घरक्रीडाIPL 2020 : चांगल्या सुरुवातीनंतर मुंबईचा डाव गडगडला 

IPL 2020 : चांगल्या सुरुवातीनंतर मुंबईचा डाव गडगडला 

Subscribe

गतविजेत्या मुंबई इंडियन्सने २० षटकांत १६२ धावा केल्या. 

आयपीएलच्या तेराव्या मोसमाची भारतीयच नाही, तर जगभरातील क्रिकेट चाहते आतुरतेने वाट पाहत होते. अखेर या स्पर्धेला आजपासून सुरुवात झाली. सलामीच्या लढतीत रोहित शर्माचा मुंबई इंडियन्स आणि महेंद्रसिंग धोनीचा चेन्नई सुपर किंग्स हे संघ आमनेसामने होते. अबू धाबी येथे होत असलेल्या या सामन्यात चेन्नईचा कर्णधार धोनीने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले. मुंबईने २० षटकांत ९ बाद १६२ अशी धावसंख्या उभारत चेन्नईपुढे सामना जिंकण्यासाठी १६३ धावांचे आव्हान ठेवले. मुंबईकडून डावखुऱ्या सौरभ तिवारीने ४२ धावांची खेळी केली.

रोहित, डी कॉकची आक्रमक फलंदाजी  

सलामीच्या लढतीत मुंबईच्या डावाची चांगली सुरुवात झाली. कर्णधार रोहितने सामन्याच्या पहिल्याच चेंडूवर चौकार लगावला. त्याने आणि क्विंटन डी कॉकने आक्रमक फलंदाजी करत ४.४ षटकांत ४६ धावांची सलामी दिली. यात रोहितचा १० चेंडूत १२ धावांचा वाटा होता. त्याला पियुष चावलाने बाद केले. तर पुढच्याच षटकात डी कॉकला सॅम करनने माघारी पाठवले. डी कॉकने २० चेंडूत ३३ धावांची खेळी केली. यानंतर सौरभ तिवारी आणि सूर्यकुमार यादव (१७) यांनी काही काळ चांगली फलंदाजी केल्यावर सूर्यकुमारला दीपक चहरने बाद केले. त्यावेळी मुंबईची ३ बाद ९२ अशी धावसंख्या होती.

- Advertisement -

लुंगी इंगिडीचा भेदक मारा 

तिवारी (४२) आणि हार्दिक पांड्या (१४) यांना रविंद्र जाडेजाने माघारी पाठवले. या दोघांचेही फॅफ डू प्लेसिसने उत्कृष्ट झेल पकडले. लुंगी इंगिडीने यानंतर भेदक मारा करत कृणाल पांड्या (३), पोलार्ड (१८) आणि जेम्स पॅटिन्सन (११) यांना फार काळ खेळपट्टीवर टिकू दिले नाही. त्यामुळे मुंबईला २० निर्धारित षटकांत ९ बाद १६२ धावाच करता आल्या. चेन्नईकडून इंगिडीने ३८ धावांत ३ विकेट घेतल्या.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -