घरक्रीडाआज ठरणार आशियाचा किंग

आज ठरणार आशियाचा किंग

Subscribe

आशिया चषकाच्या अंतिम फेरीत आज भारत आणि बांगलादेश यांचा सामना होणार आहे.

आशिया चषकाच्या अंतिम फेरीत आज भारत आणि बांगलादेश यांचा सामना होणार आहे. भारत या स्पर्धेत एकही सामना न गमावता अंतिम फेरीत पोहोचला आहे. तर बांगलादेशने ‘सुपर ४’ फेरीतील शेवटच्या सामन्यात पाकिस्तानचा पराभव करत या स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली.
आशिया चषकाच्या अंतिम फेरीत पोहोचण्याची बांगलादेशची ही दुसरीच वेळ आहे. याआधी २०१२ आशिया चषकात त्यांचा अंतिम सामन्यात पाकिस्तानने फक्त २ धावांनी पराभव केला होता. त्यामुळे बांगलादेशला भारताचा पराभव करत इतिहास रचण्याची संधी आहे. तर भारताने ही स्पर्धा सर्वाधिक ६ वेळा (५ वेळा एकदिवसीय आणि १ वेळा टी-२०) जिंकली आहे.
यावर्षीच्या स्पर्धेत दोन्ही संघानी चांगली कामगिरी केली आहे. भारताने साखळी फेरीत हाँगकाँग आणि पाकिस्तानचा पराभव केला होता. ‘सुपर ४’ फेरीत भारताने बांगलादेश आणि पाकिस्तानचा पराभव केला तर अफगाणिस्तानविरुद्धचा सामना बरोबरीत संपला होता. त्यामुळे भारत एकही सामना न गमावता स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचला आहे. दुसरीकडे स्पर्धेच्या सलामीच्या सामन्यात बांगलादेशने श्रीलंकेला पराभवाचा धक्का दिला होता. दुसऱ्या सामन्यात अफगाणिस्तानने बांगलादेशचा १३६ धावांनी पराभव केला होता. पण श्रीलंकेने आपले दोन्ही सामने गमावल्याने बांगलादेश ‘सुपर ४’ फेरीसाठी पात्र झाला होता. ‘सुपर ४’ च्या पहिल्या सामन्यात बांगलादेशचा भारताकडून पराभव झाला होता. दुसऱ्या सामन्यात बांगलादेशने अफगाणिस्तानचा पराभव केला होता. तर पाकिस्ताननेही एक सामना जिंकला असल्यामुळे या फेरीच्या अंतिम सामन्यात बांगलादेश आणि पाकिस्तानमधील जो संघ जिंकेल तो आशिया चषकाच्या अंतिम फेरीत पोहोचणार होता. या सामन्यात बांगलादेशने पाकिस्तानचा ३७ धावांनी पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला.
या स्पर्धेत भारताचे फलंदाज आणि गोलंदाज या दोघांनीही चांगले प्रदर्शन केले आहे. भारताच्या सलामीवीरांनी सर्व सामन्यांत ५० हून अधिक धावांची सलामी दिली आहे. ‘सुपर ४’ मधील पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात भारताचे सलामीवीर शिखर धवन आणि रोहित शर्मा या दोघांनीही शतके झळकावली होती. या स्पर्धेत सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत शिखर पहिल्या तर रोहित तिसऱ्या स्थानी आहे. त्यामुळे अंतिम सामन्यातही संघाला त्यांच्याकडून चांगल्या सलामीची अपेक्षा असणार. पण भारताच्या मधल्या फळीतील फलंदाजांनी या स्पर्धेत चांगले प्रदर्शन केलेले नाही. भारतासाठी ही एक चिंतेची बाब आहे. भारताच्या गोलंदाजांनी मात्र या स्पर्धेत सातत्यपूर्ण प्रदर्शन केले आहे. भुवनेश्वर, बुमराह आणि चहाल यांना अफगाणिस्तानविरुद्ध विश्रांती मिळाल्याने ते अंतिम सामन्यात ताजेतवाने असतील.
बांगलादेशकडून यष्टीरक्षक मुशफिकूर रहिमने अप्रतिम प्रदर्शन केले आहे. या स्पर्धेत सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत तो दुसऱ्या स्थानी आहे. गोलंदाजीत मुस्तफिजूर रहमान आणि कर्णधार मश्रफी मुर्तझाने वेळोवेळी आपले महत्व दाखवून दिले आहे. पण अंतिम सामन्याआधी बांगलादेशला मोठा झटका बसला आहे. त्यांचा अनुभवी अष्टपैलू शाकिब अल हसन दुखापतीमुळे या सामन्यात खेळू शकणार नाही. तर याआधीच अनुभवी फलंदाज तमिम इक्बाल दुखापतीमुळे स्पर्धेबाहेर गेला होता. त्यामुळे त्यांना अंतिम सामन्यात दोन अनुभवी खेळाडूंविनाच खेळावे लागणार आहे. असे असूनही बांगलादेशचे इतर खेळाडू सामना जिंकवून देण्यात सक्षम आहेत. त्यामुळे बांगलादेशला हलक्यात घेणे भारताला महागात पडू शकते. एकूणच या दोन्ही संघांत असणाऱ्या ‘मॅचविनर’ खेळाडूंमुळे आशिया चषकाचा अंतिम सामना अत्यंत चुरशीचा होईल यात शंका नाही.
Anvay Sawant
Anvay Sawanthttps://www.mymahanagar.com/author/sanvay/
गेल्या तीन वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. वृत्तपत्र आणि आता डिजिटल मीडिया असा दोन्ही क्षेत्रांचा अनुभव. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय क्रीडा विषयात लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -