अल्झारी जोसेफ मुंबई इंडियन्समध्ये

जोसेफ

आयपीएलच्या १२ व्या मोसमात मुंबई इंडियन्सच्या संघात वेस्ट इंडिजचा वेगवान गोलंदाज अल्झारी जोसेफचा समावेश करण्यात आला आहे. न्यूझीलंडचा गोलंदाज अ‍ॅडम मिलने दुखापतीमुळे या स्पर्धेत खेळू शकणार नाही. त्यामुळे मिलनेच्या जागी मुंबईने बदली खेळाडू म्हणून जोसेफची निवड केली आहे.

अल्झारी जोसेफ२०१६ सालच्या १९ वर्षांखालील विश्वचषकात चांगले प्रदर्शन केल्यामुळे प्रकाशझोतात आला. या विश्वचषकात जोसेफने ६ सामन्यांमध्ये १३ विकेट घेतल्या होत्या. यामध्ये भारताविरुद्धच्या अंतिम सामन्यात ३ विकेटचा समावेश होता. त्याच्या या कामगिरीमुळेच वेस्ट इंडिजने भारताचा पराभव केला होता. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये जोसेफने आतापर्यंत ९ कसोटी सामन्यांत २५ विकेट आणि १६ एकदिवसीय सामन्यांत २४ विकेट घेतल्या आहेत. मात्र, त्याने अजून आंतरराष्ट्रीय टी-२० सामना खेळलेला नाही. स्थानिक टी-२० क्रिकेटमध्ये त्याने ७ सामन्यांत ९ विकेट घेतल्या आहेत.

जोसेफच्या समावेशामुळे मुंबईच्या गोलंदाजीची ताकद आणखी वाढली आहे. काही दिवसांपूर्वीच लसिथ मलिंगाला श्रीलंका क्रिकेट बोर्डाने या स्पर्धेत खेळण्यासाठी परवानगी दिली होती. मे महिन्यात सुरू होणारा विश्वचषक लक्षात घेता श्रीलंका क्रिकेट बोर्डाने श्रीलंकेच्या सर्व खेळाडूंना स्थानिक एकदिवसीय स्पर्धेत खेळणे बंधनकारक केले होते. जे खेळाडू या स्पर्धेत खेळणार नाहीत, त्यांचा विश्वचषकासाठी विचार केला जाणार नाही, असे बोर्डाने स्पष्ट केले होते. मात्र, बीसीसीआयने विनंती केल्यानंतर श्रीलंकन बोर्डाने मलिंगाला आयपीएल खेळण्याची परवानगी दिली आहे.