अश्विनचे भारताच्या टी-२० संघात ‘कमबॅक’ झाले पाहिजे – मोहम्मद कैफ  

अश्विन २०१७ नंतर आंतरराष्ट्रीय टी-२० सामना खेळलेला नाही.

ravichandran ashwin
रविचंद्रन अश्विन

अनुभवी ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विनचे भारताच्या टी-२० संघात पुनरागमन झाले पाहिजे, असे भारताचा माजी क्रिकेटपटू मोहम्मद कैफला वाटते. अश्विनने यंदाच्या आयपीएलमध्ये चांगली कामगिरी केली होती. दिल्ली कॅपिटल्सचे प्रतिनिधित्व करताना त्याने १३ गडी बाद केले होते. त्याने विराट कोहली, क्रिस गेल यासारख्या फलंदाजांनाही माघारी पाठवले होते. अश्विन २०१७ नंतर भारताकडून एकदिवसीय किंवा टी-२० क्रिकेट खेळलेला नाही. मात्र, त्याचा टी-२० संघात समावेश झाला पाहिजे, असे कैफला वाटते.

‘विराट कोहली, रोहित शर्मा, किरॉन पोलार्ड, क्रिस गेल, डेविड वॉर्नर, क्विंटन डी कॉक, करुण नायर, जॉस बटलर, स्टिव्ह स्मिथ, देवदत्त पडिक्कल, निकोलस पूरन. अश्विनने आयपीएलच्या तेराव्या (यंदा) मोसमात या सर्व फलंदाजांच्या विकेट मिळवल्या होत्या. यातील बहुतांश विकेट त्याने पॉवर-प्लेमध्ये घेतल्या होत्या. तो अजूनही भारताच्या टी-२० संघासाठी उपयुक्त ठरू शकतो असे मला वाटते,’ असे कैफ ट्विटमध्ये म्हणाला. अश्विन २०१७ नंतर आंतरराष्ट्रीय टी-२० सामना खेळलेला नाही. त्याने आतापर्यंत भारताकडून ४६ टी-२० सामन्यांत ५२ विकेट घेतल्या आहेत.