राज कुंद्राला अटक, पण चर्चा मात्र अजिंक्य रहाणेची…नेमके काय आहे कनेक्शन?

कुंद्राला अटक झाल्यानंतर भारताचा क्रिकेटपटू अजिंक्य रहाणेला सोशल मीडियावर ट्रोल केले जात आहे.

ajinkya rahane trolled after raj kundra arrest
राज कुंद्राला अटक, पण चर्चा मात्र अजिंक्य रहाणेची

बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती, उद्योगपती राज कुंद्राला मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून अटक करण्यात आली आहे. फेब्रुवारी महिन्यात मढ परिसरातल्या एका बंगल्यावर टाकलेल्या छाप्यामध्ये अश्लील चित्रपट निर्मिती सुरू असल्याचे मुंबई पोलिसांच्या लक्षात आले होते. त्यानंतर गुन्हे शाखेचा तपास सुरु झाला होता. या प्रकरणात अनेकांची चौकशी करण्यात आली. या चौकशीदरम्यान कुंद्राचा अश्लील चित्रपट निर्मितीमध्ये सहभाग असल्याचे स्पष्ट झाल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. त्यामुळे सोमवारी राज कुंद्राला अटक करण्यात आली. परंतु, त्याला अटक झाल्यानंतर भारताचा क्रिकेटपटू अजिंक्य रहाणेला सोशल मीडियावर ट्रोल केले जात आहे आणि याला कारण ठरले आहे, या दोघांमध्ये काही वर्षांपूर्वी झालेले संभाषण!

रहाणेचे ट्विट व्हायरल

रहाणेचे एक ट्विट चांगलेच व्हायरल होत आहे. १९ ऑक्टोबर २०१२ रोजी केलेल्या या ट्विटमध्ये ‘सर तुम्ही चांगले काम करत आहात,’ असे रहाणेने राज कुंद्राला संबोधून म्हटले होते. त्यानंतर कुंद्राने रहाणेचे आभारही मानले होते. त्यावेळी कुंद्रा आयपीएल संघ राजस्थान रॉयल्सचा सह-संघमालक होता आणि रहाणे या संघातून खेळत होता. परंतु, आता कुंद्राला अटक झाल्यानंतर साधारण नऊ वर्षांनी रहाणेचे ट्विट व्हायरल होत आहे.

दरम्यान, राज कुंद्रा आणि इतर एक आरोपी रायन थोर्प या दोघांना मंगळवारी न्यायालयात हजर करण्यात आले होते. या दोघांना २३ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. त्यामुळे त्यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. कुंद्राला सोमवारी रात्री, तर रायनला मंगळवारी सकाळी अटक करण्यात आली होती.