घरक्रीडाहवाई फटके मारणे गैर नाही -रोहित

हवाई फटके मारणे गैर नाही -रोहित

Subscribe

हवाई फटके मारण्यात काहीही गैर नाही, पण त्याचा सकारात्मक परिणाम झाला पाहिजे, असे मत भारताचा सलामीवीर रोहित शर्माने व्यक्त केले. कारकिर्दीच्या सुरुवातीला मधल्या फळीत खेळणार्‍या रोहितने मागील काही वर्षांत सलामीवीर म्हणून खेळताना मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये अप्रतिम कामगिरी केली आहे. त्याने यंदाच्या वर्षात क्रिकेटच्या तिन्ही प्रकारांत मिळून १० शतके लगावली, त्यापैकी ५ इंग्लंडमध्ये झालेल्या विश्वचषकात आली.

तो आपल्या हवाई फटक्यांसाठीही ओळखला जातो. त्याने क्रिकेटच्या तिन्ही प्रकारांत आतापर्यंत ४१० षटकार मारले आहेत. रोहितने आता आपली क्रिकेट अकादमी सुरु केली असून गुरुवारी त्याने यातीलच युवा खेळाडूंशी संवाद साधत त्यांना काही मौल्यवान सल्ले दिले.

- Advertisement -

हवाई फटके मारण्यात काहीही गैर नाही. लहानपणी सराव करताना आम्ही जर हवेत फटका मारला, तर आम्हाला नेट्समधून बाहेर काढले जायचे. मात्र, ही गोष्ट योग्य नाही. आपल्याला चांगले परिणाम मिळत असतील, तर नक्कीच हवाई फटके मारले पाहिजेत. त्यात काहीही चूक नाही. सध्याच्या पिढीला मोठे फटके मारायला आवडतात. मात्र, त्यांनी आपल्या खेळाचा विचार करणे गरजेचे आहे. आपल्यासाठी काय योग्य आहे, याची समज त्यांना असली पाहिजे. युवा खेळाडू जर एकच चूक वारंवार करत असेल, तर ती चूक कशी टाळायची, हे प्रशिक्षकांनी त्याला सांगितले पाहिजे, असे रोहित म्हणाला.

तसेच युवा खेळाडूंचा आत्मविश्वास वाढण्यासाठी त्यांना सतत पाठिंबा दर्शवणे गरजेचे आहे, असेही रोहितला वाटते. युवकांना मोठे फटके मारण्याची मोकळीक दिली पाहिजे. मात्र, तुम्ही धावा करणे सर्वात महत्त्वाचे आहे. तुम्ही १०० धावा ५० चेंडूत केल्या की २०० चेंडूत, याने काहीही फरक पडत नाही. शतक हे शतक असते. युवा खेळाडूचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी त्याला मोकळीक देणे आणि पाठिंबा दर्शवणे गरजेचे आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -