नवी दिल्ली : भारतीय संघाने इंग्लंडविरुद्ध झालेल्या 5 सामन्यांच्या टी 20 च्या मालिकेत 4 – 1 अशी मात केली. यावेळी पाचव्या आणि शेवटच्या सामन्यात अभिषेक शर्माच्या तडाखेबाज शतकाने जगभरातील क्रिकेट रसिकांचे लक्ष वेधून घेतले. त्याने अवघ्या 37 चेंडूमध्ये शतक झळकावत इंग्लंडसमोर एक मोठे आव्हान उभे केले. यावेळी इंग्लंडला या आव्हानाचा सामना करता आला नाही आणि भारताने पाचवा सामना हा तब्बल 150 धावांनी जिंकला. यावेळी अभिषेक शर्माने या सामन्यात 135 धावा केल्या, ज्यामध्ये 13 षटकारांसह 7 चौकारांचा समावेश होता. यावेळी त्याने तब्बल 250 च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी केली होती. त्याच्या या तडाखेबाज फलंदाजीचे कौतुक इंग्लंडच्या माजी कर्णधारानेदेखील केले आहे. (Abhishek Sharma hits more sixes than i hit in my career say england ex captain)
हेही वाचा : Abhishek Sharma : अभिषेक शर्माची वेगवान सेंचुरी, रोहितचा जलद शतकाचा विक्रम थोडक्यात बचावला
इंग्लंडचा माजी कर्णधार अॅलिस्टर कुकने अभिषेक शर्माच्या फलंदाजीचे कौतुक केले. “अभिषेक शर्माने दोन तासांमध्ये माझ्या संपूर्ण आयुष्यात मी मारलेल्या षटकारांपेक्षा जास्त षटकार मारले,” असे म्हणत त्याने अभिषेक शर्माच्या फलंदाजीची प्रशंसा केली. दरम्यान, अभिषेक शर्माने 135 धावांच्या खेळीत 13 षटकार मारले. या कामगिरीसह भारतीय संघातून टी-20 मध्ये एका डावात सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम अभिषेक शर्माने आपल्या नावे केला. तसेच, दुसरीकडे इंग्लंडचा माजी क्रिकेटपटू ॲलिस्टर कुक हा एक उत्तम कसोटीपटू म्हणून ओळखला जातो. त्याने161 कसोटी सामन्यात 11 षटकार मारले आहेत. तसेच, इंग्लंडकडून त्याने 92 एकदिवसीय सामन्यात 10 षटकार मारले असून त्याने 4 टी 20 सामन्यात एकही षटकार मारलेला नाही. त्यामुळे त्याने अभिषेक शर्माच्या षटकारांचे कौतुक केले.
अभिषेक शर्माने केले हे विक्रम
अभिषेक शर्माने 17 चेंडूत अर्धशतक झळकावत आंतरराष्ट्रीय टी 20 मध्ये सर्वात जलद अर्धशतक करणारा तो भारताचा दुसरा फलंदाज ठरला. तसेच, त्याने इंग्लंडविरुद्ध झालेल्या पाचव्या सामन्यात अनेक विक्रम मोडीत काढले आहेत. सामन्याच्या 10.1 षटकात शतक झळकावणारा तो पहिला आंतरराष्ट्रीय खेळाडू ठरला आहे. त्याने दक्षिण आफ्रिकेच्या क्विंटन डी कॉकचा विक्रम मोडीत काढला आहे. क्विंटन डी कॉकने 2023 मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध 10.2 षटकांत शतक झळकावले होते. तसेच, 250 च्या स्ट्राईक रेटने शतक झळकावणारा तो भारताचा तिसरा खेळाडू ठरला. 2017 मध्ये रोहित शर्माने श्रीलंकेविरुद्ध तर 2024 मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 250 हून अधिकच्या स्ट्राईक रेटने शतक झळकावले आहेत.