घरक्रीडा१३० कोटी भारतीय तुझे आभारी आहेत; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे धोनीला पत्र

१३० कोटी भारतीय तुझे आभारी आहेत; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे धोनीला पत्र

Subscribe

भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीने मागील शनिवारी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. धोनी हा भारतीय क्रिकेट इतिहासातील सर्वोत्कृष्ट खेळाडूंपैकी एक मानला जातो. त्यामुळे १५ ऑगस्टला त्याने निवृत्ती जाहीर केल्यानंतर अनेक लोक भारताला व भारतीय क्रिकेटला दिलेल्या योगदानाबद्दल त्याला धन्यवाद देत आहेत, तसेच पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देत आहेत. आता भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही धोनीला पत्र लिहून भारतीय क्रिकेटला दिलेल्या योगदानाबद्दल त्याचे आभार मानले. धोनीने हे दोन पानी पत्र ट्विटरच्या माध्यमातून शेअर केले.

तू सर्वात यशस्वी कर्णधारांपैकी एक आहेस

‘१५ ऑगस्टला, तू तुझ्या वेगळ्या शैलीत निवृत्तीचा एक छोटासा व्हिडीओ शेअर केलास आणि त्याची संपूर्ण देशात चर्चा सुरु झाली. तू निवृत्त होत आहेस याचे १३० कोटी भारतीयांना दुःख होते, पण त्याच वेळी तू भारतीय क्रिकेटला दिलेल्या योगदानाबद्दल ते तुझे आभार मानत होते. तुझ्या कारकिर्दीकडे आकड्यांच्या दृष्टिकोनातून पाहायचे, तर तू सर्वात यशस्वी कर्णधारांपैकी एक आहेस. तू क्रिकेट इतिहासातील सर्वोत्तम फलंदाजांपैकी एक, सर्वोत्तम कर्णधारांपैकी एक आणि सर्वोत्तम यष्टिरक्षकांपैकी एक म्हणून ओळखला जाशील, यात जराही शंका नाही,’ असे मोदी यांनी पत्रात लिहिले.

- Advertisement -

तुझ्याकडे केवळ खेळाडू म्हणून पाहणे योग्य नाही

तसेच मोदी पुढे लिहितात की, ‘महेंद्रसिंग धोनी हे नाव केवळ क्रिकेटमधील आकडे किंवा मॅचविनिंग खेळींपुरते मर्यादित राहणार नाही. तुझ्याकडे केवळ खेळाडू म्हणून पाहणे योग्य ठरणार नाही. एका छोट्याशा शहरातून पुढे येत तू राष्ट्रीय पातळीवर स्वतःचे नाव कमावलेस आणि भारताला अभिमान वाटावा अशी कामगिरी केलीस. तू नव्या भारताचा चेहरा आहेस, जिथे तुम्ही किती यशस्वी होणार, हे तुमचे अडनाव किंवा कुटुंबाची पार्श्वभूमी ठरवत नाही. या पिढीतील भारतीय धोका पत्करण्यास आणि नव्या गोष्टी करून बघण्यास घाबरत नाही, हे तू तुझ्या खेळामधून दाखवून दिले आहेस. कोणत्याही परिस्थितीत शांत राहून योग्य निर्णय कसा घ्यायचा हे तरुणांनी तुझ्याकडून शिकले पाहिजे’.

धोनीने दिले धन्यवाद

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्राबद्दल त्यांना धन्यवाद देताना धोनी म्हणाला की, ‘कलाकार, सैनिक आणि खेळाडू यांची आपल्या कामगिरीचे कौतुक व्हावे केवळ इतकीच अपेक्षा असते. त्यांचे परिश्रम, त्यांनी घेतलेली मेहनत, त्यांनी केलेले त्याग; याची नोंद घेतली जावी आणि त्याचे कौतुक व्हावे असे त्यांना वाटत असते. पंतप्रधान नरेंद मोदी, तुम्ही केलेल्या कौतुकाबद्दल आणि दिलेल्या शुभेच्छांबद्दल खूप धन्यवाद’.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -