घरक्रीडाNZ vs AUS : एगारची विक्रमी कामगिरी; तिसऱ्या टी-२० सामन्यात ऑस्ट्रेलिया विजयी 

NZ vs AUS : एगारची विक्रमी कामगिरी; तिसऱ्या टी-२० सामन्यात ऑस्ट्रेलिया विजयी 

Subscribe

ऑस्ट्रेलियाने पाच सामन्यांच्या या मालिकेत न्यूझीलंडची आघाडी २-१ अशी कमी केली.

डावखुरा फिरकीपटू अ‍ॅश्टन एगारने केलेल्या भेदक माऱ्यामुळे ऑस्ट्रेलियाने तिसऱ्या टी-२० सामन्यात न्यूझीलंडवर ६४ धावांनी विजय मिळवला. या विजयासह ऑस्ट्रेलियाने पाच सामन्यांच्या या मालिकेत न्यूझीलंडची आघाडी २-१ अशी कमी केली. तिसऱ्या टी-२० सामन्यात एगारने चार षटकांत ३० धावांच्या मोबदल्यात ६ गडी बाद केले. ऑस्ट्रेलियन गोलंदाजाची आंतरराष्ट्रीय टी-२० सामन्यातील ही सर्वोत्तम कामगिरी ठरली. याआधीही हा विक्रम एगारच्याच नावे होता. त्याने मागील वर्षी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध २४ धावांत ५ विकेट घेतल्या होत्या. तिसऱ्या टी-२० सामन्यात ६ विकेट घेतल्याने त्यालाच सामनावीराचा पुरस्कार मिळाला.

ग्लेन मॅक्सवेलची फटकेबाजी

या सामन्यात न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसनने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी स्वीकारली. ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर मॅथ्यू वेड केवळ ५ धावा करून बाद झाला. परंतु, कर्णधार फिंच आणि जॉश फिलिपे यांनी ८३ धावांची भागीदारी रचत ऑस्ट्रेलियाचा डाव सावरला. फिलिपेने २७ चेंडूत ४३ धावा केल्यावर त्याला ईश सोधीने बाद केले. सोधीनेच फिंचलाही माघारी पाठवले. फिंचने ४४ चेंडूत ६९ धावांची खेळी केली. यानंतर ग्लेन मॅक्सवेलने फटकेबाजी करत ३१ चेंडूत ८ चौकार आणि ५ षटकारांच्या मदतीने ७० धावा केल्याने ऑस्ट्रेलियाने २० षटकांत ४ बाद २०८ अशी धावसंख्या उभारली.

- Advertisement -

एगारच्या एकाच षटकात तीन विकेट

२०९ धावांचा पाठलाग करताना करताना न्यूझीलंडचा सलामीवीर मार्टिन गप्टिलने चांगली सुरुवात केली. त्याने अवघ्या २८ चेंडूत ४३ धावांची खेळी केली. परंतु, तो बाद झाल्यावर डेवॉन कॉन्वे (३८) वगळता न्यूझीलंडच्या फलंदाजांना चांगला खेळ करता आला नाही. एगारने एकाच षटकात ग्लेन फिलिप्स, कॉन्वे आणि जिमी निशम यांना माघारी पाठवले. अखेर न्यूझीलंडचा डाव १७.१ षटकांत १४४ धावांत आटोपला. त्यामुळे ऑस्ट्रेलियाने हा सामना ६४ धावांनी जिंकला.

Anvay Sawant
Anvay Sawanthttps://www.mymahanagar.com/author/sanvay/
गेल्या तीन वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. वृत्तपत्र आणि आता डिजिटल मीडिया असा दोन्ही क्षेत्रांचा अनुभव. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय क्रीडा विषयात लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -