घरक्रीडा...तर अक्रमचा खूनही केला असता!

…तर अक्रमचा खूनही केला असता!

Subscribe

अख्तरचे वादग्रस्त विधान

पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तर आपल्या आक्रमक गोलंदाजीसाठी ओळखला जायचा. आता तो त्याच्या आक्रमक आणि वादग्रस्त विधानांसाठी ओळखला जातो. काही दिवसांपूर्वी करोनाविरुद्ध लढ्यात निधी उभारण्यासाठी भारत आणि पाकिस्तान यांच्यात एकदिवसीय मालिका झाली पाहिजे असे अख्तर म्हणाला होता. त्यामुळे त्याच्यावर बरीच टीका झाली. आता त्याने आणखी एक वादग्रस्त विधान केले आहे. वसिम अक्रमने मला मॅच फिक्सिंग करण्यास सांगितले असते, तर मी कदाचित त्याचा खूनही केला असता, असे अख्तर म्हणाला.

मी ९० च्या काळातील काही सामने पाहत होतो. वसिम अक्रमने उत्कृष्ट गोलंदाजी करत किती वेळा पाकिस्तानला अशक्यप्राय वाटणारे विजय मिळवून दिले होते, हे पाहून आश्चर्य वाटले. मी एक गोष्ट स्पष्ट करु इच्छितो की, अक्रमने मला जर मॅच फिक्सिंग करण्यास सांगितले असते, तर मी कदाचित त्याचा खूनही केला असता. मात्र, त्याने कधीही मला काही चुकीचे करण्यास सांगितले नाही, असे अख्तर म्हणाला.

- Advertisement -

कारकिर्दीच्या सुरुवातीला दिलेल्या पाठिंब्याबाबत त्याने अक्रमचे आभार मानले. मी अक्रमसोबत सात-आठ वर्षे खेळलो. त्याने मला खूप पाठिंबा दिला. तो अनेकदा सुरुवातीच्या फलंदाजांना बाद करण्याची जबाबदारी स्वतःवर घेत माझे काम सोपे करायचा. मला केवळ तळाच्या फलंदाजांना बाद करावे लागायचे. त्याने माझ्यापेक्षा खूप जास्त विकेट घेतल्या आहेत. मात्र, तरीही तो मला हवी तशी गोलंदाजी करु द्यायचा, असे अख्तरने सांगितले.

अख्तरने पाकिस्तानकडून ४६ कसोटी सामन्यांत १७८ बळी, तर १६३ एकदिवसीय सामन्यांत २४७ बळी घेतले. दुसरीकडे अक्रमने १०४ कसोटी आणि ३६५ एकदिवसीय सामन्यांत पाकिस्तानचे प्रतिनिधित्व केले, ज्यात त्याने अनुक्रमे ४१४ आणि ५०२ मोहरे टिपले.

- Advertisement -

एक वर्ष तरी क्रिकेट विसरा!
करोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या सर्व खेळ बंद आहेत आणि क्रिकेटही याला अपवाद नाही. आणखी एक वर्ष तरी क्रिकेट होईल असे अख्तरला वाटत नाही. करोनावर नियंत्रण मिळवण्यात कधी यश येणार हे आता सांगणे अवघड आहे. किती लोकांना करोनाची लागण झाली आहे हे कळत नाही, तोपर्यंत क्रिकेट होऊ शकत नाही. करोनामुळे आणखी एक वर्ष तरी क्रिकेट होईल असे मला वाटत नाही. हा काळ सर्वांसाठीच अवघड आहे, पण आपण यातून बाहेर पडू अशी मला आशा आहे, असे अख्तरने नमूद केले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -