जागतिक शालेय जिम्नॅस्टिक स्पर्धेत आर्यन करणार भारताचे नेतृत्व, स्पर्धा जिंकण्याचा दाट विश्वास

Aryan and manas lead Indian team in World School Gymnastics Championships
जागतिक शालेय जिम्नॅस्टिक स्पर्धेत आर्यन करणार भारताचे नेतृत्व, स्पर्धा जिंकण्याचा दाट विश्वास

फ्रान्समध्ये रंगणाऱ्या जागतिक शालेय जिम्नॅसियाड स्पर्धेत पदक जिंकून देशाला गौरव मिळवून देऊ असा ठाम विश्वास भारतीय जिम्नॅस्टिक संघाचा कर्णधार आर्यन दवंडे आणि त्याचा सहकारी मानस मानकवळे यांनी व्यक्त केला.
यंदाची १९ वी आयएसएफ जागतिक शालेय जिम्नॅसियाड १४ ते २२ मे दरम्यान फ्रांसमधील नॉर्मडी शहरात रंगणार आहे. स्पर्धेतील वेगवेगळ्या क्रीडा प्रकारात जगातील ७० देशातील सुमारे ३५०० जिम्नॅस्ट आपलं खेळातील नैपुण्य पणाला लावणार आहेत. या स्पर्धेकरता ठाण्याच्या आर्यन दवंडेच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ सहभागी होणार आहे. या स्पर्धेकरता संघनिवडण्यासाठी भारतीय शालेय क्रीडा महासंघाची राष्ट्रीय निवड चाचणी पुण्यातील बालेवाडी येथे पार पडली.

राष्ट्रीय संघात वर्णी लागण्यासाठी विविध राज्यातील आघाडीचे ३१ युवा जिम्नॅस्ट निवड चाचणीत सहभागी झाले होते. त्यात ठाण्याच्या आर्यनने ७०.१० गुण मिळवून प्रथम क्रमांकासह भारतीय संघात स्थान मिळवले. तर त्याचा सहकारी खेळाडू मानस मनकवळे ने ६८.५५ गुण मिळवत तिसऱ्या क्रमांकानिशी संघात जागा मिळवली. सरस्वती क्रिडा संकुलाचे मुख्य प्रशिक्षक महेंद्र बाभूळकर हे भारतीय संघाचे मार्गदर्शक असणार आहेत. जागतिक शालेय स्पर्धेचा भारतीय खेळाडूना अनुभव नसला तरी त्यांची तयारी पाहता खेळाडूंकडून पदकांची अपेक्षा बाळगून असल्याचे बाभूळकर यांनी सांगितले. याशिवाय ठाण्यातील साही बाभूळकर ही दुभाषी म्हणून भारतीय संघासोबत असणार आहे.

विविध राज्य आणि राष्ट्रीय जिम्नॅस्टिक स्पर्धेत छाप पाडून आपली दखल घ्यायला लावणाऱ्या या दोघांचे देशासाठी पदक जिंकण्याचे स्वप्न केवळ पैशाअभावी विरून जाण्याची शक्यता निर्माण झाली होती. पण आर्यन आणि मानस जिमन्स्टिकचे प्रशिक्षण घेत असलेल्या सरस्वती क्रिडा संकुलातील इतर प्रशिक्षणार्थ्यांचे पालक , ठाणे महापालिकेचे माजी नगरसेवक, वृक्ष प्राधिकरणाच्या सदस्या नम्रता भोसले यांनी केलेल्या सहकार्यामुळे आर्यन आणि मानसचा स्पर्धेत सहभागी होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

मानस पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या कनिष्ठ महाविद्यालयात विज्ञान शाखेत अकरावीला आहे. तर आर्यनने सरस्वती सेकंडरी स्कुलमधून नुकतीच दहावीची परीक्षा दिली आहे. मागील २० वर्षांपासून सरस्वती क्रीडा संकुलात दरवर्षी ५० ते ५० आर्टिस्टिक जिम्नॅस्टना सरावासाठी इनडोअर सुविधा उपलब्ध करुन दिली जात आहे. या वाटचालीत संस्थेने ५ आंतरराष्ट्रीय, ३५ राष्ट्रीय आणि ५५ राज्यस्तरीय विजेते ठाणे जिल्ह्याला दिले आहे. याशिवाय मुख्य प्रशिक्षक महेंद्र बाभूळकर यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेच्या जिम्नॅस्टनी राष्ट्रीय स्तरावर २५१ आणि राज्यस्तरावर ८७५ पदके विविध स्पर्धामध्ये मिळविली आहेत.


हेही वाचा : रूट मोबाईलच्या विजयात शशिकांत कदम चमकला