घरक्रीडादुग्धशर्करायोग!

दुग्धशर्करायोग!

Subscribe

ते तिघं प्रथम भेटले मॉस्को ऑलिम्पिकला, १९८० साली. एखादा योगायोग केवळ चित्रपटातच दाखवण्यापुरता शोभून दिसावा तसे ते परवा भेटले दोहात! ३९ वर्षांनी, कतार इथं. तशी दोन वर्षांपूर्वी भुवनेश्वरला झालेल्या आशियाई अ‍ॅथलेटिक्स स्पर्धाशर्यतींच्या निमित्ताने तिघांची भेट झालीच होती. परंतु, दोहातील भेट तशी यादगार ठरली. तिघांसाठीही. दोहात तिघे एकत्र भेटले तरी तिघांच्या कहाण्या मात्र वेगवेगळ्या आहेत. ते तिघं आहेत, इंग्लंडचा सॅबेस्टियन को, भारताची पी.टी.उषा आणि भारताचाच आदिल सुमारीवाला.

स्टीव्ह ओव्हेट आणि सॅब को यांच्या दोस्तीच्या कहाण्या आणि आपसातील कडव्या शर्यतींचा बोलबाला असण्याचा तो काळ होता! साल होतं १९८०. अमेरिकन संघाचा मॉस्को ऑलिम्पिकवर बहिष्कार होता. अर्थात ८००-१५०० मीटर्स धावण्यात को-ओव्हेट या जोडगोळीला फारशी स्पर्धाही नव्हतीच! को ८०० मीटर्सची शर्यत सहज जिंकणार हे जवळ-जवळ नक्की असताना, दोन फेर्‍यांच्या तंत्रकुशल शर्यतीत ओव्हेटने बाजी मारली. डिवचले गेलेल्या को ने मग ओव्हेटच्या आवडत्या १५०० मीटर्स शर्यतीत धावताना, अगदी ऐनवेळी अक्षरशः शरीराचा कण न कण शर्यतीत झोकून, दोन्ही हात पसरून थाटात विजय मिळवला.

- Advertisement -

वरील थरारनाट्य तिथंच संपलं नाही. को ने पुढील वर्षी म्हणजे १९८१ साली वर्ल्डकपमध्ये ८०० मीटर्स शर्यतीत धावताना सुवर्णपदक पटकावून ८०० मीटर्सवर पुन्हा आपली सद्दी सांगायला सुरुवात केली. १९८४ च्या लॉस एन्जेलिस ऑलिम्पिकमध्ये ८०० मीटर्स शर्यतीत पुन्हा एकदा ओव्हेट ८०० मीटर्समधे बाजी मारून गेला. पुन्हा डिवचले गेलेल्या को ने १५०० मीटर्स शर्यतीत विजेतेपद मिळवलं आणि कायमचा रेकॉर्डबुकांत जाऊन बसला.

हा सर्व इतिहास आठवण्याचं कारण म्हणजे ओव्हेट म्हणाला, ‘पत्रकार मला प्रश्न विचारायचे की तुझ्यात आणि को मध्ये फरक काय? तर मी त्यांना एवढंच सांगायचो की, मी तसा मोकळाचाकळा फार शिस्त नसलेला आहे. को चं तसं नाही. तो तुम्हाला काही बोलला नाही, तरी तो सगळं मनात ठेऊन असेल.’

- Advertisement -

ओव्हेट काय म्हणाला ते आज जगाला समजतंय! १९८० साली को ने पूर्व जर्मन मारिता कोच, झेक यर्मिला क्रेतोचविलोवा आणि रशियन अ‍ॅथलिट्सना धावताना पाहिलं होतं. त्या सार्‍यांच्या उत्तेजक सेवनाच्या कथा त्याच्या कानावर पडत होत्या. मॉस्कोत धावताना को हे सारं समजून घेत होता. यथावकाश तो इंग्लंडचा संसदपटू झाला. राजकारणात गेला. तरबेज झाला. मग तो जागतिक अ‍ॅथलेटिक्स महासंघाचा अध्यक्ष झाला आणि उत्तेजक द्रव्य घेणार्‍यांविरुद्ध महाकडक धोरण अवलंबणारा झाला. त्याच्याच काळात रशियातील अ‍ॅथलिट्सवर महाबंदी आली. अजूनही ती बंदी कायम आहे! हा झाला कहाणीचा एक भाग.

उषाची कहाणीदेखील १९८० पासूनच सुरू होते! त्याच मॉस्को ऑलिम्पिकपासून! मॉस्कोमध्ये उषा १०० मीटर्समध्ये प्राथमिक फेरीत १२.२७ सेकंदांची खराब वेळ देत पाचवी आली. उषाने १९८२ सालचं दिल्ली एशियाड गाजवलं. नाम्बियार यांच्या हाताखाली उषा ४०० मीटर्स हर्डल्समधे भाग घेण्याची तयारी करू लागली. रशियन आणि पूर्व जर्मन अ‍ॅथलिट्सचा १९८४ सालच्या लॉस एन्जेलिस ऑलिम्पिकवर बहिष्कार असल्याने उषाला पदक मिळवायची संधी होती. परंतु, ती अगदी थोड्या फरकाने हुकली. त्यानंतरच्या १९८६ च्या सोल एशियाडमध्ये १००, २००, ४००, ४०० मीटर हर्डल्स, रिले अशा पाच शर्यतींत धावणार्‍या उषाने १०० मीटर्स सोडून सगळ्या शर्यतीत सुवर्ण मिळवलं. परंतु, जास्त स्पर्धांमध्ये भाग घेण्यामुळे तिची जागतिक स्तरावर अधोगती होत गेली. १९८८च्या सोल ऑलिम्पिकमध्ये तर ४०० मीटर्स हर्डल्समधे ती प्राथमिक फेरीत सातवी आली. पुढेपुढे शर्यतीतून बाद होण्याची नामुष्कीही तिच्यावर ओढवली. निवृत्तीनंतर उषाने शिष्या तयार केल्या खर्‍या, पण त्यादेखील आशियाई पातळीपर्यंतच गाजत्या राहिल्या. परंतु, तरीदेखील उषा अ‍ॅथलेटिक्समध्येच कार्यरत राहिली. हा झाला कहाणीचा दुसरा भाग.

आदिलची कहाणीदेखील १९८० पासूनच सुरू होते! त्याच मॉस्को ऑलिम्पिकपासून! मॉस्कोमध्ये उषाप्रमाणेच १०० मीटर्सममध्ये प्राथमिक फेरीत सातवा आलेल्या आदिल ऑलिम्पिकवारी झाल्यावर भारतीय अ‍ॅथलेटिक्स संघटनेत अनेक वर्ष वावरला. त्यानंतर आदिलने जागतिक अ‍ॅथलेटिक्स संघटनेकडे मोर्चा वळवला. अगदी आजही तो जागतिक अ‍ॅथलेटिक्स महासंघाच्या समितीत पदाधिकारी आहे. हा झाला कहाणीचा तिसरा भाग.

वरील तीन कहाण्यांच्या तीन घटकांना जोडणारा सेतू दोहात पाहायला मिळाला. गेल्या बुधवारी झालेल्या जागतिक अ‍ॅथलेटिक्स संघटनेच्या बैठकीत, को यांची जागतिक अ‍ॅथलेटिक्स महासंघाचे अध्यक्ष म्हणून फेरनिवड झाली. आनंद म्हणजे त्याचवेळी को यांच्या हस्ते पी. टी. उषाला ‘वेटरन पिन’ हा पुरस्कार दिला गेला आणि आदिल सुमारीवालाचीसुद्धा जागतिक अ‍ॅथलेटिक्स महासंघाच्या कार्यकारिणीत निवड झाली. येत्या रविवारी आपला वाढदिवस साजरा करणार्‍या सॅबेस्टियन कोसाठी अध्यक्षपदाची फेरनिवड ही वाढदिवसाची भेट, तर पी.टी.उषाला पुरस्कार आणि आदिलची कार्यकारिणी समितीत झालेली निवड हा अ‍ॅथलेटिक्समधील एक दुग्धशर्करायोग म्हटला पाहिजे नाही का?

-उदय ठाकूरदेसाई

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -