चेतेश्वर पुजारा आणि रिषभ पंत यांची खेळण्याची शैली पूर्णपणे वेगळी आहे. पुजारा हा सावध आणि संयमी फलंदाजीसाठी ओळखला जातो, तर पंत नेहमी आक्रमक शैलीत खेळतो. परंतु, ११ पुजारा किंवा ११ पंत असलेला संघ यशस्वी होऊ शकत नाही. दोन्ही शैलीतील खेळाडू जेव्हा मिसळून खेळतात, तेव्हाच संघाला यश मिळू शकते, असे मत भारताचे फलंदाजी प्रशिक्षक विक्रम राठोड यांनी व्यक्त केले. पुजारा अगदी शिस्तबद्ध आहे. त्याला वेगळे काही तरी करायला आवडत नाही. याऊलट पंत निडर आहे. तो धोका पत्करायला घाबरत नाही. हे दोघे केवळ क्रिकेटच्या मैदानातच नाही, तर मैदानाबाहेरही असेच आहेत. परंतु, तुम्हाला क्रिकेटचे सामने जिंकण्यासाठी दोघांचीही तितकीच गरज असते, असे राठोड म्हणाले.
काही तरी नवे शिकवण्याचा प्रयत्न
प्रशिक्षक म्हणून तुम्ही खेळाडूंना त्यांचा नैसर्गिक खेळ करण्याची मोकळीक दिली पाहिजे. तुम्ही पंतला पुजाराप्रमाणे वागायला, खेळायला लावू शकत नाही. तुम्ही आयुष्यात जसे असता, ते तुमच्या खेळात दिसते. परंतु, प्रशिक्षक म्हणून माझा त्यांना काही तरी नवे शिकवण्याचा प्रयत्न असतो. पुजारा त्याच्या फलंदाजीत आणखी एक फटका वाढवेल का? किंवा पुजाराप्रमाणे पंत डावाच्या सुरुवातीला जास्त चेंडू खेळून काढू शकेल का? हे शोधणे माझे काम आहे, असे राठोड यांनी सांगितले.
विराटच्या कामगिरीतील सातत्य वाखाणण्याजोगे
विराट जगातील सर्वोत्तम फलंदाज आहे. त्याच्यातील प्रतिभा आणि कामगिरीतील सातत्य हे वाखाणण्याजोगे आहे. त्याच्याइतकी मेहनत मी इतर कोणाला घेताना पाहिलेले नाही. परंतु, विराटमधील मला एक गुण सर्वात भावतो, तो म्हणजे परिस्थितीशी जुळवून घेणे. तो सामन्यातील परिस्थितीनुसार त्याच्या खेळात बदल करू शकतो. याबाबतीत इतर कोणाचीही त्याच्याशी तुलना होऊ शकत नाही, असे राठोड एका मुलाखतीत म्हणाले.