Ashes 2021 AUS vs ENG : पिंक-बॉल कसोटीत ही कामगिरी करणारा पहिला गोलंदाज ठरला मिचेल स्टार्क

ॲडलेडमध्ये सध्या सुरू असलेल्या ॲशेस मालिकेतील दुसऱ्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कच्या नावावर एका वेगळ्या विक्रमाची नोंद झाली आहे

ॲडलेडमध्ये सध्या सुरू असलेल्या ॲशेस मालिकेतील दुसऱ्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कच्या नावावर एका वेगळ्या विक्रमाची नोंद झाली आहे. इंग्लंडच्या पहिल्या डावात ४ बळी पटकावून मिचेल स्टार्कने पिंक-बॉल कसोटीमध्ये सर्वप्रथम ५० बळी घेण्याचा विक्रम केला आहे. दुसऱ्या कसोटीत ऑस्ट्रेलियन संघाने मजबूत पकड बनवली आहे. स्टार्क आणि फिरकीपटू नाथन लायनच्या चमकदार खेळीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने मालिकेतील सलग दुसऱ्या विजयाकडे कूच केली आहे. मिचेल स्टार्कने ही कामगिरी नवव्या पिंक-बॉल कसोटी सामन्यात केली आहे. स्टार्कच्या पाठोपाठ या यादीत ऑस्ट्रेलियाचाच वेगवान गोलंदाज जोश हेझलवुडचा समावेश आहे. त्याने ७ सामन्यांत ३२ बळी पटकावले आहेत.

दरम्यान, भारताकडून सर्वाधिक बळी रवीचंद्रन अश्विनने घेतले आहेत. त्याने ३ पिंक-बॉल सामन्यांत १२ बळी घेतले आहेत. अश्विन या यादीत अकराव्या स्थानावर आहे. लक्षणीय बाब म्हणजे या यादीत पहिले चार गोलंदाज ऑस्ट्रेलियाचेच आहेत. स्टार्क आणि हेझलवुड नंतर नाथन लायन (३२), पॅट कमिन्स (२६) तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावर आहेत.

ऑस्ट्रेलियन संघाने इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीतही मजबूत पकड कायम ठेवली आहे. ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात मार्नस लाबुशाने (१०३), डेविड वॉर्नर (९५) आणि स्टीव्ह स्मिथ (९३) यांच्या खेळीच्या बदल्यात ९ बळी गमावून ४७३ धावांची विशाल धावसंख्या उभारली. त्याच्या प्रत्युत्तरात इंग्लंडचा संघ ऑस्ट्रेलियन गोलंदाजांच्या पुढे अपयशी ठरला. जो रूट (६२) आणि डेविड मलान (८०) यांच्या व्यतिरिक्त सर्व फलंदाज अयशस्वी ठरले.

गुलाबी चेंडूने शानदार गोलंदाजी करत मिचेल स्टार्कने ४ बळी घेतले. तर नाथन लायनने ३ बळी घेऊन ऑस्ट्रेलियाला २३७ धावांची आघाडी मिळवून दिली. इंग्लंडचा संघ फक्त २३६ धावांवर सर्वबाद झाला.


हे ही वाचा : http://Asian Champions Trophy 2021: विजयरथ चालू ठेवण्यासाठी उतरणार भारतीय हॉकी संघ; रविवारी होणार जपानशी सामना