मंकडींग करत राहणार!

अश्विनची फलंदाजांना ताकीद

भारताचा ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विनने आयपीएलच्या मागील मोसमात किंग्स इलेव्हन पंजाब संघाकडून खेळताना राजस्थान रॉयल्सच्या जॉस बटलरला मंकड पद्धतीने बाद केले होते. पंजाब संघाच्या सलामीच्या सामन्यात अश्विन चेंडू टाकण्याआधी थांबला आणि नॉन-स्ट्रायकर बटलरने क्रिज सोडल्यावर अश्विनने चेंडू न टाकता त्याला धावचीत केले. त्यानंतर या दोघांमध्ये शाब्दिक चकमक झाली. सामना झाल्यानंतरही अश्विनवर बरीच टीका झाली. मात्र, त्यावेळी त्याने आपल्या कृत्याचे समर्थन केले होते. तसेच आताही एखाद्या फलंदाजाने चेंडू टाकण्याआधी क्रिज सोडल्यास मी त्याला मंकड पद्धतीने बाद करेन, असे अश्विनने ट्विटमध्ये म्हटले.

अश्विनने ट्विटरवर आपल्या चाहत्यांशी संवाद साधला. त्यात एका चाहत्याने तू आयपीएलच्या पुढील मोसमात कोणत्या फलंदाजाला मकंड पद्धतीने धावबाद करशील?, असा त्याला प्रश्न विचारला. ज्याचे अश्विनने आपल्या आक्रमक शैलीत उत्तर देताना लिहिले की, जो फलंदाज चेंडू टाकण्याआधी क्रिज सोडेल.

अश्विनने मागील दोन मोसमांत पंजाब संघाचे नेतृत्व केले होते. मात्र, यंदा खेळाडू लिलावाआधी दिल्ली कॅपिटल्सने त्याला आपल्या संघात समाविष्ट करुन घेतले. त्यामुळे आयपीएलच्या पुढील मोसमात दिल्ली संघावर आणि खासकरुन अश्विनवर चाहत्यांची नजर असणार आहे.