महिला विभागीय क्रिकेट स्पर्धेत नाशिक संघाचे वर्चस्व

१७ वर्षानंतर नाशिक महिला संघ विभागीय स्तरावर विजेता

नाशिक : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाअंतर्गत सिंहगड येथील मैदानावर खेळल्या गेलेल्या महिलांच्या विभागीय क्रिकेट स्पर्धेत नाशिकच्या संघाने निर्विवाद वर्चस्व गाजवत सलग तिसरा सामनाही जिंकला. पुणे सिटी संघाला पराभूत करत नाशिकच्या संघाने तब्बल १७ वर्षानंतर विभागीय स्तरावर विजेता ठरण्याचा बहुमान पटकावला.

नाशिक संघाने प्रथम फलंदाजी करताना ४ बाद १९५ धावा केल्या. सलामीवीर ईश्वरी सावकार आणि साक्षी कानडीने दमदार सुरुवात करून दिली. ७२ धावांच्या सलामीनंतर प्रियांकाच्या साथीने ईश्वरीने पुन्हा अर्धशतकी भागिदारी केली. ईश्वरीने स्पर्धेतील सलग तिसरे अर्धशतक (६५) झळकावले.

रसिका शिंदेने २०, तर कर्णधार घोडके ५४ धावांवर नाबाद राहिली. १९६ धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरलेला पुणे सिटी संघ केवळ १३९ धावांवर बाद झाला. समीक्षा शेलारने ३, ईश्वरी, प्रियांका, दिव्या प्रत्येकी २, तर रसिकाने १ गडी बाद केला. प्रशिक्षक कपिल शिरसाठ, संघ व्यवस्थापक प्रकाश रोकडे, नॅशनल ड्रिस्ट्रिक्ट झोनल सेक्रेटरी दीपक जुन्नरे, प्रा. एम. एस. शिंदे यांचे संघाला मार्गदर्शन लाभले.