घरक्रीडाT20 World Cup : 'आम्ही खेळणारच'! अफगाणिस्तान संघाच्या अधिकाऱ्याचे टी-२० वर्ल्डकपबाबत मोठे...

T20 World Cup : ‘आम्ही खेळणारच’! अफगाणिस्तान संघाच्या अधिकाऱ्याचे टी-२० वर्ल्डकपबाबत मोठे विधान

Subscribe

टी-२० वर्ल्डकप १७ ऑक्टोबर ते १४ नोव्हेंबर या कालावधीत पार पडणार आहे.

अफगाणिस्तानात पुन्हा एकदा तालिबानने ताबा मिळवला आहे. अफगाणिस्तान सरकारने तालिबानसमोर गुडघे टेकल्याचे चित्र आहे. त्यामुळे अफगाणिस्तानमध्ये संकट निर्माण झाले आहे. या अराजकतेमुळे अफगाण नागरिक देश सोडून पळून जाण्याचा प्रयत्न करत आहेत. या परिस्थितीमुळे आता अफगाणिस्तान क्रिकेट संघाच्या आगामी टी-२० वर्ल्डकपमधील सहभागाबाबतही प्रश्न उपस्थित केले जात आहेत. परंतु, १७ ऑक्टोबरपासून युएईत होणाऱ्या या स्पर्धेत अफगाणिस्तानचा संघ खेळणार असून खेळाडू लवकरच तयारीला सुरुवात करणार आहेत. याबाबतची माहिती अफगाणिस्तान संघाचे मीडिया व्यवस्थापक हिकमत हसन यांनी दिली.

तिरंगी मालिका खेळणार

आमचा संघ टी-२० वर्ल्डकपमध्ये नक्कीच खेळणार आहे. पुढील काही दिवसांत आमचे खेळाडू काबुल येथे पुन्हा सरावाला सुरुवात करतील. तसेच ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडिजविरुद्धच्या टी-२० तिरंगी मालिकेसाठी आम्ही लवकरच ठिकाण निश्चित करणार आहोत. टी-२० वर्ल्डकपच्या तयारीसाठी ही तिरंगी मालिका फायदेशीर ठरू शकेल. आम्ही श्रीलंका आणि मलेशिया या देशांसोबतही चर्चा करत आहोत, असे हसन म्हणाले.

- Advertisement -

खेळाडूंच्या कुटुंबियांना मदत करणार

आम्ही हंबनटोटा येथे पाकिस्तानविरुद्ध खेळणार आहोत आणि ही मालिका ठरल्याप्रमाणे होणार आहे. तसेच आम्ही स्थानिक टी-२० स्पर्धाही आयोजित करण्याचा विचार करत आहोत. टी-२० वर्ल्डकपपूर्वी सरावासाठी खेळाडूंना या स्पर्धेचा फायदा होऊ शकेल, असेही हसन यांनी सांगितले. तसेच राशिद खान आणि मोहम्मद नबी हे प्रमुख खेळाडू सध्या अफगाणिस्तानात नाहीत. परंतु, आम्ही त्यांच्या कुटुंबियांना मदत करण्याचा प्रयत्न करत असल्याचेही हसन म्हणाले.


हेही वाचा – अफगाणिस्तानमध्ये कुटुंब अडकल्याने राशिद खान चिंतेत

- Advertisement -

 

Anvay Sawant
Anvay Sawanthttps://www.mymahanagar.com/author/sanvay/
गेल्या तीन वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. वृत्तपत्र आणि आता डिजिटल मीडिया असा दोन्ही क्षेत्रांचा अनुभव. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय क्रीडा विषयात लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -