घरक्रीडाअपंगत्वावर मात करत नेमबाजीत ‘अपूर्वा’ई

अपंगत्वावर मात करत नेमबाजीत ‘अपूर्वा’ई

Subscribe

वयाच्या तिसर्‍या वर्षी रद्दीतील कागदावर नेमबाजीचे छायाचित्र बघून वडिलांना मोठ्या कुतुहलाने त्याबाबत विचारणार्‍या मुलीने आज वयाच्या पंधराव्या वर्षी आंतरराष्ट्रीय पातळीपर्यंत धडक मारली हे ऐकून नवल वाटेल. पण, हीच मुलगी कर्णबधिर अन् जन्मत:च हृदयाला छिद्र, एक किडनी आणि अत्यंत संवेदनशील असल्याचे ऐकल्यावर तिच्या या क्रीडा क्षेत्रातील ‘अपूर्व’ यशाबद्दल डोळे विस्फारतात. अपूर्वा पाटील असे या मुलीचे नाव असून, ती सातपूरच्या एक्सएल टार्गेट शूटर्स असोसिएशनच्या रेंजवर नियमित सराव करते. आजवर तिने अनेक आंतरशालेय, जिल्हास्तरीय, राज्यस्तरीय स्पर्धा गाजवल्या आहेत. शिवाय दोनवेळा राष्ट्रीय स्पर्धांमधील तिचा सहभाग अन् सामान्यांच्या गटातील कामगिरी थक्क करणारी आहे. जागतिक कर्णबधिर दिनी तिच्या या खडतर, आव्हानात्मक प्रवासाविषयी…

नाशिकमध्ये शिवाजीनगर, सातपूर परिसरात राहणार्‍या सर्वसाधारण कुटुंबात अपूर्वाचा जन्म झाला. जन्मतःच तिच्या हृदयाला छिद्र आणि एकच किडनी असल्याचे, तसेच ती अत्यंत संवेदनशील असल्याचे निष्पन्न झाले. भाग्यश्री आणि महेंद्र पाटील हे तिचे आई-वडील या धक्क्यातून सावरत नाहीत, तोच त्यांना वर्षभरातच दुसरा धक्का बसला. दिवाळीमध्ये फटाक्यांच्या मोठ्या आतषबाजीचा तिच्यावर कुठलाही परिणाम झाला नाही. कोणत्याच आवाजाला ती प्रतिसाद देत नसल्याचे लक्षात आल्याने चिंतातूर आईने तिची डॉक्टरांकडून तपासणी केली असता अपूर्वा कर्णबधिर असल्याचे समजले. तत्काळ तिची कॉक्लिअर इम्प्लान्ट शस्त्रक्रिया करावी लागली. येथून सुरू झाला अपूर्वा आणि तिच्या कुटुंबियांचा खडतर प्रवास.

- Advertisement -

पुढे पाटील कुटुंबियांना शालेय प्रवेशासाठीही वारंवार झगडावे लागले. या दरम्यानच्या काळात वडिलांच्या किराणा दुकानात बसलेली असताना अपूर्वाने रद्दीतील पेपरवर नेमबाजीचे छायाचित्र पाहून वडिलांना त्याविषयी कुतुहलाने विचारणा केली. वडिलांनी तिला समजून सांगितलेच शिवाय तिला सातपूर येथील भीष्मराज बाम सरांच्या शूटिंग रेंजवर नेले. अपूर्वाला नेमबाजीत रस असल्याचे पाहून पालकांसह बाम सरांनी तिला आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक मोनाली गोर्हे यांच्याकडे प्रशिक्षणासाठी पाठवले. मोनाली यांच्याकडे ही पहिलीच कर्णबधिर विद्यार्थिनी असल्याने त्यांच्यापुढे आव्हान उभे ठाकले.

मात्र, त्यांनी अपूर्वाची आई, तसेच सहकारी प्रशिक्षक श्रद्धा नालमवार यांच्या सोबतीने अपूर्वाला नेमबाजीचे धडे देण्यास सुरुवात केली. अपूर्वानेही शारीरिक अपंगत्वावर जिद्दीने मात करत एक-एक पायरी चढत अनेक स्पर्धांमध्ये वर्चस्व सिद्ध केले. सर्व स्तरांवरील स्पर्धांत तिने अनेक सुवर्ण, रौप्यपदकांची लयलूट केली. गेल्या दोन वर्षांत तिने दोनदा राष्ट्रीय पातळीवरही आपली छाप उमटवली. आता नाशिककर अपूर्वा स्वित्झर्लंड येथे यावर्षी होणार्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भाग घेणार असून ती रोज दोन तास सराव, व्यायाम, मेडिटेशन करत आहे.

- Advertisement -

अभ्यासातही टॉपर
भोसलाच्या विद्या प्रबोधिनी प्रशालेत नववीत शिकणार्‍या अपूर्वाला प्रारंभी शालेय प्रवेशासाठी अनेक आव्हानांना तोंड द्यावे लागले. तिच्या आईने स्वत: तिचा अभ्यास घेऊन तिला सक्षम बनवले. ज्यामुळे तिला प्रवेश मिळू शकला. पहिल्या इयत्तेत अपूर्वाला इरांसमवेत जुळवून घेताना अडचणी आल्या, मात्र त्यानंतर तिने अभ्यासात सातत्याने यशस्वी कामगिरी केली. अभ्यासासह खेळातही नैपुण्य दाखवणार्‍या अपूर्वाला नुकतेच भोसलाच्या सर्व संस्थांमधून ‘उत्कृष्ट विद्यार्थिनी’ पुरस्काराने गौरवण्यात आले.

आईची जिद्द
जन्मापासूनच अनेक अडचणींना सामोरे जात असलेल्या अपूर्वाचा आजवरचा प्रवास तिच्या आईमुळे सुखकर होतोय असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. नेमबाजी शिकतेवेळीही प्रशिक्षकांसमवेत स्वत: उपस्थित राहून भाग्यश्री यांनी अपूर्वाला प्रत्येक गोष्ट समजावून सांगितली. मुख्य म्हणजे प्रशिक्षक मोनाली यांच्या सूचनेवरून भाग्यश्री यांनी स्वत: बेसिक प्रशिक्षण घेतले, जेणेकरून अपूर्वाला शिकवणे सोपे गेले. आर्थिक परिस्थिती अत्यंत खडतर असतानाही त्यांनी अपूर्वाचा आरोग्य, शिक्षण आणि क्रीडा खर्च सक्षमपणे उचलला.

खडतर आव्हानच
अपूर्वाला घडवताना प्रशिक्षक मोनाली गोर्हे, श्रद्धा नालमवार यांनी मोठी मेहनत घेतली. ऐकू येत नसल्याने अपूर्वासाठी तांत्रिक आणि शारीरिकदृष्ट्या अधिक बारकाईने प्रत्येक गोष्ट समजावून सांगावी लागत होती. मात्र, प्रशिक्षकांनी अपूर्वाला तिच्या आईच्या माध्यमातून तसेच कागदावर लिहून देत उत्कृष्टरित्या घडवले. मुख्य म्हणजे, तिच्याकडून कुठलेही प्रशिक्षण शुल्क न घेता शक्य तितक्या सुविधांसह अपूर्वाला वेळोवेळी स्पर्धांमध्ये उतरवून व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचे काम गोर्हे यांनी केले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -