Monday, July 26, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर क्रीडा इंग्लंडच्या पहिल्यावहिल्या वर्ल्डकप विजयाला दोन वर्षे पूर्ण; फायनलचा थरारक व्हिडिओ आयसीसीने केला...

इंग्लंडच्या पहिल्यावहिल्या वर्ल्डकप विजयाला दोन वर्षे पूर्ण; फायनलचा थरारक व्हिडिओ आयसीसीने केला शेअर

अनेक क्रिकेटच्या जाणकारांच्या मते, हा क्रिकेट इतिहासातील हा सर्वात चुरशीचा सामना होता.

Related Story

- Advertisement -

इंग्लंड क्रिकेट संघाच्या पहिल्यावहिल्या एकदिवसीय वर्ल्डकप विजयाला बुधवारी (आज) दोन वर्षे पूर्ण झाली. १४ जुलै २०१९ रोजी लॉर्ड्स क्रिकेट ग्राऊंडवर झालेल्या अंतिम सामन्यात यजमान इंग्लंडने न्यूझीलंडला पराभूत केले होते. निर्धारित ५०-५० षटकांनंतर दोन्ही संघांनी २४१-२४१ धावा केल्या होत्या. त्यामुळे सामन्याचा आणि वर्ल्डकपचा विजेता ठरवण्यासाठी सुपर ओव्हर झाली. वर्ल्डकपच्या अंतिम सामन्यात सुपर ओव्हर होण्याची ही पहिलीच वेळ ठरली. यात दोन्ही संघांनी १५-१५ धावा केल्या. मात्र, या सामन्यात इंग्लंडने सर्वाधिक चौकार-षटकार मारल्याने त्यांना विजेते घोषित करण्यात आले. एकदिवसीय वर्ल्डकप जिंकण्याची ही इंग्लंडची पहिलीच वेळ होती. आता या विश्वविजयाला दोन वर्षे पूर्ण झाली असून फायनलच्या अखेरच्या क्षणांचा थरारक व्हिडिओ आयसीसीने शेअर केला आहे.

अंतिम सामन्यात न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करताना ५० षटकांत ८ बाद २४१ अशी धावसंख्या उभारली होती. न्यूझीलंडच्या हेन्री निकोल्स (५५) आणि टॉम लेथम (४७) यांनी चांगली फलंदाजी केली होती. २४२ धावांचा पाठलाग करताना इंग्लंडची अडखळती सुरुवात झाली होती. परंतु, बेन स्टोक्स (नाबाद ८४) आणि जॉस बटलर (५९) यांनी उत्कृष्ट फलंदाजी करत इंग्लंडला विजयासमीप नेले होते. इंग्लंडला अखेरच्या षटकात जिंकण्यासाठी १५ धावांची आवश्यकता होता.

- Advertisement -

ट्रेंट बोल्टने या षटकातील पहिले दोन चेंडू निर्धाव टाकले. परंतु, पुढील दोन चेंडूवर स्टोक्सने एक चौकार आणि एक षटकार मारला. त्यामुळे इंग्लंडला विजयासाठी अखेरच्या दोन चेंडूवर तीन धावांची आवश्यक होती. परंतु, या दोन्ही चेंडूवर स्टोक्सने एक-एक धाव काढली आणि दुसऱ्या बाजूचे फलंदाज धावचीत झाले. त्यामुळे दोन्ही संघांची समान धावसंख्या झाल्याने सुपर ओव्हर झाली.

सुपर ओव्हरमध्ये न्यूझीलंडकडून बोल्टने गोलंदाजी केली. त्याच्या या षटकात स्टोक्स आणि बटलरने मिळून १५ धावा काढल्या. याचा पाठलाग करण्यासाठी न्यूझीलंडची मार्टिन गप्टिल आणि जिमी निशम ही जोडी मैदानात उतरली. इंग्लंडच्या जोफ्रा आर्चरने टाकलेल्या या षटकाच्या दुसऱ्याच चेंडूवर निशमने षटकार मारला. यानंतर मात्र न्यूझीलंडच्या दोन्ही फलंदाजांना मोठा फटका मारता आला नाही. न्यूझीलंडला अखेरच्या चेंडूवर विजयासाठी २ धावांची आवश्यकता होती. परंतु, गप्टिल दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नात धावचीत झाला. त्यामुळे दोन्ही संघांमध्ये पुन्हा बरोबरी झाली. मात्र, सामन्यात इंग्लंडने सर्वाधिक चौकार-षटकार मारल्याने त्यांना विजेते घोषित करण्यात आले.

- Advertisement -