घरक्रीडामानधनाचे विक्रमी अर्धशतक; भारत पराभूत

मानधनाचे विक्रमी अर्धशतक; भारत पराभूत

Subscribe

एकदिवसीय मालिका जिंकणार्‍या भारतीय महिला संघासाठी टी-२० मालिकेची सुरुवात चांगली झाली नाही. लिया ताहूहू, लिह कॅस्परेक आणि अमिलिया कर यांच्या चांगल्या गोलंदाजीच्या जोरावर न्यूझीलंड महिला संघाने पहिल्या टी-२० सामन्यात भारताचा २३ धावांनी पराभव करत ३ सामन्यांच्या या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. या सामन्यात न्यूझीलंडने दिलेल्या १६० धावांचा पाठलाग करताना भारताची १ बाद १०२ अशी धावसंख्या होती. सलामीवीर स्मृती मानधनाने एकदिवसीय मालिकेतील चांगला फॉर्म टी-२० मालिकेतही सुरु ठेवत २४ चेंडूंत अर्धशतक केले. त्यामुळे तिने महिला टी-२० क्रिकेटमध्ये भारताकडून सर्वात जलद अर्धशतक करण्याचा विक्रम आपल्या नावे केला आहे. मात्र ती बाद झाल्यानंतर भारताचा डाव गडगडला आणि भारताचा पराभव झाला.

या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. राधा आणि पूनम यादव या जोडगोळीने न्यूझीलंडच्या सुएझ बेट्स आणि कॅटलिन गुरी यांना माघारी धाडल्यामुळे न्यूझीलंडची २ बाद ४७ अशी अवस्था होती, मात्र यानंतर सोफी डीवाइन आणि कर्णधार अ‍ॅमी सॅटरवेटने न्यूझीलंडचा डाव सावरला. डीवाइनने ४१ चेंडूंत अर्धशतक केले. कर्णधार सॅटरवेटने ३३ धावा पटकावत तिला चांगली साथ दिली. या दोघी माघारी परतल्यानंतर मधल्या फळीतील फलंदाजांनी न्यूझीलंडला १५९ धावांपर्यंत मजल मारुन दिली.

- Advertisement -

याचा पाठलाग करताना पदार्पण करणारी प्रिया पुनिया ४ धावांवर बाद झाली. यानंतर स्मृती मानधना आणि जेमिमा रॉड्रिग्सने अप्रतिम फलंदाजी केली. स्मृतीने २४ चेंडूंतच अर्धशतक केले. या डावाच्या १२ व्या षटकात भारताची १ बाद १०२ धावसंख्या असताना स्मृती ५८ धावांवर बाद झाली. तिने या धावा ७ चौकार आणि ३ षटकारांच्या मदतीने केल्या. तर पुढच्याच षटकात रॉड्रिग्सला ३९ धावांवर ताहूहूने माघारी पाठवले. यानंतर कर्णधार हरमनप्रीत कौर सोडता एकही फलंदाज दुहेरी धावसंख्या करू शकला नाही. त्यामुळे १ बाद १०२ धावसंख्या असणार्‍या भारताचा डाव २० व्या षटकात १३६ धावांत आटोपला.

संक्षिप्त धावफलक –

- Advertisement -

न्यूझीलंड : २० षटकांत ४ बाद १५९ (सोफी डीवाइन ६२, अ‍ॅमी सॅटरवेट ३३; दीप्ती शर्मा १/१९, पूनम यादव १/३०) विजयी वि. भारत : १९.१ षटकांत सर्वबाद १३६ (स्मृती मानधना ५८, जेमिमा रॉड्रिग्स ३९; लिया ताहूहू ३/२०, लिह कॅस्परेक २/२५, अमिलिया कर २/२८).

आम्हाला जिंकण्यासाठी मला २० षटके खेळावेच लागेल – मानधना

या सामन्यात न्यूझीलंडने दिलेल्या १६० धावांचा पाठलाग करताना भारताची १ बाद १०२ अशी धावसंख्या होती. मात्र स्मृती मानधना बाद झाल्यावर भारताचा डाव गडगडला. त्यामुळे असे पुन्हा होणे टाळायचे असेल तर मला २० षटके खेळावीच लागतील, असे सामन्यानंतर मानधना म्हणाली. माझ्या आणि जेमिमाच्या विकेटमुळे हा सामना फिरला. जेव्हा तुम्ही १६० धावांचा पाठलाग करत असता आणि तुमचा रन-रेट ७-८ धावांचा असतो, तेव्हा तुम्ही अधिक संयमाने फलंदाजी केली पाहिजे. मात्र या सामन्यात आम्ही तसे केले नाही. त्यामुळे यापुढे आम्हाला जिंकायचे असेल तर मला किंवा आघाडीच्या फळीतील एकीला १८-२० षटके खेळण्याशिवाय पर्याय नाही, असे मानधना म्हणाली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -