अमित पंघालची ‘पुन्हा’ अर्जुन पुरस्कारासाठी शिफारस

मागील वर्षी विचार झाला नव्हता

अमित पंघाल

भारताचा बॉक्सर अमित पंघालची भारतीय बॉक्सिंग महासंघाने ‘पुन्हा’ एकदा अर्जुन पुरस्कारासाठी शिफारस केली आहे. अमितची मागील वर्षीही या पुरस्कारासाठी शिफारस करण्यात आली होती. भारतातील सर्वोत्तम बॉक्सर्सपैकी एक म्हणून ओळखल्या जाणार्‍या अमितने काही दिवसांपूर्वीच आशियाई बॉक्सिंग चॅम्पियनशिप स्पर्धेच्या ५२ किलो वजनी गटात सुवर्णपदक पटकावण्याचा पराक्रम केला होता.

अमितने मागील वर्षी एशियाडमध्ये ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेत्या हसनबॉय दुस्मातोव्हचा पराभव करत सुवर्णपदकाला गवसणी घातली होती. त्यामुळे मागील वर्षीही भारतीय क्रीडा क्षेत्रातील दुसरा सर्वात मोठा आणि मानाचा पुरस्कार असणार्‍या अर्जुन पुरस्कारासाठी त्याची शिफारस करण्यात आली होती. मात्र, २०१२ मध्ये उत्तेजक चाचणीत दोषी आढळल्याने त्याच्यावर एका वर्षाची बंदी घालण्यात आल्यामुळे त्याचा या पुरस्कारासाठी विचार झाला नव्हता, परंतु त्याने यावर्षीही आपली दमदार कामगिरी सुरू ठेवली आहे.

अमितने या वर्षाच्या सुरुवातीला नव्या वजनी गटात (५२ किलो) खेळत बल्गेरियामध्ये झालेल्या स्पर्धेत सुवर्णपदक मिळवले होते, तर काही दिवसांपूर्वीच आशियाई बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्येही सुवर्ण मिळवले. त्याच्या या सातत्यपूर्ण कामगिरीमुळेच भारतीय बॉक्सिंग महासंघाने त्याची ‘पुन्हा’ एकदा अर्जुन पुरस्कारासाठी शिफारस केली आहे.