अफगाणिस्तानचा ऐतिहासिक विजय

कसोटीत बांगलादेशवर २२४ धावांनी मात

कर्णधार राशिद खानच्या अप्रतिम कामगिरीच्या जोरावर अफगाणिस्तानने एकमेव कसोटी सामन्यात बांगलादेशवर २२४ धावांनी मात केली. अफगाणिस्तानचा हा कसोटी क्रिकेटमधील पहिला विजय होता. अफगाणिस्तानचा हा केवळ तिसरा कसोटी सामना होता. या सामन्यात २० वर्षीय राशिद कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात युवा कर्णधार ठरला. त्याने या सामन्याच्या दोन्ही डावांमध्ये मिळून ११ गडी बाद केले आणि पहिल्या डावात ५१ धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. त्यामुळे त्याला समानवीराचा पुरस्कार मिळाला.

अफगाणिस्तानने हा सामना जिंकण्यासाठी बांगलादेशसमोर ३९८ धावांचे आव्हान ठेवले होते. याचा पाठलाग करताना चौथ्या दिवसअखेर त्यांची ६ बाद १३६ अशी अवस्था होती. त्यामुळे पाचव्या दिवशी सामना जिंकण्यासाठी बांगलादेशला २६२ धावांची आणि अफगाणिस्तानला केवळ चार विकेट्सची गरज होती. मात्र, पावसाच्या व्यत्ययामुळे अफगाणिस्तानचा विजय धोक्यात होता.

परंतु, राशिदने बांगलादेशच्या फलंदाजांना आपल्या फिरकीच्या जाळ्यात अडकवले. त्यामुळे केवळ चार षटके शिल्लक असताना बांगलादेशचा डाव १७३ धावांवर आटोपला आणि अफगाणिस्तानने आपला पहिला कसोटी सामना जिंकला. राशिदने या डावात ४९ धावांच्या मोबदल्यात ६ बळी घेतले. अफगाणिस्तानचा अनुभवी खेळाडू मोहम्मद नबीचा हा अखेरचा कसोटी सामना होता.

संक्षिप्त धावफलक –

अफगाणिस्तान : ३४२ आणि २६० विजयी वि. बांगलादेश : २०५ आणि सर्वबाद १७३ (शाकिब अल हसन ४४, शदमन इस्लाम ४१; राशिद खान ६/४३, झहीर खान ३/५९).