Asia Cup 2023 : भारतीय संघाची (Indian Team) आशिया चषक 2023 (Asia Cup 2023) स्पर्धेत चांगली सुरुवात झाली नाही. पाकिस्तानविरुद्ध भारताचा पहिलाच सामना पावसामुळे वाहून गेला. त्यामुळे दोन्ही संघांना 1-1 असे समान गुण देण्यात आले. सामना रद्द झाल्यामुळे पाकिस्तान संघाला फायदा झाला आहे, कारण त्यांचा संघ सुपर-4 साठी सहज पात्र ठरला आहे. पण आता भारताच्या अडचणी वाढू शकतात. त्यांचा आशिया चषक 2023 स्पर्धेतील पुढील सामना सोमवारी (4 सप्टेंबर) नेपाळशी होणार आहे. पण इथेचे अडचण आहे. कारण या सामन्यावरही पावसाचे सावट आहे. त्यामुळे या सामन्यातही पाऊस झाल्यास भारतीय संघ सुपर-4 साठी पात्र होणार का? हा प्रश्न क्रिडा चाहत्यांना पडला आहे. (Asia Cup 2023 Indian teams next match also rained How to reach Super 4)
हेही वाचा – सूर्याच्या दिशेने इस्रोची यशस्वी भरारी
पाकिस्तानविरुद्धचा सामना पावसामुळे रद्द झाल्यानंतर भारताचा पुढील सामना नेपाळशी होणार आहे. त्यामुळे सुपर-4 साठी पात्र होण्यासाठी भारतीय संघाला हा सामना कोणत्याही परिस्थिती जिंकावा लागणार आहे. परंतु या सामन्यावरही पावसाचे सावट आहे. जर हा सामनाही रद्द झाला तर भारतीय संघ सुपर-4 साठी पात्र ठरणार आहे. कारण भारताचा नेपाळविरुद्धचा सामनाही पावसामुळे रद्द झाला तर दोन्ही संघांना 1-1 असे समान गुण दिले जातील. त्यामुळे भारतीय संघाच्या खात्यात 2 गुण जमा होतील आणि भारतीय संघ सुपर-4 साठी पात्र ठरेल. परंतु क्रिकेटला अनिश्चिततेचा खेळ म्हटले जाते.
नेपाळ संघाला पाकिस्तानविरुद्धच्या पहिला सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागले होते. त्यामुळे त्यांच्या खात्यात शून्य गुण आहे. अशा परिस्थितीत नेपाळ आणि भारतीय संघाच्या सामन्यात पावसाने हजेरी लावली नाही. सामना पूर्ण झाला आणि नेपाळ संघाने भारताचा पराभव केला तर, ते सुपर-4 साठी पात्र ठरतील. विशेष म्हणजे जर या सामन्यात पावसाने हजेरी लावली तर, DLS महत्त्वाची भूमिका बजावू शकते.
हेही वाचा – Balasore train accident: आरोपी अधिकाऱ्यांवर CBIकडून दोषारोपपत्र दाखल
भारत विरुद्ध नेपाळ सामन्यात हवामान कसे?
भारतीय संघाला पाकिस्तानसोबत पार पडलेल्या पल्लेकेले आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर नेपाळविरुद्ध सामना खेळायचा आहे. हा सामना उद्या (4 सप्टेंबर) होणार आहे. Accuweather च्या अहवालानुसार, या दिवशीही जोरदार पावसाची शक्यता आहे. भारत विरुद्ध नेपाळ सामन्याच्या दिवशी पावसाची शक्यता 88 टक्के आहे. त्यामुळे सामन्याच्या वेळेत जोरदार पाऊस झाल्यास सामनाही रद्द होण्याची शक्यता जास्त आहे.