मुंबईत ठरल्याप्रमाणे सामने होतील अशी आम्हाला आशा आहे. मात्र, परिस्थिती अधिक गंभीर झाल्यास आम्ही सामने घेण्यासाठी इंदोर आणि हैदराबादचा पर्याय समोर ठेवला आहे, असे बीसीसीआयच्या अधिकाऱ्याकडून सांगण्यात आले. मुंबईमध्ये यंदा एकूण दहा आयपीएल सामने होणार आहेत. यापैकी पहिला सामना १० एप्रिलला चेन्नई सुपर किंग्स आणि दिल्ली कॅपिटल्स या संघांमध्ये खेळला जाईल.

- Advertisement -