घरक्रीडाAll England Badminton : सिंधू उपांत्य फेरीत पराभूत; भारताचे आव्हान संपुष्टात

All England Badminton : सिंधू उपांत्य फेरीत पराभूत; भारताचे आव्हान संपुष्टात

Subscribe

सिंधूच्या पराभवामुळे भारताचेही ऑल इंग्लंड स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले आहे.

भारताची आघाडीची बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधूला ऑल इंग्लंड अजिंक्यपद स्पर्धेच्या उपांत्य फेरीत पराभवाचा सामना करावा लागला. उपांत्य फेरीच्या सामन्यात तिला थायलंडच्या पोर्नपावी चोचूवॉन्गने १७-२१, ९-२१ असे सरळ गेममध्ये पराभूत केले. सिंधूच्या पराभवामुळे भारताचेही ऑल इंग्लंड स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले आहे. स्पेनची स्टार खेळाडू कॅरोलिना मरीनने दुखापतीमुळे या स्पर्धेतून माघार घेतल्यामुळे सिंधूला जेतेपदासाठी प्रबळ दावेदार मानले जात होते. परंतु, उपांत्य फेरीत चांगला खेळ करण्यात ती अपयशी ठरली. त्यामुळे ऑल इंग्लंड स्पर्धेत तिची जेतेपदाची पाटी कोरीच राहिली.

शनिवारी झालेल्या महिला एकेरीच्या उपांत्य फेरीत पाचव्या सीडेड सिंधूला थायलंडच्या पोर्नपावी चोचूवॉन्गने १७-२१, ९-२१ असे सरळ गेममध्ये पराभूत केले. या सामन्याच्या पहिल्या गेममध्ये सिंधूने चोचूवॉन्गला चांगली झुंज दिली. सिंधू पहिल्या गेमच्या सुरुवातीला ७-१४ अशी पिछाडीवर पडली होती. त्यानंतर तिने चांगले पुनरागमन करत चोचूवॉन्गची आघाडी १३-१५ आणि १६-१७ अशी कमी केली. यानंतर मात्र चोचूवॉन्गने तिचा खेळ उंचावत पहिला गेम २१-१७ असा जिंकला.

- Advertisement -

दुसऱ्या गेममध्ये सिंधूचा खेळ अधिकच खालावला. शुक्रवारी उपांत्यपूर्व फेरीत अकाने यामागूचीविरुद्धचा सामना जिंकण्यासाठी सिंधूला (१६-२१, २१-१६, २१-१९) बरीच मेहनत घ्यावी लागली होती. त्यातच उपांत्य फेरीतील पहिला गेम २५ मिनिटे चालल्यामुळे सिंधू दुसऱ्या गेममध्ये थकलेली दिसली. तिने दुसरा गेम ९-२१ असा मोठ्या फरकाने गमावला. त्यामुळे तिच्यावर स्पर्धेतून बाहेर होण्याची नामुष्की ओढवली.

Anvay Sawant
Anvay Sawanthttps://www.mymahanagar.com/author/sanvay/
गेल्या तीन वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. वृत्तपत्र आणि आता डिजिटल मीडिया असा दोन्ही क्षेत्रांचा अनुभव. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय क्रीडा विषयात लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -