Eco friendly bappa Competition
घर क्रीडा फ्रान्सच्या साम्राज्याला क्रोएशियन क्रांतीची टक्कर !

फ्रान्सच्या साम्राज्याला क्रोएशियन क्रांतीची टक्कर !

Subscribe

फिफा-विश्वचषक २०१८ च्या अंतिम सामन्याची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. विश्वविजेतपदाचे महायुद्ध कोण जिंकणार, या प्रश्नाचे उत्तर देणारा सामना आज फ्रान्सविरूद्ध क्रोएशिया असा रंगणार आहे.

फिफा-विश्वचषक २०१८ च्या अंतिम सामन्याची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. विश्वविजेतपदाचे महायुद्ध कोण जिंकणार, या प्रश्नाचे उत्तर देणारा सामना रविवारी फ्रान्सविरूद्ध क्रोएशिया असा रंगणार आहे. सामन्यासाठी दोन्ही संघ तयार झाले असून सामना चुरशीचा होणार अशी चर्चा फुटबॉल जगतात सुरू आहे. उपांत्यफेरीमध्ये फ्रान्सने बेल्जियमला १-० ने मात दिली, तर क्रोएशियाने इंग्लंडला २-१ ने पराभूत करत अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. आतापर्यंतचा फ्रान्स आणि क्रोएशिया या दोन्ही संघांचा विश्वचषकातील प्रवास वाखाणण्याजोगा आहे. मात्र, आता अंतिम सामन्यात दोन्ही संघ कशी कामगिरी करणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

फ्रान्स तिसर्‍यांदा अंतिम सामन्यात

फ्रान्सचा संघ १९९८ पासून तिसर्‍यांदा अंतिम सामन्यात पोहोचला आहे. १९९८ ला विश्वचषक जिंकून त्यानंतर २००६ ला देखील फ्रान्स अंतिम सामन्यात पोहोचला होता. मात्र, इटलीकडून त्यांना पराभव पत्करावा लागला होता. त्यानंतर २०१० आणि २०१४ अशा दोन्ही विश्वचषकांत फ्रान्स काही खास कामगिरी करू शकला नाही. मात्र, यंदाच्या स्पर्धेत फ्रान्सने सुरूवातीपासूनच उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत अंतिम फेरीपर्यंत मजल मारली आहे.

फ्रान्स संघांच्या जमेच्या बाजू

- Advertisement -

 विश्वचषकाच्या सुरूवातीपासूनच फ्रान्सने आक्रमक खेळ केला. फ्रान्सकडे काही उत्तम फॉरवर्ड प्लेयर असल्यामुळे सर्वच सामन्यात त्यांचा संघ प्रतिस्पर्धी संघांवर आक्रमण करत आहे.


 सर्व फळ्यांतील समतोल हा एक फ्रान्सचा उत्तम गुण असून त्यांचे जितके लक्ष आपल्या अ‍ॅटॅकवर असते तितकेच लक्ष आपल्या बचावावर देखील असलेले आपल्याला दिसून येते.


- Advertisement -

अनुभवी खेळाडूंची फौज फ्रान्सकडे आहे ज्यात ग्रीझमन, पोग्बा आणि जिराउड सारख्या दिग्गज खेळाडूंचा भरणा आहे. तर काही वेळातच प्रेक्षकांच्या गळ्यातील ताईत बनलेला कायलन एमबापेही सध्या चांगल्या फॉर्ममध्ये असल्याने त्याचा आक्रमक खेळही फ्रान्सला फायद्याचा ठरेल.


राफेल वरान आणि उमटिटी सारख्या तगड्या बचावफळीचा फ्रान्सला फायदा होणार आहे. सेमी फायनलमध्ये उमटिटीने केलेल्या अप्रतिम गोलमुळे फ्रान्सला सामन्यात आघाडी घेता आली.


फ्रान्सच्या संघात पोग्बा सारख्या काही अनुभवी खेळाडूंसोबतच एमबापेसारखे काही नवोदित खेळाडू आहेत. ज्यामुळे संघाच्या एकंदरीत खेळात एक समतोल असलेला आपल्याला पाहायला मिळतो. ज्याचा फायदा फ्रान्सला क्रोएशियाविरूद्ध होईल हे नक्की.

फ्रान्स संघाच्या कमकुवत बाजू

ग्रीझमन आणि पोग्बा या दोन दिग्गज खेळाडू फ्रान्सकडे आहेत. मात्र, त्या दोघांमध्ये समन्वय नसल्याने त्याचा फटका कुठेतरी फ्रान्सला बसू शकतो.


सर्व संघांला लीड करण्याची कुवत असणारा खेळाडू फ्रान्सकडे नसल्याने त्यांना तोटा होण्याची शक्यता आहे.


पोग्बाच्या खेळाची तुलना केली तर, फ्रान्स संघासाठीचा खेळ तितका चांगला नाहीये, जितका मँचेस्टरसाठी आहे.


फ्रान्सकडे उत्कृष्ट दर्जाचा अ‍ॅटॅक आणि डिफेन्स आहे. मिडफिल्डमध्ये त्यांची गल्लत होण्याची शक्यता आहे. कारण त्यांचा मिडफिल्डचा पोग्बा सध्या अ‍ॅटॅक करताना आपल्याला दिसतो.


पहिल्यांदाच क्रोएशिया अंतिम फेरीत दाखल

विश्वचषकातील इतर संघांच्या तुलनेत जागतिक क्रमवारीमध्ये सर्वात खाली असणार्‍या क्रोएशियाने अंतिम फेरीत धडक दिल्यामुळे संपूर्ण फुटबॉल जगतातून आश्चर्य व्यक्त केले जात आहे. फिफा विश्वचषकाच्या उपांत्य फेरीमध्ये क्रोएशियाने इंग्लंडला २-१ च्या फरकाने पराभूत करत अंतिम सामन्यामध्ये झेप घेतली आहे. क्रोएशियाच्या मारियो मँजुकिचने अतिरिक्त वेळेत गोल करत संघांला विजय मिळवून दिला. विश्वचषकात सुरूवातीपासूनच आपला दबदबा कायम ठेवलेला क्रोएशियाचा संघ यंदा विश्वचषक जिंकू शकतो, अशी आशा व्यक्त केली जात आहे.

क्रोएशिया संघाच्या जमेच्या बाजू

क्रोएशियाचा सर्वात मोठा प्लस पॉईंट आहे तो त्यांचा कर्णधार लुका मॉड्रीच. रिअल मॅड्रिड संघांचा मिडफिल्डचा स्टार खेळाडू मॉड्रीचने संपूर्ण विश्वचषकात अप्रतिम खेळ दाखवला आहे. त्याच्या उत्कृष्ट कप्तानीमुळे संघांने विश्वचषकात आतापर्यंत चांगली कामगिरी केली आहे.


 मागील काही वर्षांत फुटबॉल जगतात नावाजण्याजोगी कामगिरी करणार्‍या इवान पेरिसिच, मारियो मँजुकिच, इवान रेकेटिच आणि लुका मॉड्रीचसारख्या खेळाडूंच्या संघांत असण्याचा क्रोएशियाला फायदा होणार आहे.


 क्रोएशिया विश्वचषकातील इतर संघांच्या तुलनेत वर्ल्ड रँकिंगमध्ये सर्वात खाली असला तरी त्यांनी संपूर्ण विश्वचषकात आपला आत्मविश्वास कायम ठेवला आहे. ज्याचा फायदा आतापर्यंत त्यांना प्रत्येक सामन्यात झाला आहे.


उत्कृष्ट दर्जाची मिडफिल्ड हा क्रोएशियाचा सर्वात चांगला गुण आहे. कारण त्यांच्याकडे लुका मॉड्रीच आणि इवान रेकेटिच ही मिडफिल्डमधील अप्रतिम जोडी आहे. ज्याचा फायदा त्यांना अ‍ॅटॅक आणि डिफेन्स अशा दोन्ही फळ्यांत होतो.


पेनल्टी शूटआऊटमध्ये क्रोएशिया संघांचा अप्रतिम खेळ त्यांच्यासाठी चांगलाच फायद्याचा ठरला आहे. त्यांनी डेन्मार्क, रशिया अशा दोन्ही संघांना पेनल्टी शूटआऊटमध्ये पराभूत केले आहे.


क्रोएशियाचे संघाच्या कमकुवत बाजू

 क्रोएशिया संघांची बचाव फळी तितकी खास नसल्याने त्यांच्यासमोर बेस्ट अ‍ॅटॅकर टीम फ्रान्सचे आव्हान असणार आहे.


 क्रोएशिया संघांचे बरेच खेळाडू पहिल्याच वेळेस विश्वचषक खेळत असल्याने त्यांच्याकडून दबाबाखाली काही चुका होण्याची शक्यता आहे.


संघांच्या प्रशिक्षकाने ठेवलेल्या खेळाडूंच्या जागेनुसार अ‍ॅटॅककरीता बहुदा मारियो मँजुकिचला एकट्यालाच ठेवल्याने क्रोएशियाचा अ‍ॅटॅक कुठेतरी कमी पडतो.


सध्या बर्‍याच सामन्यात प्रतिस्पर्धी संघाच्या मुख्य खेळाडूला लक्ष्य केले जाते. त्याला दुखापतग्रस्त करून सामन्याबाहेर पाठवण्याची रणनीती असते. क्रोएशियाचा हुकुमी एक्का असणार्‍या मॉड्रीचला फ्रान्सचा संघ लक्ष्य करू शकतो, ज्याच्या सामन्याबाहेर जाण्याने संपूर्ण क्रोएशियाचा संघ कोलमडू शकतो.


क्रोएशिया जागतिक क्रमवारीमध्ये फ्रान्सपेक्षा बराच खाली असल्याने, फ्रान्ससारख्या बलाढ्य संघाचे आव्हान आणि तेही विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात क्रोएशियाला अवघड पडणार हे नक्की.

 

- Advertisment -