Sunday, June 13, 2021
27 C
Mumbai
घर क्रीडा वास्तुपुरूष

वास्तुपुरूष

हरभजन, सेहवाग आणि युवराजनेही कधी मनातल्या मनात आणि कधी बाहेर महेंद्रसिंग धोनीविषयी राग काढला. युवराज सोडा त्याचे बाबा योगराज सिंग यांनीसुद्धा धोनीच्या नावाने नेहमी खडे फोडले. पण तो कधी टीकेने नाराज झाला नाही की, शाबासकीने हरकून गेला नाही... आपले काम चोख करत राहिला. दोन वर्ल्ड कप आणले, कसोटी चॅम्पियनपदावर भारताचे नाव कोरले... गांगुलीने भारताला जिंकायची सवय लावली. धोनीने जगाला छाती पुढे करून हो आम्ही जगज्जेते आहोत, हे दाखवून दिले. गांगुलीने पाया रचला आणि धोनीने कळस चढवला! रांचीसारख्या एका छोट्या शहरातून येऊन नाव कमावणे सोपे नव्हते. रांची म्हणजे काही मुंबई आणि दिल्ली नाही. पण, अथक परिश्रम आणि अंगभूत क्रिकेट गुणांमुळे भारतीय क्रिकेट वास्तूला भक्कम बनवणारा तो वास्तुपुरुष ठरला.

Related Story

- Advertisement -

भारताच्या ऑस्ट्रेलिया दौर्‍याला या आठवड्यापासून सुरुवात होत असून २७ नोव्हेंबरला पहिल्या वनडे सामन्याने दौर्‍याचा श्रीगणेशा होईल तेव्हा एका माणसाची आठवण येत राहील. तो फक्त माणूस नाही. तो आहे वास्तुपुरुष. वास्तू जुनी झाली म्हणून वास्तूसमोर दिवा लावायला कोणी विसरत नाही. ती वास्तू तथास्तू  म्हणत असते…घरदार सुख समाधानाने नादावे म्हणून आशीर्वाद देत असते. तो वास्तुपुरुष असतो. भारतात क्रिकेट हा एक धर्म मानून लोक महान क्रिकेटपटूंना देव म्हणून आपल्या काळजाच्या कोपर्‍यात ठेवतात. जसे सचिन तेंडुलकरला देव्हार्‍यात नेऊन ठेवलंय. पण तो सचिनसारखा देव नाही. तो काही विक्रमांसाठी जन्मलेला नाही. तो वास्तुपुरुष आहे.

भारतीय क्रिकेटच्या वास्तूला त्याने सुख दिले, शांती दिली आणि भरभराटीचे दिवस दाखवले…तो आहे महेंद्रसिंग धोनी. कांगारूंच्या हिरव्यागार मैदानावर माहीच्या गरगर फिरणार्‍या बॅटमधून चेंडू सुसाट वेगाने सीमारेषेच्या बाहेर जाताना दिसणार नाही तेव्हा हा वास्तुपुरुष आठवत राहील. डोळ्याची पापणी मिटायच्या आत फलंदाजाच्या यष्ठ्या गुल झालेल्या कुठे शोधाव्या लागतील तेव्हा धोनी डोळ्यासमोरून झरझर पुढे जात जाईल. तो दिसणार नसला तरी त्याचे अस्तित्व दिसत राहील… मागच्या कांगारूंच्या दौर्‍यात तो होता. टी-२० आणि वन डे टीममध्ये तो होता आणि त्याची कामगिरी नजरेत भरणारी होती. यामुळे टी-२० मध्ये भारतीय संघ हरला तरी वन डेत कोहलीची टीम भारी ठरली.

- Advertisement -

आज माही कोणाला नको झाला असेल आणि आकाश चोप्रासारखे लुंगेसुंगे क्रिकेटपटू ज्याच्या बॅटमधून चेंडू सीमारेषेजवळ जाताना धापा टाकायचा तो आता धोनीला सांगणार की, आता तू आयपीएल खेळू नकोस. काय दिवस आलेत. हातात माईक आला कि यांना वाटतं आपण पुराणपुरुष झालो. आधी आपण काय होतो ते बघा. दिसला माईक का चावायला सुरुवात. आधी सिद्धू चावत होता. आता आकाश चावतोय. जगातले सगळे क्रिकेट याला कळते. गौतम गंभीर तर धोनी कायमचा क्रिकेटच्या मैदानावरून जाऊ दे यासाठी देव पाण्यात बुडवून बसलाय. गंभीरनेसुद्धा आपण सर्वव्यापी असल्याचे कॉपीराईट घेतलेत. पण, गंभीरला पुढच्या वर्षांपर्यंत तरी थांबावे लागेल. कारण माही तुम्ही म्हणता म्हणून निवृत्त होणार नाही. तो वेळ घेईल. खरेतर धोनीचे नाव खूप झाले आणि आपल्याला काही मिळाले नाही, अशी भावना करून बाहेर गंभीर गंभीरपणा सोडा अतिशहाणपणा करत राहिला.

त्याचवेळी हरभजन, सेहवाग आणि युवराजनेही कधी मनातल्या मनात आणि कधी बाहेर धोनीविषयी राग काढला. युवराज सोडा त्याचे बाबा योगराज सिंह यांनीसुद्धा धोनीच्या नावाने नेहमी खडे फोडले. पण तो कधी टीकेने नाराज झाला नाही की, शाबासकीने हरकून गेला नाही… आपले काम चोख करत राहिला. दोन वर्ल्ड कप आणले, कसोटी चॅम्पियनपदावर भारताचे नाव कोरले…गांगुलीने भारताला जिंकायची सवय लावली. धोनीने जगाला छाती पुढे करून हो आम्ही जगज्जेते आहोत, हे दाखवून दिले. गांगुलीने पाया रचला आणि धोनीने कळस चढवला!

- Advertisement -

अनेक संघर्षांनंतर आणि जीवनातील चढ-उतारानंतर धोनीने क्रिकेट विश्वात स्वतःला या जागी स्थापन केले हे आधी लक्षात घ्यायला हवे. रांचीसारख्या एका छोट्या शहरातून नाव कमावणे सोपे नव्हते. रांची म्हणजे काही मुंबई आणि दिल्ली नाही. पण, अथक परिश्रम आणि अंगभूत क्रिकेट गुणांमुळे भारतीय क्रिकेट वास्तूला भक्कम बनवणारा तो वास्तुपुरुष ठरला. दृढनिश्चय, कठोर परिश्रम आणि प्रामाणिकतेने केले तर यश नक्की मिळतं हे धोनीकडे पाहिल्यावर पटते. मुख्य म्हणजे त्याचा मेंदू हा क्रिकेटसाठी घडवलाय, असं त्याच्याकडे बघून वाटते. क्रिकेट त्याच्या तनामनात भरून राहिलय. अचानक झोपेतून उठवून त्याला कोणाच्या हातात चेंडू द्यायचा आणि कुठे फिल्डिंग लावायची असे विचारले तर तो एका क्षणाचा विलंब तो लावणार नाही आणि मुख्य म्हणजे तो यश मिळवेल, अशी खात्री वाटत आलीय.

ज्यावेळी धोनीला कर्णधार बनविण्यात आले त्याआधी भारताची धुरा राहुल द्रविड सांभाळत होता. द्रविडने राजीनामा दिल्यानंतर नेतेपदाची सूत्रे धोनीकडे आली.  धोनीला कर्णधार बनविण्यात तेंडुलकर आणि द्रविड यांचा मोठा हात आहे. माहीला कर्णधार बनविण्याकरीता  द्रविड आणि  तेंडुलकरने शब्द टाकला आणि पुढे इतिहास झाला. प्रचंड यश मिळवूनही धोनीला लोकांना धोनीला निवृत्त करण्याची घाई काही आताच झालेली नाही. वानखेडेवर झालेला टी-२० विश्वचषकाच्या उपांत्य फेरीनंतरचा ही आठवण आहे. एका परदेशी पत्रकाराने धोनीला निवृत्तीबाबत विचारले.आतापर्यंत बर्‍याच गोष्टी तू कमावल्या आहेस, यापुढेही क्रिकेट खेळण्याचा तुझा विचार आहे का? धोनी खरेतर कधीच आपल्यावरील संयम ढळू देत नाही.. पण त्या वेळी धोनी सारे भान विसरला होता. त्याने त्या परदेशी पत्रकाराला स्वत:जवळ बोलावले. मी तंदुरुस्त नाही? मी धावा काढताना चपळाईने धावत नाही का? मग मला असा प्रश्न का विचारता, असे धोनी म्हणाला. शक्यतो धोनी अशा प्रश्नांना यापूर्वी फक्त एक स्मित देऊन शांत करायचा.

२०१४ पासून धोनीला निवृत्तीबाबत विचारणा करायला सुरुवात झाली. धोनी जायबंदी असताना विराट कोहलीने ऑस्ट्रेलियामध्ये संघाचे नेतृत्व करायला सुरुवात केली. तेव्हापासून निवृत्तीचा प्रश्न धोनीच्या पाचवीला पुजलेला झाला. ऑस्ट्रेलियातील २०१५ सालचा विश्वचषक. भारताचा उपांत्य फेरीत पराभव. पत्रकार परिषदेमध्ये धोनीला पहिला प्रश्न निवृत्तीचाच. धोनीसाठीही हे अनपेक्षित असेल. या वर्षी दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यापूर्वीच्या पत्रकार परिषदेतही पहिला प्रश्न धोनीला निवृत्तीचा. सारे काही निवृत्तीवर येऊन ठेपलेले. मी म्हणजे मंदिरातील घंटा आहे, प्रत्येक जण येतो आणि वाजवून जातो. मी निवृत्तीच्या प्रश्नावर काही बोललो नाही तर वादाला तोंड फुटणार. आणि जर समर्पक उत्तर दिले तरी वादविवाद ठरलेले, असे धोनीने आपला मित्र आणि व्यवस्थापक अरुण पांडेला सांगितले होते.

तीनवेळा आयपीएलचे जेतेपद मिळवणारा चेन्नईचा विजयरथ यंदा लीग स्टेजच्या गाळात रुतला. बारा वर्षांपूर्वी आयपीएल अवतरलं तेव्हा कोणाला वाटलंही नव्हतं की धोनी चेन्नईकरांचा लाडका होईल. धोनी आणि चेन्नई सुपर किंग्ज हे एकमेकांचे समानार्थी शब्द होतील. धोनी आयपीएलच्या तयारीसाठी चेन्नईत दाखल होई तेव्हापासून जल्लोषाला उधाण येई. धोनीच्या सराव सत्राला हजारो चाहत्यांची गर्दी उसळत असे.  बीसीसीआयचे माजी अध्यक्ष एन. श्रीनिवासन यांनी चेन्नईकरांना धोनीरुपी बीज दिलं. एक तपानंतर चेन्नईकरांच्या थालाचा लोकप्रियतेच्या, जिंकण्याच्या, जेतेपदांच्या बाबतीत डेरेदार वृक्ष झाला आहे. कर्णधारपदाचा काटेरी मुकूट आणि बॅटिंग करताना फिनिशरची जबाबदारी या दोन्ही आघाड्या धोनीने समर्थपणे सांभाळल्या. अशक्यप्राय स्थितीत गेलेल्या मॅच जिंकून देण्यात धोनीचा हातखंडा आहे. बारा वर्षात चेन्नईने कर्णधार बदलला नाही, याचे कारण धोनी आपल्या सहकार्‍यांना घेऊन जिंकण्याचे प्रयोग करत राहिला. या मेहनतीला अपेक्षित फळे मिळत राहिली. यंदा मात्र हा मिडास टच हरवला. मात्र आंतरराष्ट्रीय स्तरावरील मोठे खेळाडू, भारतासाठी खेळणारे खेळाडू, नव्या दमाचे खेळाडू या सगळ्यांची मोट बांधण्याचं काम धोनीने केलं.

होतकरू खेळाडूंसाठी धोनी माहीभाई झाला. आंतरराष्ट्रीय खेळाडूंसाठी तो एमएमस झाला. कोणत्याही बिकट क्षणी तो बर्फाइतका थंड राहिला. आपल्या लक्ष्यापासून विचलित न होण्याच्या या ध्येयामुळे त्याने यशाचे शिखर गाठले. पुढे तो आयपीएल खेळेल की नाही माहीत नाही. पण माहीला माहीत आहे की, आपण कुठे थांबावे ते. कपिल देवचा चेंडूसुद्धा शेवटी शेवटी यष्ठ्यांपर्यंत पोहचत  नव्हता. टप्पे टप्पे पडत तो जात होता. भारताचा हा सर्वोत्तम अष्टपैलू खेळाडू चाचपडताना बघून वाईट वाटत होते. सचिनचे पायसुद्धा कारकिर्दीच्या शेवटच्या क्षणी हालत नव्हते. तो काही प्रसंगी अचानक खाली बसतोय की काय अशी मनोमनी भीती वाटत होती. पण तसे तर धोनीचे झालेले दिसलेले नाही. फॉर्म दिसला नाही, पण शरीर खूप थकलेले आहे, असे वाटले नाही. कदाचित तो पुढची आयपीएल खेळेलही. त्याला कोणी निवृत्त करण्याची घाई करू नये. तो माही आहे.

 

- Advertisement -