ऍश्टन एगरची हॅट्ट्रिक

12 वर्षांनंतर केला पराक्रम

ऍश्टन एगर

येथे दक्षिण आफ्रिका विरुद्ध ऑस्ट्रेलिया संंघात 3 सामन्यांच्या आंतरराष्ट्रीय टी 20 मालिकेतील पहिला सामना पार पडला. हा सामना ऑस्ट्रेलियाने 107 धावांनी जिंकला आहे. तसेच मालिकेत 1-0ने आघाडीही घेतली आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा गोलंदाज ऍश्टन एगरने हॅट्ट्रिक घेत मोठा विक्रम केला आहे. तसेच या सामन्यात त्याने 4 षटकात 24 धावा देत हॅट्ट्रिकसह सर्वाधिक 5 विकेट्स घेतल्या आहेत. त्यामुळे तो आंतरराष्ट्रीय टी20मध्ये हॅट्रिक घेणारा ऑस्ट्रेलियाचा दुसराच गोलंदाज ठरला आहे.

काल पार पडलेल्या सामन्यात दक्षिण आफ्रिका ऑस्ट्रेलियाने दिलेल्या 197 धावांचा पाठलाग करत असताना एगरने 8 व्या षटकातील चौथ्या चेंडूवर फाफ डू प्लेसिस, पाचव्या चेंडूवर अँडिले फेहलुक्वायो आणि सहाव्या चेंडूवर दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज डेल स्टेनला बाद करत आपली हॅट्रिक साजरी केली. तो आंतरराष्ट्रीय टी20मध्ये हॅट्रिक घेणारा जगातील एकूण 12 वा गोलंदाज ठरला आहे. त्याचबरोबर ही हॅट्ट्रिक घेतल्यानंतर त्याने 12 व्या षटकात पीजे बिलजोन आणि 14 व्या षटकात लुंगी एन्गिडीलाही बाद केले.

त्यामुळे तो आंतरराष्ट्रीय टी20मध्ये एका डावात 5 विकेट्स घेणाराही ऑस्ट्रेलियाचा दुसराच गोलंदाज ठरला आहे. त्याच्याआधी जेम्स फॉकनरने पाकिस्तानविरुद्ध मोहाली येथे 27 धावांत 5 विकेट्स घेतल्या होत्या. यापूर्वी अशी कामगिरी ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज ब्रेट लीने केली होती. ब्रेट लीने 13 वर्षांपूर्वी 2007मध्ये बांगलादेशविरुद्ध केपटाऊनला झालेल्या सामन्यात 17 व्या षटकात हॅट्ट्रिक घेतली होती.