मुंबई : संघाबाहेर असलेला भारताचा स्टार फलंदाज अजिंक्य रहाणे सध्या सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी (SMAT 2024) मध्ये खौऱ्याने धावा करताना दिसत आहे. आज बडोद्याविरुद्ध झालेल्या सामन्यात त्याने 98 धावा करून संघाला विजय मिळवून दिला. त्यामुळे आज मुंबईने बडोद्यावर सहा विकेट्सने विजय मिळवत सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीच्या अंतिम फेरीत आपले स्थान निश्चित केले. (Ajinkya Rahane’s blistering knock sends Mumbai into Syed Mushtaq Ali Trophy final)
एम चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळवण्यात आलेल्या सामन्यात मुंबईने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र बडोद्याची सुरुवात खराब झाली. 23 धावांवर अभिमन्यू सिंगच्या रुपात बडोद्याला पहिला धक्का बसला. यानंतर शाश्वत रावत आणि कर्णधार कृणाल पंड्या यांनी दुसऱ्या विकेटसाठी 50 धावांची भागिदारी केली त्यामुळे 9.1 षटकारात बडोद्याने 2 विकेट गमावत 73 धावा जोडल्या. मात्र त्यानंतर बडोदा संघाची पडझड झाली. 15.2 षटकात बडोद्याने 103 धावांवर आपल्या 6 विकेट गमावल्या होत्या. कृणाल पंड्याच्या 24 चेंडूत 30 धावा आणि शिवालिक शर्माच्या नाबाद 36 धावांच्या जोरावर बडोद्याने 7 विकेट गमावत 158 धावा केल्या.
A STANDING OVATION FOR AJINKYA RAHANE FROM THE CROWD 💥 pic.twitter.com/NiR04VaoJh
— Johns. (@CricCrazyJohns) December 13, 2024
प्रत्युत्तरात मुंबई सुरुवातही खराब झाली. खराब फॉर्ममध्ये असलेला पृथ्वी शॉ फक्त 8 धावा करून बाद झाला. यानंतर सलामीवीर अजिंक्य रहाणे आणि कर्णधार श्रेयस अय्यर यांनी दुसऱ्या विकेटसाठी 88 धावांची भागिदारी केली. श्रेयस अय्यर 30 चेंडूत 4 चौकार आणि 3 षटकारांच्या मदतीने 46 धावा करून बाद झाला. यानंतर रहाणेने सूर्यकुमार यादवसोबत तिसऱ्या विकेटसाठी 40 धावांची भागिदारी केली. मात्र शतक पूर्ण करायला दोन धावांची गरज असताना अजिंक्य रहाणे चुकीचा फटका मारून बाद झाला. त्याने 56 चेंडूंत 11 चौकार आणि 5 षटकारांच्या शानदार 98 धावांची खेळी केली. त्यामुळे मुंबई 4 विकेट गमावत 158 धावांचा पाठलाग 16 चेंडू शिल्लक असतानाच पूर्ण केला.
हेही वाचा – Vinod Kambli : कपिल देव यांच्या ऑफरवर विनोद कांबळी म्हणाला…
स्पर्धेत 400 हून अधिक धावा करणारा रहाणे एकमेव फलंदाज
दरम्यान, सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी 2024 मध्ये अजिंक्य रहाणेने आतापर्यंत 8 सामने खेळताना 7 डावात 61.71 च्या उत्कृष्ट सरासरीने 432 धावा केल्या आहेत. या कालावधीत त्याचा स्ट्राइक रेट 169.41 राहिला आहे. महत्त्वाचे म्हणजे या स्पर्धेत 400 हून अधिक धावा करणारा तो एकमेव फलंदाज आहे. स्पर्धेतील त्यांच्या कामगिरीवर नजर टाकली तर, रहाणेने गोवाविरुद्ध पहिल्या सामन्यात फक्त 13 धावा केल्या होत्या. मात्र त्यानंतर रहाणेने महाराष्ट्रविरुद्ध 52 (34),
केरळविरुद्ध 68 (35), आंध्रप्रदेशविरुद्ध 95 (54), विदर्भविरुद्ध 84 (45) आणि आज बडोदाविरुद्ध 98 (56) शानदार फलंदाजी केली आहे. दोनदा त्याला आपले शतक पूर्ण करण्याची संधी होती. मात्र तो अपयशी ठरला. त्यामुळे आता अंतिम सामन्यात अजिंक्य रहाणे आपले शतक पूर्ण करतो का? हे पाहावे लागेल. दरम्यान, सय्यद मुश्ताक अली करंडक स्पर्धेच्या अंतिम फेरीत मुंबईचा सामना दिल्ली आणि मध्य प्रदेश यांच्यातील दुसऱ्या उपांत्य फेरीच्या विजेत्याशी होणार आहे.