घरक्रीडा१९८३ वर्ल्डकप विजयामुळे भारतात खेळांकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला!

१९८३ वर्ल्डकप विजयामुळे भारतात खेळांकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला!

Subscribe

कपिल देव यांचे मत

भारतीय क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात महत्त्वाचा दिवस म्हणजे २५ जून १९८३! लॉर्ड्स क्रिकेट ग्राऊंडवर कपिल देवच्या भारतीय संघाने बलाढ्य वेस्ट इंडिजला पराभूत करत पहिल्यांदा विश्वचषक जिंकण्याची ऐतिहासिक कामगिरी केली. भारताच्या या विश्वविजयाला गुरुवारी ३७ वर्षे पूर्ण झाली. १९७५ आणि १९७९ मध्ये विश्वचषक जिंकणार्‍या क्लाईव्ह लॉईडच्या वेस्ट इंडिज संघाचे १९८३ मध्ये जेतेपदाची हॅट्ट्रिक साजरी करण्याचे लक्ष्य होते. अंतिम सामन्यात १८४ धावांचा पाठलाग करताना विंडीजचा संघ १ बाद ५० असा सुस्थितीत होता. परंतु, मोहिंदर अमरनाथ आणि मदन लाल यांनी ३-३ गडी बाद करत विंडीजच्या डावाला खिंडार पाडले. त्यामुळे भारताने ४३ धावांनी हा सामना जिंकत पहिल्यांदा विश्वचषकावर आपले नाव कोरले. या विश्वविजयामुळे आपल्या देशात खेळांकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला, असे या संघाचे कर्णधार कपिल देव यांना वाटते.

मला माझ्या संघाचा खूप गर्व आहे. ती स्पर्धा जिंकल्याचा आम्हाला अभिमान होता. विश्वचषक जिंकणे ही खूपच सुंदर गोष्ट होती. कारण त्यामुळे संपूर्ण देशाला जल्लोष करण्याची संधी मिळाली. सर्वांनी मिळून हा आनंद साजरा केला. कोणत्याही मोठ्या आणि महत्त्वाच्या यशाचा परिणाम हा पुढील पिढीवर होतो. आम्ही १९८३ विश्वचषक जिंकल्यानंतर आपल्या देशात खेळांकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला. पालकांना खेळाचे महत्त्व उमगू लागले. पूर्वी मुले डॉक्टर किंवा इंजिनिअर बनत होती. परंतु, बरीच मुले हळूहळू खेळाकडे वळू लागली. त्यामुळे हा विश्वविजय आपल्या देशासाठी खूप महत्त्वाचा होता, असे कपिल देव यांनी गुरुवारी सांगितले.

- Advertisement -

सलामीच्या सामन्यात वेस्ट इंडिजवर मात करणे ठरले ‘गेम चेंजर’ – किरमाणी

त्या काळी वेस्ट इंडिजला पराभूत करणे जवळपास अशक्यच मानले जायचे. परंतु, कपिल देव यांच्या संघाने १९८३ विश्वचषकाच्या अंतिम सामन्यातच नाही, तर सलामीच्या सामन्यातही विंडीजवर मात केली होती. हा विजय आमच्यासाठी ‘गेम चेंजर’ ठरला असे त्या भारतीय संघाचे यष्टीरक्षक सय्यद किरमाणी म्हणाले. तुम्ही पहिले प्रेम कधीही विसरू शकत नाही आणि १९८३ विश्वचषक आमच्यासाठी अशाच प्रकारचा होता. आम्ही विश्वचषक जिंकू असे कोणालाही वाटले नव्हते. त्यामुळे आम्ही खेळाडूही या स्पर्धेचा फार गांभीर्याने विचार करत नव्हतो. आम्ही केवळ बाद फेरी गाठली, तरी ती भारतीय क्रिकेटसाठी खूप मोठी गोष्ट असेल असे मला वाटत होते. आम्ही या स्पर्धेच्या पहिल्याच सामन्यात गतविजेत्या वेस्ट इंडिजविरुद्ध खेळलो. ‘आपल्याकडे गमवायला काहीच नाही’ असे सामन्याआधी कर्णधार कपिल देव म्हणाला. त्यामुळे आमच्यावरील दबाव कमी झाला. आम्हाला तो सामना जिंकण्यात यश आले आणि हा विजय आमच्यासाठी ‘गेम चेंजर’ ठरला. त्यानंतर आम्ही मागे वळून पाहिले नाही, असे किरमाणी म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -